डॉ. बाबासाहेब आंबेडकर: प्रज्ञा, शिल, करुणेचा महासागर ! 

प्रा.सुधीर मस्के 
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय या मुल्यांच्या आधारावर नव्या लोकशाहीवादी प्रजासत्ताक भारताची रचना निर्माण करणाऱ्या या महानायकास विनंम्र अभिवादन! 

आज ६ डिसेंबर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ६३वा महापरिनिर्वाण दिवस. भारतरत्न, महाकारुणिक, कायदेपंडित,बोधिसत्त्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशा नानाविध उपाधी पावलेल्या बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येत अनुयायांची गर्दी पाहायला मिळते. हे दृष्य बाबासाहेबांप्रती जनमानसाच्या मनात असणारे प्रेम, आदरभाव आणि श्रध्दा अधोरेखित करते. बाबासाहेबांनी तथागत गौतम बुध्दाच्या प्रज्ञा,शिल आणि करुणा या तत्वांशी आयुष्यभर बांधील राहून रूढी-परंपरावादी व्यवस्थेच्या विरुध मोठा संघर्ष केला. स्वातंत्र्योत्तर भारताची लोकशाहीवादी, प्रजासत्ताक, सार्वभौम अशी आधुनिक ओळख जगाच्या पटलावर निर्माण करुन देणारे बाबासाहेब खऱ्या अर्थाने विश्वाविभूती ठरतात. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय या मुल्यांच्या आधारावर नव्या लोकशाहीवादी प्रजासत्ताक भारताची रचना निर्माण करणाऱ्या या महानायकास विनंम्र अभिवादन! 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

आजचा दिवस बाबासाहेबांच्या विवेकी कार्य करुत्वाची  आठवण करून देणारा आहे. हजारो वर्षे ज्या सामाजिक व्यवस्थेने दलित-वंचित बहुजन समाजाला सामाजिक, मानसिक आणि आर्थिक  गुलामीच्या जाळ्यात जखडून ठेवले, ज्या व्यवस्थेने मानवी जीवन जगण्याचा अधिकार नाकारून पशुतूल्य जीवन जगण्यास भाग पाडले. त्या व्यवस्थेला डॉ.बाबासाहेबांनी आपल्या विशाल प्रज्ञेच्या  बळावर लाथाडून लावले. पददलित, वंचित समूहात आत्मसन्मान, स्वाभिमान आणि मुक्तपणे जीवन जगण्याचा विश्वास जागवला. या भूतलावर अनेक पिढ्या येतील आणि जातील पण येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी बाबासाहेब प्रेरणेचा स्त्रोत राहतील. कारण बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाची संपूर्ण जडणघडण तथागताच्या प्रज्ञा, शिल, करुणा या त्रीसूत्रीवर झाली आहे. 

संबंधित लेख : डाॅ. आंबेडकर यांचे आंबडवे गाव पंचतीर्थ घोषित पण...

प्रज्ञावंत बाबासाहेब : बाबासाहेबांची प्रज्ञा उच्चकोटीची होती. इतिहास, अर्थशास्त्र, विधी, वाणिज्य, समाजशास्त्र, शिक्षण, कृषी, सिंचन ई. अनेक विद्याशाखांचा सखोल अभ्यास व  चिंतन करून बाबासाहेबांनी भारतीय जनमानसाचे जीवन समृध्द करण्याचे अनेक उपाय सुचवलेले आहेत. भारतातील गरीबीचे मुळ कारण हे येथील जातीय सामाजिक व्यवस्थेत आहे. जातीय विषमतावादी समाज व्यवस्था धर्माचा आधारावर हजारो वर्ष टिकवून ठेवण्यात ब्राहमण वर्गाने आपले हित जपले आहे. जातिव्यवस्थेचे समुच्च निर्मुलन करूनच प्रबुध्द भारताचे स्वप्न साकार केले जाऊ शकते हे सांगणारे बाबासाहेब पहिले समाजशास्त्रज्ञ होते. "मी प्रथमताः भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे" असे सांगणारे बाबासाहेब खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण ठरतात. आजघडीला तोकड्या राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र वाटणाऱ्या पक्ष-संघटनांनी बाबासाहेबांच्या ठायी असलेली खरीखुरी राष्ट्रभक्ती अंगीकारणे अधिक संयुक्तिक ठरेल. भारतासारख्या विविधतापूर्ण देशाला राज्यघटनेच्या एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी अफाट संघर्षमय जीवनातून कमावलेली प्रज्ञाच बाबासाहेबांच्या कामी आली. लोकशाहीवादी समताधिष्ठीत न्यायपूर्ण समाजाच्या उभारणीसाठी "अभ्यासुनी प्रकट व्हावे" हाच मुलमंत्र बाबासाहेबांनी आयुष्यभर जपला. दलित, वंचित बहुजन, व महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उत्थानाचा कार्याचा विडा उचलण्याचा आत्मविश्वास देखील प्रज्ञेमुळेच विकसीत झाला. 

संबंधित लेख :  डॉ. बाबासाहेबांच्या मूळ घराचा दगड लखनौमध्ये प्रेरणास्रोत  ​

शिलवंत बाबासाहेब : बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दुसरे महत्वपूर्ण गुण-वैशिष्टे म्हणजे बाबासाहेबांचे शिलवान व्यक्तिमत्व. बालपणापासूनच तथागत गौतम बुध्द, संत कबीर या थोर महापुरुषांचे संस्कार बाबासाहेबांवरती होते. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ! या संत वचनाप्रमाणे आपले नेतृत्व सिध्द करणारे बाबासाहेब लोकशाहीच्या मार्गानेच आपले कार्य करीत राहीले. तत्कालीन परिस्थितीमध्ये दलित-वंचित बहुजन समाजाच्या सामाजिक, राजकीय, सांकृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वच स्तरावर सक्षम नेतृत्वाचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतो. केवळ पोपटपंची, प्रलोभनीय आणि समाजास वेशीस टांगून आपल्या कर्तव्या पासून पळ काढणारे नेतृत्व अधिक प्रमाणात दिसून येते. तिमिरालाही लाज वाटावी अशा स्वरुपाचे शिल-सदाचारी निथळ चकाकीदार व्यक्तीमत्वाचा ठसा आपल्या व्यक्तिगत, सामाजिक व राजकीय आयुष्यात उमठवणाऱ्या बाबासाहेबांच्या कार्याचा प्रभाव आणि प्रचार आज वैश्विक स्तरावरही आंबेडकरवाद या वैचारिक प्रवाहातून झळकताना पहिला मिळतो. 

संबंधित लेख : ...आम्ही राजे परंपरेचे, तर तुम्ही ज्ञानाचे 

महा-कारुणिक बाबासाहेब: बाबासाहेबांची करुणा विशाल महासागरासारखी असल्याची प्रचीती क्षणोक्षणी येते. "उध्दरली कोटी कुळे, भीमा तुज्या जन्मामुळे"  तथा "काल मुजरेच केलेरे माज्या मेलेल्या बापाने, आज मुजरे मला करती बा भीमाच्या प्रतापाने". अशा अनेक स्वरूपाचे गाणे व काव्यपंक्ती बाबसाहेबांच्या करुणाशील व्यक्तिमत्वाची आठवण करून देतात. अफाट संघर्षमय जीवनातून कमावलेली विशाल प्रज्ञा मानवी कल्याण आणि राष्ट्र हितासाठी वाहून देणारे बाबासाहेब खऱ्या अर्थाने महाकारुणिक ठरतात. बाबासाहेब मूलतः अर्थशास्त्राचे   विद्यार्थी होते, अर्थ, वाणिज्य, व्यपार, उद्योग यांची प्रचंड समज बाबासाहेबांना होती. बाबासाहेबांनी स्वहिताचा विचार केला असता तर आज वैश्विक स्तरावर त्यांची  नोंद क्रमांक एकचे अब्जाधीश उद्योगपती अशी राहिली असते. सखोल ज्ञानार्जनातून व बुध्दाच्या तत्त्वज्ञानातून बोधिसत्व, अरहंत पदाला पोहचलेल्या बाबासाहेबांनी "बहुजन हिताय, बहुजन सुखाय" हा कल्याणकारी मार्ग अवलंबला.  

आज देशाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. देशाचा आर्थिक विकासदर ४.५% वरती येऊन पोहोचला आहे. शेतीचा विकासदर घटलेला आहे. बेरोजगारी, महागाई शिगेस पोहोचली आहे. ऑक्सफार्मच्या अहवालानुसार आर्थिक विषमतेची दरी अधिक रुंदावलेली आहे. भूकबळीचा निर्देशांकामध्ये भारत १०३ व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे फोर्ब्स-२०१९ च्या सर्वेनुसार   मुकेश अंबानी यांनी जगातील  अब्जाधीस लोकांच्या यादीमध्ये ६० बिलयन डॉलर संपत्तीचा उच्चांक गाठून ९वे स्थान प्राप्त केले आहे. अशा विदारक विषमं सामाजिक-आर्थिक परिस्थितीमध्ये  बाबासाहेबांची आठवण भांडवलशाहीचे समर्थन करणाऱ्या सरकारला करून देणे अधिक समर्पक व संयुक्तिक ठरते.     

संबंधित लेख : बाबासाहेबांनी धुडकावली होती दिलीपकुमारांची देणगी ​

देशातील सत्ताधारी राजकीय पक्ष आपल्या सोयीनुसार बाबासाहेबांना निवडकपणे लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. १४ एप्रिल असो कि ६ डिसेंबर संघ-प्रणीत विचाराच्या संघटना “समरसता मंच” च्या नावाखाली बाबासाहेबांना मूर्तीपूजा आणि हरतुऱ्या मध्ये बंधिस्त करून खऱ्या समतामूलक विचारास पायधुळीस तुडवीत आहेत. या संघटनांनी हिंदुत्वचा छुपा अजेंडा दलित, वंचित बहुजनाच्या माथी मारून ध्रुवीकरण करण्याचा नवीन प्रयोग आखला आहे. बाबासाहेब स्वताः “हिरो-वरशिप” अर्थात (व्यक्ती-पूजा) या संकल्पनेचे कट्टर विरोधक होते. त्यांची लोकशाही व्यवस्थेवरची निष्ठा अतिशय दृढ होती. त्यामुळे २५  नोव्हेंबर १९४९ च्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात बाबासाहेबांनी ठणकावून सांगितले होते कि धर्म आणि भक्ती रसातील व्यक्ती-पूजा हि मोक्ष मिळवण्याचा मार्ग ठरू शकते, परंतु राजकारणातील व्यक्तीपूजा हि हुकूमशाहीकडे नेणारा खात्रीशीर मार्ग ठरू शकतो. त्यामुळे बाबासाहेबांप्रती प्रतिकात्मक स्वरुपात निष्ठा बाळगणाऱ्या पक्ष संघटनांची उपरी भक्ती जास्त काळ लोकांच्या पचनी पडणार नाही.     

हेही वाचा : आंबेडकरांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्राचे कुतूहल ​

बाबासाहेबांचे विचार आणि व्यक्तीमत्व अधिक प्रगल्भतेने समजून घेण्यासाठी उदारशिल-मानवतावादी दृष्टीकोण असणे आवश्यक आहे. आंबेडकरवाद हे "भवतु सब्ब मंगलम" या बुध्दाच्या सर्वसमावेशी तत्वाला बांधील अशा समता व न्यायवादी समाज निर्मितीचे रसायन आहे. स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय व शांती या आधुनिक पंचशिलेवर आधारीत लोकशाही व्यवस्थेला अभिप्रेत असलेला भारत निर्माण करण्यसाठीचा व्यवहारिक प्रकल्प आहे. प्रज्ञा, शिल व करुणा या त्रीसुत्री तत्वातून राष्ट्रबांधणीच्या या प्रकल्पाची निर्मिती झाली आहे. आधुनिक भारताचे जबाबदार नागरिक म्हणून आपणही या तत्वांना आपल्या व्यक्तिगत, सामाजिक व राजकीय जीवनात अंगीकार करून भारतीय लोकशाही अधिक समृध्दशील करण्याची शपथ घेऊयात. जय भीम...जय....प्रबुध्द भारत !! 

(लेखक : दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क, दिल्ली विद्यापीठ येथे सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. मो.९९५३९१८०९० ईमेल-sudhir.maske@gmail.com)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudhir Maske article on Dr. BR Ambedkar

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: