
ढिंग टांग : भावी पीएम..!
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : भविष्याचा वेध घेणारी.
परमप्रतापी राजाधिराज उधोजी महाराज अस्वस्थपणे अंत:पुरात येकटेच येरझारा घालीत आहेत. मधूनच गवाक्षातून बाहेर बघून अदमास घेत आहेत. मधूनच घड्याळात बघत आहेत. अब आगे...
उधोजीराजे : (स्वत:शीच पुटपुटत)... पळे जाती, घटिका जाती तास वाजे घणाणा, आयुष्याचा नाश होतो... (अचानक आठवण होऊन) अरे, कोण आहे रे तिकडे?
संजयाजी फर्जंद : (लगबगीने येवोन मुजरा करत) महाराजांचा विजय असो! कशापायी याद केलं?
उधोजीराजे : (संतापून) कुठे उलथले आहेत सगळे? केव्हापासून आम्ही नुसत्या सदऱ्यावर त्यांची वाट पाहात आहोत...
संजयाजी : सदरेववर असे म्हणायचे आहे का तुम्हाला, महाराज?
उधोजीराजे : (चिडून) सदऱ्यावरच म्हणायचं होतं आम्हांस! इथे वेळवखत निघोन चालली आहे, आणि प्रत्येक पळागणिक गनिम शिरजोर होऊ लागला आहे! वेळ जाया जाता कार्यनाश होईल! सगळ्यांना तातडीने बोलवा!
संजयाजी : (हळू आवाजात) उरलेत तरी किती? दोन-चार आहेती! कोण गेलं, कोण आलं काही समजतसुदीक नाही! उरलेले आहेत त्यांना बलावू? चटशिरी येतील!
उधोजीराजे : (बेफिकिरीने) चार उरले तरी भारी आहेत चार लाखाच्या फौजेला! चार उरलेत, पण कसे कडवे मावळे आहेत! मोडेन पण वाकणार नाही असा बाणा आहे!
संजयाजी : (मिशीला पीळ देत) झुकेगा नहीं स्स...
उधोजीराजे : (अडवत) हां, हां! फर्जंद...खाशांच्या खाजगी दालनात उपस्थित आहा, याचं भान बाळगा! इथं अपशब्द चालत नाही! ते सगळं तिथं बाहेर चालू द्या!!
संजयाजी : (खात्री देत) त्यात काई बी कमी नाही, महाराज!
उधोजीराजे : (तळव्यावर मूठ हापटत) याच चार कडव्या शिलेदारांच्या मदतीनं एक दिवस आम्ही दिल्लीचं तख्त हलवोन सोडू! मोगॅम्बोला धरणीठाय करु! अफझुल्ल्याला चाळीस गज खोल गाडू!!
संजयाजी : (दाद देत) घ्या...हे सगळं मीच वर्तवलेलं भविष्य आहे!
उधोजीराजे : (करारी बाण्याने) हे भाकित नव्हे, आमच्या मर्दुमकीवर मराठी दौलतीचा असलेला विश्वास आहे!
संजयाजी : (त्वेषानं) हेच सगळं मी परवा होळीच्या दिवशी बोललो, तर पब्लिक हसलं!
उधोजीराजे : (हेटाळणी करत) तुम्ही हसण्यासारखेच अतिशयोक्त काहीतरी बोलला असाल!
संजयाजी : (नकार देत) मी फक्त इतकंच बोललो की आमचे राजे देशाचे भावी पंतप्रधान आहेत! दिल्लीच्या तख्ताला टक्कर देणारे एकमेव नेते आहेत! आता यात काय अतिशयोक्ती केली मी? पण तेव्हापासून जो भेटतोय तो मला ‘वळख ठेवा, साहेब’ असं म्हणून पुढे जायला लागलाय! हल्ली लोकांना खरं ऐकायची सवयच उरली नाही, बघा!
उधोजीराजे : (पडेल आवाजात) बोललात ते ठीक, पण चारचौघात कशाला बोलायचे? इतका कसा रे तू अगदीच ‘हा’?
संजयाजी : मैंने तुम्हारा नमक खाया है, सरकार! मैं ऐसाइच बोलेगा!
उधोजीराजे : (अनवधानाने) हिंदी में क्यूं बात करता है?
संजयाजी : लोक म्हणतात, ‘अबी तुम दिल्ली में बडा साब होएंगा, तो तुम्हारे साथ हिंदी मेईच बात करना पडेंगा!’
उधोजीराजे : (स्वप्नाळूपणाने) खरंच मी पंतप्रधान होईन? तुझ्या तोंडात साखर पडो, फर्जंदा! हे तर महाराष्ट्राचं स्वप्न आहे, स्वप्न!
संजयाजी : (आत्मविश्वासाने) शंभर हिस्से खरं होणार, महाराज!
उधोजीराजे : त्यासाठी आम्हाला काय करायला हवं?
संजयाजी : (डोकं खाजवत) तुम्ही कुणाला तरी पुन्हा वचन देऊन ठेवा! होऊन जाईल काम...कसं?