Sunday Special : अस्तित्वाच्या मुळावर

Forest Report
Forest Report

नुकताच भारतीय वनांच्या सद्यःस्थितीवर भारत सरकारचा २०१९ साठीचा अहवाल (ISFR) प्रसिद्ध झाला. भारताचं एकंदर वनक्षेत्र वाढल्याचं अहवालात म्हटलंय. परंतु, यात मेख अशी आहे की, एकूण वनांपैकी मोठ्या झाडांचं वनक्षेत्र घटल्याचं दिसतंय. याचा अर्थ असा की, अशी जंगलं, जी जैवविविधतेसाठी महत्त्वाची आहेत त्यांचं संरक्षण नीट होत नाही. शिवाय बरेचसे जुन्या वनीकरणाचे भूभागसुद्धा यात वन म्हणून मानले जातात, जेथे परदेशी झाडांची लागवड आहे. निलगिरी, सुबाभूळ आणि ग्लिरिसीडियाची वनं यात मुख्यत्वे मोडतात, ज्यांचं परिसंस्थेच्या दृष्टीने महत्त्व शून्य आहे. 

सह्याद्री आणि सातपुड्याची जंगलं ही महाराष्ट्रासाठी महत्वाची वनक्षेत्रं आहेत. राष्ट्रीय प्राणी वाघाचं ते आश्रयस्थान म्हणता येईल. भविष्यात रॉयल बेंगाल टायगर या प्रजातीचं अस्तित्व या दोन पर्वतरांगांमधील वनांवर अवलंबून आहे. विशेषतः पश्‍चिम घाटातील वनांमध्ये प्रदेशनिष्ठता (endemism) जास्त प्रमाणात आढळते. म्हणजेच येथे अशा प्रकारचे जीव आढळतात, जे जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. अशा प्राणी-वनस्पतींचे संवर्धन जर या क्षेत्रात झाले नाही, तर त्या प्रजाती संपूर्णपणे नष्ट होण्याची शक्‍यता दिसते. झाल्याच या प्रजाती नष्ट तर आपल्याला काय, याच अविर्भावात बव्हंशी लोक आहेत. विशेषकरून शासनकर्ते आणि विकासकर्ते. असं वाटण्यामागं परिसंस्थेबद्दलचं अज्ञान आहे.  

कोणतीही एक प्रदेशनिष्ठ प्रजाती फक्त याच क्षेत्रात उत्क्रांत होण्यामागं काही परिसंस्थात्मक कारणं निश्‍चीत असतात. या प्रजातींना पोषक वातावरण फक्त येथेच असल्यानं ते याच वनांमध्ये वाढू शकतात. याचाच अर्थ असाही की, या प्रजाती इथल्या परिसंस्थेमधील कैक घटकांशी जोडलेल्या आहेत. यात जैविक आणि अजैविक असे दोन्हीही घटक आहेत. ते घटक कमी अथवा प्रदूषित झाले तर त्याचा सरळ परिणाम या प्रजातींवर होणारच, हे लक्षात घेतले पाहिजे. 

याचाच व्यत्यास (corollary) असा होईल की, जर या प्रजाती नष्ट झाल्या तर त्याचा सरळ परिणाम त्या जैविक-अजैविक घटकांवरसुद्धा नक्कीच होणार आहे. परिसंस्थेमध्ये जीवनाचे जाळे (web of life) असते; यात जैविक, अजैविक दोन्ही घटक समाविष्ट आहेत. यातला कोणताही एक घटक बाधित झाला, तर त्याचा दूरगामी परिणाम (ripple effect) संपूर्ण परिसंस्थेवर होतो.

आता पुढचा मुद्दा असा की, मानवी अस्तित्वाशी संलग्न सर्व घटक हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षारीत्या कोणत्या ना कोणत्या परिसंस्थेशी जोडलेले आहेत. म्हणजे एखादा परिसंस्थेचा घटक संपणं हे शेवटी मानवी अस्तित्वाच्या मुळाशी येणार आहे. कारण आणि परिणाम (Cause and Effect) यांच्यातलं अंतर बरंच असल्यानं ही गोष्ट समाजाला सहज आकलन होत नाही. 

सह्याद्री आणि सातपुडा वनं ही उत्तर आणि दक्षिण भारतातील वन्यजीवांना जोडणारे हिरवे दुवे (green corridors) आहेत. त्यामुळेच छोटे मोठे सर्व प्रकारचे वन्यजीव फार मोठ्या भूभागामध्ये विचरण करू शकतात. यामुळेच अशा प्रजातींचा जनुकीय बांध (gene pool)  सशक्त राहून त्यांचे दूरगामी  अस्तित्व सुनिश्‍चित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com