
ढिंग टांग : मयसभा-पर्व!
युगंधर वासुदेवाच्या सूचनेनुसार
सारी प्रतिभा पणाला लावून
मयासुराने कोरुन काढला
इंद्रप्रस्थातील भव्याद्भुत प्रासाद,
जिथे भूमीला प्राप्त झाले होते,
अद्वितीय स्फटिकत्त्व, आणि
प्रवाही जलधारेने अंगिकारले होते,
हिमखंडांचे अविचल स्थैर्य.
प्रासादाच्या उद्यानात सुरु जाहला
अहोरात्र वसंतोत्सव, त्यायोगे
वेळीअवेळी मोहरले आम्रवृक्ष, आणि
दुमदुमला प्राकार कोकिलकंठातून
उमटलेल्या सुस्वर आलापांनी,
मयुरांनी उधळले आपले रंगऐश्वर्य,
मेघांच्या आगमनाशिवाय.
अमृतासम निर्मळ जळाने काठोकाठ
भरलेल्या उद्यानातील जलाशयांत
विहरणाऱ्या राजहंसांच्या युगुलांना
उरलीच नाही भीडभाड.
यक्षकिन्नरांच्या मधुर स्वरांनी,
सुवर्णचर्चित भिंतींचे तृप्तले कान,
अष्टौप्रहर वाहू लागले गंधबावरे पहाटवारे.
अवेळी टपटपले पारिजातक वृक्ष,
आणि चंदन वृक्षांनीही सोडला गंधठाव.
साक्षात दिनकराने घेतला होता तिथे,
प्रकाशयोजनेचा पत्कर, आणि
नक्षत्रलोकांनी उजळल्या होत्या
दर्शनोत्सुक रात्री.
जे जे उत्तम, उदात्त, उन्नत,
महन्मधुर ते ते सारे काही
स्थापित होते त्या मयसभेत...
राजपुरोहितांनी काढून दिलेल्या
शास्त्रोक्त मुहूर्तावर धर्मराज युधिष्ठिराने
राजसूय यज्ञाची केली सिध्दता.
मयसभेच्या वास्तुप्रवेशाची
धाडली देशोदेशी निमंत्रणे.
कार्यक्रम ‘अचूक’ जाहला!-
पांडवांचे ऐश्वर्य पाहून अतिथींच्या
दाही अंगुळ्या गेल्या मुखात,
भूमीवर आदळले कित्येक
चक्रवर्ती सम्राटांचे किरीट,
विस्मयाच्या चित्कारांनी
संकोचले सारे दिशाकोन...
भूमी समजून पाय टाकावा, तर
जलाशयात बुडण्याचे भय, आणि
जलाशय समजून प्रतिबिंब न्याहाळावे,
तो ती निघावी स्फटिकांची समतल भूमी!
दुर्योधनाला तर दोनदा बदलावी
लागली त्याची राजवस्त्रे!
मयप्रासादाच्या दालनात घुमला
द्रौपदीच्या छद्मी हास्याचा विषाक्त स्वर.
मयसभेतील मायावी कहाण्यांनी
भयभीत झालेल्या अतिरथींनी
वेशीवरुनच फिरवले त्यांचे रथ.
एवढ्यात-
‘नारायण, नारायण’ असा घोष करत
भर सभेत प्रविष्ट जाहले, देवर्षी नारदमुनी!
ते म्हणाले, ‘‘हे धर्मराजन, तुजप्रत कल्याण असो.
तुझे ऐश्वर्य पाहून त्रैलोक्य
झाले आहे अचंबित, यशस्वी भव!’’
‘‘आशीर्वाद द्यावा, देवर्षी!’’ हातातील
राजदंड सांभाळत युधिष्ठिर
राजस विनम्रतेने उद्गारला.
‘‘त्याआधी माझ्या प्रश्नांची उत्तरे
देशील का, हे कुंतीपुत्रा?
-तुझ्या इंद्रप्रस्थात श्रमिक, कृषक
आणि पथिक सुखी, सुरक्षित आहेत?
-प्रजाजन हीच तुझी खरी संपदा आहे,
हे माहीत आहे तुला?
-गावातील पिप्पलवृक्षही वंदनीय असतो,
याची जाणीव आहे तुला?
-फलपुष्प, मधुपर्कादी प्रसादासह,
जिवंतीयुक्त शाकभाजीने मंडित
असे भोजन त्वां मांडले आहेस,
पण प्रासादापलिकडली वस्ती
अजूनही भुकेली आहे, याची
जाणीव आहे का तुला?
-जे खांडववन जाळून त्वां ही
मयसभा उभी केलीस, त्या भूमिपुत्रांचे
काय झाले, हे कळले का तुला?’’
-तू उपभोगशून्य स्वामी आहेस की,
उपयोगशून्य सम्राट?’’
...देवर्षी नारदांच्या प्रश्नावलीची
अचूक उत्तरे युधिष्ठिराकडे
तेव्हाही नव्हती...आजही नाहीत.
परंतु, मयसभेचे मायावीपण मात्र
आजही अबाधित आहे.