गोष्टीतला नायक ... खलनायक

कुस्त्यांचं मैदान असो की तमाशाचा फड विजार-शर्ट, धोतर-टोपीवाले गावकरी बघितले की भारी वाटते.
गोष्टीतला नायक ... खलनायक
Summary

कुस्त्यांचं मैदान असो की तमाशाचा फड विजार-शर्ट, धोतर-टोपीवाले गावकरी बघितले की भारी वाटते.

कुस्त्यांचं मैदान असो की तमाशाचा फड विजार-शर्ट, धोतर-टोपीवाले गावकरी बघितले की भारी वाटते. पोशाखाला नाही तर माणसाला महत्त्व द्यायचे ही गोष्ट माझ्या मनात रुजली. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली तरी गावाकडच्या माणसाबद्दल आपुलकी राहिली.

हे असं का? याचं उत्तर लहानपणी आजोबांच्या मांडीवर बसून ऐकलेल्या एका सत्यकथेत आहे.त्या कथेने आमच्या मनात एक मूल्य रुजवलं आहे, नायक होता नाही आलं तरी चालेल, पण आपण खलनायक ठरू नये.

गोष्टीतला नायक ... खलनायक
South Cinema : साऊथचा 'हा' बिग बजेट चित्रपट करणार राडा, तीन सुपरस्टार दिसणार एकत्र!

लहानपणी एक गोष्ट नेहमी सांगितली जायची. पंचक्रोशीतील एक जण शिकायला शहरात गेला. तो शिकत असताना त्याचा बाप गावात मोलमजुरी करून त्याला पैसे पाठवायचा. तो आणि त्याची बायको प्रसंगी उपाशी झोपत; पण पोराला शहरात जाणाऱ्या एसटीमध्ये भल्या पहाटे जेवणाचा डबा दिला जाई.

आई पहाटे उठून स्वयंपाक करायची, बाप एसटीच्या चालकाजवळ डबा देऊन यायचा. उन्हाळा- पावसाळा- हिवाळा- म्हातारी पहाटे उठून स्वयंपाक करत राहिली आणि पावसाळ्यात साधी छत्री जवळ नसलेला बाप भिजत एसटी स्टॅण्डकडे जेवणाचा डबा घेऊन जात राहिला. जाताना स्वतः भिजायचा, पण जेवणाचा डबा भिजू देत नव्हता.

पोरगा शिकेल, नोकरीला लागेल मग आपलं दारिद्र्य दूर होईल, या प्रेरणेने आई-बाप राबत होते. पोरगाही मन लावून शिकत होता. पोरगा पदवीधर झाला आणि गावाकडे आला. आईने त्याची दृष्ट काढली. त्या दिवशी पुरणपोळी केली.

चार दिवस राहून पोरगा शहरात गेला. एक दिवस त्याचा निरोप आला नोकरीला लागलो म्हणून... ज्या दिवशी पोरगा नोकरीला लागला, त्या दिवशी वडिलाने गावातील सगळ्या देवांना नारळ फोडले. असेच लक्ष राहू दे असे म्हणत ग्रामदैवतापुढे दंडवत घातला. दिवस सुरू राहिले.

पोरगा शहरात नोकरीला आणि आई-वडील गावाकडे. पोराने आता मला डबा पाठवू नका, असा निरोप दिला आणि मग डबा बंद केला. दिवस जाऊ लागले, पोराचा आता कसलाही निरोप नव्हता. पोरगा काहीही संपर्क करत नव्हता. पोरगा नोकरीला आहे, त्यात नोकरी मोठ्या ऑफिसात. त्याच्या मागे व्याप असेल म्हणून तो निरोप देत नसेल अशी मनाची समजूत करून आई-बाप गप्प राहिले.

एका सकाळी म्हातारी उठली, नवऱ्याला म्हणाली, ‘‘अहो, रातभर पोरगं सपणात येतंय, तुम्ही काहीबी करा आणि आज जा. पोराच्या जीवाला बरं नसंल त्याशिवाय माझ्या सपणात येणार नाय.’’ बापालाही तसेच वाटू लागले. मग तिने पोराला आवडणारी भाजी आणि चपात्या करून दिल्या. घरात गव्हाचे पीठ नव्हते म्हणून शेजारच्या घरातून पीठ आणले;

पण पोराच्या आवडीचे जेवण दिले. ते जेवण घेऊन बाप शहरात गेला. त्या शहरात उतरल्यावर पत्ता शोधत शोधत मुलाच्या ऑफिसजवळ आला. ती काचेची मोठी इमारत बघून पाहिल्यांदा त्याचा जीव दडपून गेला; पण नंतर त्याचा त्याला अभिमान वाटला. आपला पोरगा या भव्य इमारतीत नोकरी करतो. बाहेर उभा असलेल्या वॉचमनला विचारल्यावर तो त्याला आत घेऊन गेला.

जाताना त्याने विचारले, ‘‘तुम्ही साहेबांचे कोण?’’

‘‘मी वडील आहे.’’ तो त्यांना घेऊन आत निघाला.

‘‘थांबा इथं, मी साहेबांना निरोप देऊन येतो.’’ त्यांना थांबवून तो साहेबांच्या केबिनकडे गेला. थोड्याच वेळात तो आला.

‘‘अहो पाव्हणं, खोटं का सांगितलं मला. साहेबांकडे आलाय म्हटल्यावर मी तुम्हाला आत सोडलं असतं की...’’

गोष्टीतला नायक ... खलनायक
Mumbai : बारावे कचरा प्रकल्पातील कचरा पुन्हा पेटला...

‘‘मी काय खोटं बोललो?’’

‘‘साहेबांचे वडील आहात म्हणून सांगितलं तुम्ही. साहेबांनी तुम्हाला काचेतून बघितलं आणि लगेच ओळखलं तुम्हाला...’’

‘‘काय म्हणला साहेब?’’

‘‘तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे बैल राखण्यासाठी काम करताय. तुम्हाला चहापाणी करून घालवायला सांगितलंय मला.’’

‘‘आरं आरं खरं सांगताय का? असं म्हणला...’’ हे म्हणतच असतानाच त्याच्या पायाखालची जमीन हादरल्यासारखी झाली...

‘‘व्हय, चला चहा घेऊ...’’ वॉचमन म्हणाला.

‘‘च्या नको आता. मी जातो आणि मी गेलो म्हणून सांगा तुमच्या साहेबाला. आता येणार नाही म्हणून सांगा. तूबी येऊ नको म्हणावं,’’ असं म्हणत तो निघाला...

खाली आला. हातातील भाकरी त्याने रस्त्याच्या कडेला बसलेल्या कुत्र्याला टाकली आणि सैरभैर अवस्थेत तो निघाला. दिवसभर नुसता फिरत होता. वाट दिसेल तिकडे जात होता. पोरगा असे का वागला? याचे उत्तर त्याला सापडत नव्हते. त्याला संताप येत होता, त्याच वेळी दुःख होत होते. सारखे भरून यायचे आणि डोळ्यातून पाणी यायचे. ऊन कमी झाले आणि त्याला गावातील घराची आणि बायकोची आठवण झाली.

‘‘काय म्हणाला पोरगा?’’ हा प्रश्न बायको विचारेल तेव्हा काय उत्तर द्यायचे, हेच त्याला कळत नव्हते. त्याच तंद्रित तो एसटी स्टॅण्डवर आला. शेवटची गाडी लागलेली. गाडीत बसला आणि गावाच्या दिशेने गाडी निघाली...

त्याने घरात येऊन बायकोला ही गोष्ट सांगितली. तिला खूप वाईट वाटले. आता त्याने कोणत्या शब्दांत ही गोष्ट बायकोला सांगितली असेल ते त्या घराच्या भिंतीनाच माहिती...

या गोष्टीतला म्हातारा मी पाहिला होता. म्हातारी मेली होती, पण ही गोष्ट अनेकदा ऐकल्यामुळे तालुका, जिल्हा किंवा अगदी पुण्यामुंबईत जर गावाकडचा साध्या वेशातील माणूस भेटला, की त्याची आपुलकीने विचारपूस करण्याचे संस्कार आमच्या गावातील समकालीन तरुणांवर नक्कीच झाले.

कॉलेज म्हटले की तिथल्या वातावरणाची हवा लागून थोडे पोशाखी होण्याचे दिवस, याच दिवसांत एसटीला गावाकडचा वयोवृद्ध माणूस दिसला तर त्याची जागा धरण्यासाठी आमच्यात स्पर्धा लागत असे. पुढे पुण्याला गेल्यावरही गावाकडची माणसे दिसली की आनंद व्हायचा. गावच्या पंचक्रोशीत कधी काळी घडून गेलेली घटना आणि ती ऐकून आमच्या मनावर असे परिणाम झाले होते...

कुस्त्यांचं मैदान असो की तमाशाचा फड; विजार-शर्ट, धोतर-टोपीवाले गावकरी बघितले की भारी वाटते. पोशाखाला नाही तर माणसाला महत्त्व द्यायचे ही गोष्ट माझ्या मनात रुजली. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली तरी गावाकडच्या माणसाबद्दल आपुलकी, आस्था राहिली.

हे असं का? याचे उत्तर लहानपणी पुन:पुन्हा ऐकलेल्या गोष्टीत आहे. त्या गोष्टीतला मुलगा खलनायक वाटतो आणि त्याला उत्तर म्हणून आपण आपल्या साध्या माणसाशी आपुलकीने वागायचे हे मीच नाही, तर माझ्यासोबतच्या ही गोष्ट ऐकलेल्या अनेकांनी ठरवलेले आहे.

माझे अनेक सहकारी मातीशी नाळ जोडून आहेत आणि भव्य शहरात राहूनही त्यांच्या मनात गावातील साध्या साध्या माणसांबद्दल आपुलकी आहे. आजोबांच्या मांडीवर बसून ऐकलेल्या एका सत्यकथेने आमच्या मनात एक मूल्य रुजवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com