पंख सकारात्मकतेचे : सकारात्मकताच कामी आली!

positivity
positivityesakal



लेखक - डॉ. हेमंत ओस्तवाल

आज मी माझे बोनस आयुष्य जगतोय. होय, मी याला ‘बोनस’च म्हणतो, कारण मी ॲन्जिओग्राफी करून घेतली नसती, तर कदाचित माझे आयुष्य तेथेच संपूर्ण गेले असते. माझे असे बोनस आयुष्य मी अगदी आनंदाने, मस्तीने, संपूर्ण सकारात्मकतेने जगत आहे. केलेली ॲन्जिओप्लास्टी, टाकलेले चार स्टेंट्स हे मी फक्त हृदयात ठेवले आहेत. त्यांची योग्य ती काळजी, त्यांचे रोजचे उपचार हे सर्व काही मी व्यवस्थित करत आहे. ॲन्जिओप्लास्टी, हे चार स्टेंट्स यांना कधीही माझ्या मेंदूमध्ये शिरकाव करू दिला नाही; अन्यथा रोज क्षणाक्षणाला माझी ॲन्जिओप्लास्टी होत राहिली असती.

positivity
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी ‘सेव्ह साईल’चा संदेश


...आणि तत्क्षणी माझे दुसरे मन म्हटले, की काय कमाल आहे हेमंत तुझी! एकदशांश सेकंद फिरणाऱ्या स्नायूमधील हालचालीला तू हृदयविकाराचे निदान करत आहेस. अरे तू काही कार्डिओलॉजिस्ट नाही. तू जनरल फिजिशियन आहेस, तू इतका फिट आहेस, वर्षानुवर्षे तू चांगला व्यायाम करतो आहेस, तुझ्या अगदी परवाच्या तपासण्यादेखील अगदी व्यवस्थित आलेल्या आहेत. हृदयविकारांमध्ये आढळून येणारी इतर कुठलीही चिन्हे तुला नाहीत.

ना तर तुझ्या डाव्या हातात दुखते आहे, ना तर उजव्या ना काही छातीमध्ये धडधड ना काही तुला थंडगार घाम सुटला ना, तर तुला व्यायाम करताना कधी दम लागला, ना तुला छातीमध्ये जडपणा जाणवला. थोडक्यात काय तर तुला कुठलेही हृदयविकारांमध्ये आढळून येणारे चिन्ह नाहीत. हा जो गोलाकार फिरला तशा हालचाली शरीराच्या इतर स्नायूंमध्ये होतच असतात. त्यामुळे तू विसरून जा आणि मीही दुर्लक्ष केले. तेवढ्यात डॉ. पूजा आणि डॉ. सचिन या जोडीचे जेवण संपले. डॉ. पूजाने मला बळजबरीनेच झोपायला पाठवून दिले आणि मी कधी नव्हे तो इतक्या लवकर झोपायला वर बेडरूममध्ये गेलो. साधारणतः सव्वानऊच्या सुमाराला मला गाढ झोप लागली आणि आणि हे सर्वांत महत्त्वाचे सकारात्मक लक्षण होते.

positivity
WhatsApp वर करा 'हे' पाच नंबर सेव्ह अन् ऑर्डर-बुकींग होणार सहज

कारण जर हा हृदयविकाराचा त्रास असता, तर मला एवढी छान गाढ झोप लागलीच नसती. मी अत्यंत गाढ झोपी गेलो; परंतु थोड्याच वेळात म्हणजेच रात्री पावणेदहाच्या आसपास मला तेवढ्या गाढ झोपेत जाणवले, की तसाच गोल पुन्हा एकदा माझ्या खांद्याच्या स्नायूमध्ये अंदाजे एकदशांश सेकंद फिरला आहे. मला माझ्या पहिल्या मनाने पुन्हा एकदा सांगितले, की हेमंत, जेव्हा एवढ्या गाढ झोपेत तुला फिरलेला गोल जाणवला याचा अर्थ तू गांभीर्याने घ्यायला हवंस. पहिली गाढ झोप सहजासहजी मोडत नाही आणि तुला कुठलाही डिस्टर्बन्सदेखील नव्हता आणि अशा प्रकारचे चिन्ह तुझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही तू अनुभवलेले नाहीस.

हा एक वेगळाच प्रकार आहे. त्यामुळे तू ताबडतोब स्वतःच्या सर्व तपासण्या करून हा हृदयविकार तर नाही ना, हे बघितले पाहिजे. ९९.९९ टक्के हा हृदयविकार नाही; परंतु आपल्या ओस्तवाल परिवाराची हृदयविकाराच्या बाबतीत असलेली वाईट आनुवंशिकता बघता तू ताबडतोब ऊठ आणि हा गोल हृदयविकाराचा, तर नाही ना, याची खात्री करून घे. अर्थातच दुसरे मन ताबडतोब म्हटले, नाही रे, हा नक्की नाही. तू कारण नसताना राईचा पहाड बनवतो आहेस; परंतु येथे माझी सकारात्मकता कामी आली आणि ताबडतोब उठलो. सर्वांत पहिले आमचे सुयश हॉस्पिटलचे कार्डियालॉजिस्ट आणि फिजिशियन यांना फोन केला आणि ते त्वरित हॉस्पिटलला यायला निघालेदेखील.

आमची डॉक्टर जोडी डॉ. सचिन व डॉ. पूजा यांना बरोबर घेतले आणि मीही दहाच्या आसपास आमच्या सुयश हॉस्पिटलला पोचलो. साडेदहापर्यंत कार्डियालॉजिस्ट फिजिशियन यांनी बघून सर्व प्रकारच्या तपासण्यादेखील केल्या. त्यामध्ये टूडी इको, ईसीजी, रक्तातील तपासण्या झाल्या आणि सुदैवाने एकूण एक तपासणीचे निष्कर्ष अगदीच नॉर्मल होते. व्यवस्थित होते. सर्व झाल्यानंतर मी आमच्या डॉक्टरांना विचारले, ‘‘सर्व काही व्यवस्थित आहे व मी आता घरी जातो.’’ परंतु आमच्या ओस्तवाल घराण्याचा आनुवंशिकतेचा इतिहास जो की त्यांना पूर्ण ज्ञात होता आणि आमच्या संजूभाऊंच्या हृदयविकाराच्या निदानावेळी त्यांना बसलेला शॉक या दोन गोष्टींमुळे दोघांनीही मला सांगितले, की सर, आपण हॉस्पिटलला ॲडमिट होऊन जा. आपण तीन ते चार-चार तासांनी दोनदा परत तपासण्या करू म्हणजे रात्री दीडच्या आसपास आणि सकाळी पुन्हा करू आणि मग ठरवू या.

positivity
काय आहे GB WhatsApp? तुमच्याकडे असेल तर लगेच करा डिलीट!

मी त्यांना सांगितले, की हरकत नाही. पण मला तेवढ्यासाठी ॲडमिट कशाला करता? मी आत्ताच दीडपर्यंत येथेच थांबतो, मग ठरवू या. मग आम्ही सर्व जण सुयश हॉस्पिटललाच थांबलो. छान गप्पाष्टकांचा कार्यक्रम रंगला. मैफल रंगली. दोन वेळेला कॉफीपानदेखील झाले आणि दीडला सर्व तपासण्या परत केल्या. अर्थातच सर्व निष्कर्ष पुन्हा एकदा अगदी छान नॉर्मल, मग मी त्यांना सांगितले, की मी अतिशय सावध आहे. माझी चिंता करू नका. काही वाटलं तर मी ताबडतोब येईन. अर्थातच सकाळी तर येणारच; पण त्याआधीही काही वाटलं तर येईन. मी आता घरी जातो. मला फक्त एवढं सांगा, की मी सकाळी सकाळच्या वॉकला जाऊ का?’’ अर्थातच दोन्ही डॉक्टरांकडून नकारघंटाच आली. ते तर मला घरीही सोडायला तयार नव्हते. मी मात्र त्यांना समजावून सांगून घरी आलो. एकदम छान झोप लागली.

रात्रीतून परत केव्हाही एकदाही गोल फिरला नव्हता. मला कुठलाही त्रास नव्हता. सकाळी फ्रेश होऊन आठला सुयश हॉस्पिटललाही पोचलो. आमचे फिजिशियनदेखील पोचले होते आणि पुन्हा एकदा सर्व तपासण्या आम्ही परत केल्या. अर्थातच या वेळेचे निष्कर्षदेखील रात्रीच्या दोन्ही तपासण्यांसारखेच अगदी व्यवस्थित होते. नॉर्मल होते, त्यानंतर मी माझ्या दैनंदिन कामाला लागलो. पावणेनऊच्या सुमाराला आमच्या आयसीयूमधील सीनिअर मेडिकल ऑफिसरचा फोन आला, की आपले फिजिशियन आणि आपले कार्डियालॉजिस्ट यांची आत्ताच जवळपास दहा-बारा मिनिटे तुमच्याबद्दलच चर्चा झाली. चर्चेचा गोशवारा असा आहे : दोघेही चर्चा करीत होते, की डॉक्टर ओस्तवाल कधीही, कसली तक्रार करीत नाहीत.

आजतागायत आपण त्यांना एकदाही तक्रार करताना बघितले नाही. त्यांची या विषयातील अनुवांशिकताही खराब आहे. त्यांच्या लहान भावाचे बायपासदेखील आत्ताच आपण करून घेतले आहे. सरांची पण ॲन्जिओग्राफी करून घ्यावी की काय? पुढे त्यांचा याच विषयावरती बराच खल झाला. दोघांचेही म्हणणे असे पडले, की एकही रिपोर्ट खराब नाही. त्यांना कुठलाही त्रास नाही. अपवाद फक्त त्या फिरलेल्या दोन वेळच्या गोलाचा. तशी स्नायूंची हालचाल शरीरात अनेक ठिकाणी होतच असते. त्यांचा फिजिकल फिटनेस खूपच चांगला आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत. उगाचच ॲन्जिओग्राफी करू नये. कारण नसताना रेडिएशन त्यांना देऊ नये आणि म्हणून दोघांनीही सहमतीने ॲन्जिओग्राफी न करण्याचा निर्णय घेतला. ही सर्व माहिती त्याने दिली आणि मी त्वरित आमच्या कार्डियालॉजिस्टला फोन लावला. एवढेच सांगितले, ‘किती वाजता करायची?’ त्याला प्रश्न पडला. ‘नेमकं काय करायचं आहे.’ मग मी सांगितले, ‘‘आपल्याला ॲन्जिओग्राफी करायची ना?’’ डॉक्टरांना आश्चर्य वाटले, की जी गोष्ट त्यांच्यामध्ये आणि फिजिशियनमध्ये झाली होती ती मला कशी माहिती? थोडेसे कांढावलेच ते! सांगू लागले, ‘‘नाही नाही, असं काही नाही.

positivity
स्वरा सेव्ह काय करणार, डिलीट काय करणार?

आम्ही फक्त चर्चा करीत होतो, पण तुम्हाला ॲन्जिओग्राफीची गरज नक्कीच नाही. तुम्ही काही ती करू नका उगाचच. रेडिएशन होईल.’’ मग पुढचे सात ते आठ मिनिटे आमचे आर्ग्युमेंट चालले. मी सांगत होतो, ‘‘करायची’’ आणि डॉक्टर निक्षून सांगत होते, ‘‘करायची गरज नाही.’’ आणि शेवटी मी यशस्वी झालो. नऊ वाजत आले होते. लगेचच साडेनऊ-पावणेदहाला करून टाकू, असे ठरले. ॲन्जिओग्राफीसाठी मला टेबलावर घेतल्यानंतरदेखील कार्डिओलॉजिस्ट समजून सांगत होते, ‘‘काहीच निघणार नाही. तुम्ही अगदी ठणठणीत आहात. तुम्ही उगाचच काळजी करता आहात.’’ मी त्यांना सांगितले, ‘‘काही निघाले नाही, तर उत्तमच आणि निघाले तर अतिउत्तम. मला अजिबात टेन्शन नाही. तुम्ही मात्र टेन्शन घेऊ नका.’’ आणि डॉक्टरांनी डाय इंजेक्ट केला. मी स्वतः कार्डियालॉजिस्ट नसल्याने ॲन्जिओग्राफीमध्ये माझा काही फारसा अनुभव नाही; परंतु दोन-तीन ब्लॉकेजेस सहज डिटेक्ट मलाही करता येतात. परंतु मी स्क्रीनवर बघत असताना मला जाणवले की गडबड मोठी दिसत आहे.

कारण मी दोन-तीन ब्लॉक मोजले की पुढे गोंधळत होतो मला काही माझे ब्लॉकेजेस मोजता येईना. मी लगेचच डॉक्टरांच्या तोंडाकडे बघितले, तर डॉक्टरांचे तोंड खूपच उतरलेले होते. मी विचारले, ‘‘किती?’’ डॉक्टर काही बोलेच ना. मग मी सांगितले, ‘‘मला कळत आहे की ब्लॉकेजेस खूपच जास्त आहेत; परंतु दोन-तीनच्या पुढे मोजताना माझा गोंधळ होतो आहे म्हणून सांगा.’’ अतिशय तोंड उतरलेल्या चेहऱ्याने माझे कार्डियालॉजिस्ट बोलले. ‘‘एकूण सहा ब्लॉकेजेस आहेत.’’ आणि प्रतिक्षिप्त क्रियेने मी बोलता झालो, ‘‘माझं अभिनंदन कर! माझं अभिनंदन कर!!’’ डॉक्टर गोंधळलेत. आधीच ते खूप नाराज झाले होते आणि माझे जगावेगळे अपेक्षेच्या अगदी विरुद्ध टोकाचे मी बोलत होतो, ‘‘माझं अभिनंदन करा!’’ ‘‘सर, सहा ब्लॉकेजेस आहेत. एलएडीमध्ये तीन आहेत. आरसीएमध्ये एक आहे आणि अजून दोन आहेत आणि एलएडी आणि आरसीएमधले सर्व ब्लॉकेजेस ९० टक्क्यांहून अधिक आहेत आणि तुम्ही कसं काय अभिनंदन करायला सांगता आहात?’’ डॉक्टरांचे जग रहाटीप्रमाणे बरोबरच होते. कारण एलएडीमध्ये एक ब्लॉक जरी असेल तो जीवघेणा ठरू शकतो.

अर्थातच हृदयामधील कुठलाही ब्लॉक हा जीवघेणा ठरू शकतो आणि माझे तर तीन-तीन तेही डायगोनल ब्लॉकस एलएडीमध्ये होते, जे की अजूनच जास्त धोकादायक होते. पुढच्या काही दिवसांमध्ये मला हार्टअटॅक येण्याचे चान्सेस खूपच जास्त होते आणि एकदा का अटॅक आला, तर मी वाचण्याची शक्यता खूपच कमी होती. जवळपास नाहीच्या बरोबर असा धक्कादायक प्रकार घडूनही मी अत्यंत हसऱ्या सकारात्मक चेहऱ्याने डॉक्टरांना सांगत होतो की माझे अभिनंदन करा! डॉक्टर अजूनच गोंधळून गेले होते. ते परत परत सांगत होते, ‘‘असं काय करता? सहा ब्लॉकेजेस आहेत’’ मग मी त्यांना समजावून सांगितले, ‘‘सहा जाऊ दे, यातल्या एखाद्या जरी ब्लॉकने त्रास दिला, हार्टअटॅक आणला तर ऑन द स्पॉट मृत्यू १०० टक्के खात्रीने आहे. बरोबर ना?’’ डॉक्टर बोलले, ‘‘होय बरोबर.’’ ‘‘म्हणजे एवढा जवळ मृत्यू येऊन ठेपला असताना आपण किती नशीबवान आहोत, की कुठलाही त्रास होण्याच्या आधीच आपण बरोबर निदान केलं आहे, तेही कुठलीही हानी न होऊ देता.’’ (एकदा का हार्टअटॅक येऊन गेला की आपल्या हृदयाचे स्नायू काहीना काही कमकुवत होतातच) यापेक्षा आपल्याला वेगळं काय हवं ? LET ME SAY THANKS TO GOD!'' डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ काही लपत नव्हता. मग मी त्यांना समजावून सांगितले, ‘‘अशी इतकी भयावह परिस्थिती असताना आपण अगदी योग्य वेळी निदान करून आता आपण ताबडतोबच प्लास्टी किंवा बायपास करून घेऊ म्हणजे काही धोका राहील का?’’ ‘‘नाही.’’ आणि म्हणून माझं अभिनंदन करा.

तरीही डॉक्टरांनी उतरलेल्या आवाजातच माझे अभिनंदन केले. मी बाहेर येण्याच्या आधीच सहा ब्लॉकेजेसची बातमी आमच्या सुयश हॉस्पिटलचे डायरेक्टर्स, कन्सल्टंट, माझे हितचिंतक, आप्तस्वकीय या सर्वांपर्यंत पोचली होती. वातावरण अत्यंत गंभीर झाले होते आणि मी तर बाहेर अगदी हसऱ्या चेहऱ्याने आलो होतो आणि सर्वांना सांगत होतो, की माझे अभिनंदन करा! कोणी काही बोलायला तयार नव्हते. सीरियस होते. उलट मला सांगत होते, ‘‘तू जास्त बोलू नकोस. आराम कर.’’ माझा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना समजावून सांगितले आणि मित्रांनो सेलिब्रेशन करण्याची वेळ आहे. आपले काही नुकसान झालेले नाही. ना तर मला हार्टअटॅक आला आहे. त्यामुळे मला आराम वगैरे असली काहीही गरज नाही. चला, आपण पुढचे ठरवू या, आता काय, कसे, कधी, कुठे करावयाचे?’’
मला रूममध्ये शिफ्ट केले गेले. भारतातील नामवंत अशा सहा कार्डियालॉजिस्टशी संपर्क केला. त्यामध्ये डॉ. मॅथ्यूज या जगप्रसिद्ध कार्डियालॉजिस्टचादेखील समावेश होता. ॲन्जिओग्राफी ई-मेलवर पाठवली. सर्वांनी एकसुरात ॲन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला.

माझी ॲन्जिओप्लास्टी ही सरळ सरळ नव्हती तर एका सुपर टेक्निकने म्हणजे डीके क्रश टेक्नॉलॉजी वापरून करावयाची होती आणि म्हणून मुंबईतील एका प्रख्यात कार्डियालॉजिस्ट यांच्याकडून करून घेण्याकरिता मी मुंबईला ६ ऑगस्ट २०२० ला ॲडमिट झालो. ७ ऑगस्ट २०२० ला सकाळी साधारणतः नऊला मला टेबलावर घेतले. डॉक्टरांनी मला प्रश्न केला, की स्पेशल टेक्निकने ॲन्जिओप्लास्टी करावयाची असल्याने मला किमान दोन-अडीच तास वेळ लागू शकतो. सर तुम्ही झोपेची गोळी घेता का? म्हणजे तुम्हाला टेन्शन येणार नाही. रिलॅक्स राहाल आणि त्यांना त्यांच्या अपेक्षेहून अगदीच वेगळे उत्तर माझ्याकडून मिळाले. अर्थातच त्यांनी मला हा प्रश्न इंग्रजीमध्ये विचारला होता मी त्यांना उत्तर दिले, "SIR, LET ME ENJOY THE PROCEDURE सर, मला प्रोसिजरचा आनंद घेऊ द्या.’’ डॉक्टर बघतच राहिले. माझी ॲन्जिओप्लास्टी अगदी व्यवस्थित कुठल्याही अडथळ्यांविना पार पडली. चार स्टेंट्स टाकले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर राउंडला आले.

जवळपास अर्धा तास त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या. त्यांनी माझ्याशी कबूल केले, की त्यांच्या २५ वर्षांच्या करिअरमध्ये मी पहिलाच पेशंट होतो, की ज्याने असे उत्तर दिले होते. अर्थातच त्यांना माझी सकारात्मकता पावलोपावली जाणवली, भावली. सगळे ऐकून डॉक्टर बोलले, या सकारात्मकतेमुळेच हा आजार जो ३६ व्या वर्षाच्या आसपास येऊ शकत होता, तो वयाच्या ५७ व्या वर्षी आला आहे आणि जो की १०० टक्के मृत्यूला आमंत्रित करणार होता, त्याच्यावरही कुठल्याही नुकसानीविना यशस्वीरीत्या मात केली आहे ती निव्वळ आणि निव्वळ सकारात्मकतेने. सकाळी मला ‘आयसीयू’मधून वॉर्डमध्ये शिफ्ट केले आणि सायंकाळी म्हणजे ८ ऑगस्टला पाचला डिस्चार्ज केले. रात्री साडेनऊला घरी पोचलो आणि १० ऑगस्टला सकाळी साडेनऊला सुयश हॉस्पिटलला येऊन दैनंदिन कामकाजाला सुरवातदेखील केली होती म्हणजेच ॲन्जिओप्लास्टी झाल्याच्या ४८ तासांत मी माझ्या कामकाजाला सुरवात केली होती आणि मोजून फक्त ७२ तासांनी माझा सकाळचा मॉर्निंग वॉकदेखील सुरू केला होता.
आणि आज मी माझे बोनस आयुष्य जगतोय. होय, मी याला ‘बोनसच’ म्हणतो. कारण ती ॲन्जिओग्राफी करून घेतली नसती तर कदाचित माझे आयुष्य तेथेच संपूर्ण गेले असते. तर माझे असे बोनस आयुष्य मी अगदी आनंदाने, मस्तीने, संपूर्ण सकारात्मकतेने जगतो आहे. केलेली ॲन्जिओप्लास्टी, टाकलेले चार स्टेंट्स हे मी फक्त हृदयात ठेवले आहेत. त्यांची योग्य ती काळजी, त्यांचे रोजचे उपचार हे सर्व काही मी व्यवस्थित करतो आहे. ॲन्जिओप्लास्टी, हे चार स्टेंट्स यांना कधीही माझ्या मेंदूमध्ये शिरकाव करू दिला नाही, अन्यथा रोज क्षणाक्षणाला माझी ॲन्जिओप्लास्टी होत राहिली असती.
आजच्या माझ्या या साप्ताहिक सदर ‘पंख सकारात्मकते’च्या वर्षभर चालणाऱ्या शेवटच्या अंकामध्ये खरी सकारात्मकता कशाला म्हणतात आणि ही सकारात्मकताच कशी तुमच्या आयुष्याला कितीही कठीण बिकट परिस्थितीत सुंदर वळण देऊ शकते हे उदाहरणासहित दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी वर्षभर दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल स्नेहपूर्वक धन्यवाद!
(लेखक नाशिकमधील प्रथितयश सुयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com