ढिंग टांग : गणित कोचिंग क्लासेस!

British Nandi writes  agnipath scheme army recruitment pravin darekar prasad lad
British Nandi writes agnipath scheme army recruitment pravin darekar prasad lad sakal

स्थळ : मुंबई, पंचतारांकित हाटेल ताज. द. मुंबई.

नानासाहेब फ. : (विद्यार्थ्यांना उद्देशून) मुलांनो, उद्या पुन्हा एकदा गणिताचा पेपर आहे. सगळ्यांची तयारी व्यवस्थित झाली ना?

विद्यार्थीवर्ग : (एकमुखाने) होऽऽऽ…

नानासाहेब फ. : (बजावून सांगत) पुन्हा एकदा सांगतो…(कागद दाखवून) हा असा कागद असेल. त्यावर नावं असतील! मी सांगितलेल्या चौकोनात टिकमार्क करायचा! कागद फोल्ड करायचा, आणि…अगदी सोप्पं आहे…

विद्यार्थी दरेकर प्रवीण : (उभं राहून) ते गणित समजावून सांगा ना सर! अकरा गुणिले शंभर भागिले २८५ अधिक एक…ते!!

विद्यार्थी लाड प्रसाद : (गोंधळून) ते मागल्या टायमाला चुकलं होतं सर!!

नानासाहेब फ : (आश्वासक सुरात) यंदा नक्की पास होशील! मी आहे ना…? चला, उघडा वह्या…हं!

एक विद्यार्थी आमदार : (कंटाळून) पुढल्या वेळेला हाटेल बदला सर! बाकीच्या लोकांनी भारी भारी हाटेलात कोचिंग क्लासेस काढलेत!

क्लास मॉनिटर विद्यार्थी पाटील चंद्रकांत : (आरडाओरडा करत) कोण हॉटेल बदलायची भाषा करतोय?

ईडीचा पेपर याच्यापेक्षा अवघड असतो, समजलं ना? गप सोडवा गणितं…(गोंधळात वर्ग सुरु होतो.)

स्थळ : पंचतारांकित हॉटेल फोर सीझन्स, वरळी.

नानासाहेब फ : (नेहमीप्रमाणे सवयीने) केंद्र सरकारचा निषेध करुन मी आज तुम्हाला महत्त्वाचं गणित शिकवणार आहे. या गणितात पहिली पसंती आणि दुसरी पसंती अशा अनिवार्य स्टेप आहेत. स्टेप बाय स्टेप गणित सोडवावं लागणार आहे. केंद्र सरकारचा निषेध करुन आपण ते सोडवायला हवं.

विद्यार्थी जगताप भाई : एक मिनिट…सर, इथं एक शंका आहे!

विद्यार्थी थोरात बाळासाहेब : (कंटाळून) नका ना भाई! सगळं नीट शिकिवतानी लक्ष दिलं असतं तर शंका आलीच नसती ना? कुठं पुन्हा अकरा गुणिले शंभर अधिक एक भागिले २८५ करायलाय? जाऊ द्या, जे हुईल ते हुईल!!

नानासाहेब फ. : (वैतागून) कसंही सोडवा; पण यावेळी केंद्र सरकारचा निषेध करुन घोळ घालू नका म्हंजे झालं! तुम्ही नापास झाला की केंद्र सरकारचा निषेध करुन हायकमांड आम्हाला नापास करंल! चला, करा निषेध आणि काढा वह्या…

एक विद्यार्थी आमदार : (उभं राहून) पुढल्या वेळेला आपण ताजला क्लास घेऊ या सर! (पुन्हा गोंधळ.)

स्थळ : पंचतारांकित हॉटेल ट्रायडंट, नरिमन पॉइंट.

दादासाहेब बारामतीकर : (निक्षून सांगत) मुलांनो, कुठलं गणित कसं सोडवायचं हा ज्याला त्याला घटनेने अधिकार दिला आहे. कोण कुठे कसा चमत्कार करेल, हासुद्धा घटनेनेच दिलेला अधिकार आहे!

विद्यार्थी नाथाभाऊ खडसे : (काकुळतीनं) तुम्ही मनावर घ्या सर, ते पहाटेसारखं नको…

दादासाहेब बा : (दातओठ खात) अकरा गुणिले शंभर अधिक एक भागिले २८५…मरु दे! चमत्कार करा, म्हंजे झालं!! (वर्गात एकच गोंधळ उडतो)

स्थळ : पंचतारांकित हॉटेल, वेस्टीन, पवई.

वर्गात चिडीचूप शांतता आहे. सर्व मुले वर्गशिक्षक उधोजीसर यांच्याभोवती गोळा होऊन त्यांनाच गणित समजावून देत आहेत.

उधोजीसर : (विजयी आवाजात) गेलं उडत ते तुमचं अकरा गुणिले शंभर भागिले यंव नि त्यंव!...आपल्या वर्गाचा निकाल शंभर टक्के लागणार म्हंजे लागणारच! किंबहुना लागलाच पाहिजे! का नाही लागणार? लावल्याशिवाय राहणार नाही! जय महाराष्ट्र!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com