पंख सकारात्मकतेचे : प्रथा-परंपरांची ‘कॅप्सूल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tradition

पंख सकारात्मकतेचे : प्रथा-परंपरांची ‘कॅप्सूल’

लेखक - डॉ. हेमंत ओस्तवाल

आपण बघता बघता आतापर्यंत या सदरामध्ये एकोणीस वेगवेगळे सकारात्मकतेचे रंग बघितले, अनुभवलेत आणि मला खात्री आहे आपला प्रत्येकाचा सकारात्मकतेवरचा विश्वास हा दिवसेंदिवस दृढ होत जाणार. सकारात्मकतेने आपल्या जीवनामध्ये खूपच चांगला, आयुष्याला आकार देणारा, चांगले वळण देणारा, कित्येक प्रसंगी जीव वाचविणारा बदल घडतो.
चला तर मग, आज अजूनच एक वेगळा सकारात्मकतेचा रंग बघू या. खरेतर हा एक रंग नव्हे किंवा ही एकच सकारात्मकतेची गोष्ट आहे असेही नव्हे. मी आज फार वेगळ्या विषयात आपणा सर्वांना घेऊन जाणार आहे. आज मी आपल्या वाडवडिलांच्याही पूर्वजांकडे म्हणजे अगदी चाकाचा शोध लागण्याच्याही आधी असणाऱ्या पूर्वजांकडे आपल्या इतिहासामध्ये आपणा सर्वांना घेऊन जाणार आहे. आज आपण पूर्वजांकडे असलेल्या सकारात्मकतेबद्दल बोलणार आहोत, समजून घेणार आहोत.

हे समजून घेण्याकरिता आपणास आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या अनेक रूढीपरंपरांचा अभ्यास करायला लागणार आहे. जसे की चातुर्मास संकल्पना, चातुर्मासातील अनेक प्रकारची व्रतवैकल्ये, अनेक प्रकारचे उपवास, अनेक प्रकारच्या पोथ्यांचे वाचन, भजने, कीर्तन इत्यादी इत्यादी. दुसरी परंपरा म्हणजे स्त्रियांना मासिक पाळीमध्ये चार दिवस बाजूला बसविणे. तिसरी परंपरा म्हणजे आमच्या जैन समाजातील पाणी उकळून गार करून पिणे, रात्री भोजन न करणे इत्यादी इत्यादी. चौथ्या परंपरेमध्ये वेगवेगळ्या वेळी येणारे सण, त्या वेळचे खानपान इत्यादी इत्यादी. पाचव्या परंपरेमध्ये लग्नकार्य, इतर मंगल कार्य यांचे मुहूर्त. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळे मुहूर्त असतात. सहावी परंपरा बघितली तर खासकरून उन्हाळ्यामध्ये कोणी बाहेर निघाले किंवा कोणी बाहेरून आले, की त्याला हातावर गुळाचा खडा आणि पाणी देण्याची अतिशय उपयुक्त पद्धत. सातवी परंपरा बघायची म्हटली, तर परीक्षेला जाताना आई, आजी, काकू, आत्या किंवा ताई हमखास दही-साखर भरविणार. आठव्या परंपरेचा विचार करायचा म्हटला, तर अगदी बरोबर भौगोलिक परिस्थितीप्रमाणे पेहराव. अशा किती रूढी-परंपरा सांगायच्या. अजून काही परंपरा आपण पुढच्या रविवारच्या २२ मे २०२२ च्या अंकात पंख सकारात्मकतेचेमध्ये बघणार आहोतच. काही रूढी-परंपरा मात्र विज्ञानाच्या कसोटीवर ज्या टिकल्या नाहीत त्या आपोआपच नामशेष होत चालल्या आहेत; परंतु आजही चांगल्या उपयुक्त अशा अक्षरशः शेकडो परंपरा आहेत.

हेही वाचा: भास की सत्य?

या सगळ्या परंपरांचा, रूढींचा अभ्यास करावयाचा म्हटला, तर अगदी एक जन्मदेखील कमी पडू शकतो. आपल्याला तर या छोट्याशा साप्ताहिक सदराच्या एखाददुसऱ्या अंकातून प्रातिनिधिक स्वरूपात समजून घ्यायच्या आहेत. परंतु त्याआधीही एक गोष्ट चांगल्यारीतीने समजून घ्यायची आहे, ती म्हणजे, या ज्या काही रूढी-परंपरा आहेत त्यांना पूर्वजांनी बहुतांश वेळा धर्माच्या कॅप्सूलमधून म्हणजेच आवरणामधून आपल्याला खाऊ घातल्या होत्या आणि आपण त्या आजही विनातक्रार, बिनदिक्कतपणे धर्माच्या नावावर पाळतो आहोत, अन्यथा आपण मानव नैसर्गिकरीत्या अगदी बरोबर जे करायला सांगितले त्याच्याविरुद्ध आपण कृती करत असतो. आपण स्वतःवरून विचार करा, की जेव्हा कोणी आपल्याला असे कर म्हणून ऑर्डर करतो, हुकूम सोडतो तेव्हा आपली मनःस्थिती काय असते. आपले मन बरोबर बंडखोरी करते. सांगितलेले करण्याची आपली इच्छा, तयारी नसते. त्याऐवजी कोणी छोटीशी विनंतीवजा सूचना जरी केली तरी आपण ती बऱ्यापैकी पाळत असतो आणि आपल्या या बंडखोर स्वभावाची आपल्या पूर्वजांना चांगलीच कल्पना असल्यामुळे त्यांनी या रूढी-परंपरांना बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप्सूल्समध्ये आवरणामध्ये टाकून आपणास दिलेल्या आहेत. आपले पूर्वज खरोखरच खूपच सकारात्मक होते. अभ्यासू होते. त्या काळी त्यांना सायन्स, मेडिकल सायन्स, सोशल सायन्स, जिओग्राफिकल सायन्स, हायजिन, मानसशास्त्र इत्यादी अशा जवळपास सर्वच शास्त्रांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.
चला तर मग बघू या. सकारात्मकता आणि रूढी-परंपरांचा संगम.

आपण पहिले बघू या चातुर्मासाबद्दल

चातुर्मास हा आपल्या सगळ्यांच्या आस्थेचा, जिव्हाळ्याचा, श्रद्धेचा विषय. चातुर्मास हा येतो बरोबर पावसाळ्यामध्येच. कसा बरं? पावसाळ्याचाच कालखंड चातुर्मासासाठी का निवडण्यात आला असेल हे सर्व समजून घेण्यासाठी आपणास चाकाचा शोध लागण्याआधीच्या काळाचा विचार करायला लागेल. त्या वेळची भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, मानसशास्त्र आणि वैद्यकीय परिस्थिती इत्यादी या सगळ्यांचा व्यवस्थित विचार करायला लागेल. पहिले आपण बघू या भौगोलिक परिस्थितीबद्दल. त्या काळी पावसाळा हा आजच्यापेक्षा फारच जोरदार असायचा. पावसाचे प्रमाण प्रचंड असायचे. इतके, की महिना महिना घराबाहेर पडणे अशक्य होत होते. त्या काळी चाकाचा शोध लागण्याअगोदर कुठल्याही प्रकारच्या गाड्या, वाहने असायचा विषयच येत नव्हता. सूर्यदर्शन होत नव्हते. कुठलेही कामकाज करणे अत्यंत अवघड होत असे. एकंदरीत या परिस्थितीमध्ये माणूस रिकामा घरी बसायचा आणि तो तरी काय करील जर बाहेरील परिस्थिती घराबाहेर पायही ठेवू देत नसेल. त्याला रिकामे बसण्याशिवाय काय पर्याय राहील? थोडक्यात, ही झाली भौगोलिक परिस्थिती.

माणूस कामाव्यतिरिक्त जर रिकामा घरी बसून राहिला, तर? आता आपण मानसशास्त्राबद्दल बघू या. ‘रिकामे मन सैतानाचे घर’ ही फार जुनी म्हण आपणा सर्वांना माहितीच असेल आणि ती तंतोतंत खरीही आहे. यात काहीच वाद नाही. जेव्हा जेव्हा माणूस रिकामा बसतो त्या वेळेस त्याला जास्तीत जास्त विकृतीच सुचत असते. सकारात्मक विचार, काही चांगले करावयाचे असे काही चांगले विचार शक्यतो सुचत नाहीत. याऐवजी कुठल्या न कुठल्या प्रकारची विकृती त्याला सुचत असते, मग ती गुंडगिरी प्रवृत्तीची असू शकते, ती महिलांच्या बाबतीत असू शकते, चोरीमारीविषयी असू शकते. थोडक्यात, यामुळे गुंडगिरी वाढायला लागते, स्त्रियांवरील अत्याचार वाढू शकतात, समाजामध्ये एक प्रकारची बेबंदशाही वाढू शकते अशा वेळी व्यसनांचे प्रमाणदेखील वाढू शकते. हे झाले गुंड प्रवृत्तीबद्दल. आपल्या पूर्वजांनी वैद्यकीय शास्त्राबद्दल कसा विचार केला हे बघू या. माणूस ज्या ज्या वेळी रिकामा बसतो त्या वेळी त्याला अनावश्यक खायलादेखील लागत असते. त्या वेळी नेमकी त्याला भूकही जास्त लागत असते आणि त्याला खायलादेखील आरोग्यदायी पदार्थांऐवजी आरोग्याला त्रासदायक असणारे पदार्थ (चखना,) तेलकट, चमचमीत, गोडधोड थोडक्यात हेल्दी फूड खाण्याचा अतिरेक होतो. याबरोबरच अजून कुठल्या गोष्टी एकतर नव्याने सुरू होत असतील किंवा आहे त्याचे प्रमाण वाढत असेल बरं? ते म्हणजे व्यसने. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तंबाखू सेवन असेल, इतर अमलीपदार्थ असू शकतात. मद्यपान वाढायला लागते. अशा प्रकारे व्यसनांचे प्रमाण वाढू शकते. या सर्वांमुळे काय होऊ शकते, तर आरोग्य धोक्यात येऊ शकते. वजन वाढायला लागू शकते. मधुमेह, ब्लडप्रेशर, हृदयविकार यांसारखे आजारदेखील वाढू शकतात. असे वेगवेगळे तोटे रिकामे बसल्याने होऊ शकतात. एकंदरीत मेडिकल सायन्सच्या दृष्टीने विचार करा किंवा सोशल सायन्सच्या दृष्टीने विचार करा, कुठल्याही अर्थाने हे घातकच होते. आपल्या पूर्वजांचा माणसांच्या मनःस्थितीचा अभ्यासदेखील तेवढाच चांगला होता. त्यांना समाजाला या सर्व गोष्टींपासून वाचवायचे तर होतेच, परंतु मानवी स्वभाव सरळ सरळ ऐकणार होता का? नक्कीच नाही. याची त्यांना पुरेपूर कल्पना होती, मग त्यांनी अत्यंत सकारात्मकतेने या सर्व गोष्टींचा सर्वांगाने पुरेपूर विचार करून अत्यंत सुंदररीत्या धर्माच्या आवरणामध्ये म्हणजेच कॅप्सूलमध्ये या सर्व गोष्टींना टाकले आणि सुंदरीत्या चातुर्मास नावाची संकल्पना प्रत्यक्षात अत्यंत यशस्वीरीत्या आणली. जी आजतागायत अत्यंत सकारात्मकतेने चालू आहे. अत्यंत दूरगामी विचार करून पावसाळ्यातले चार महिने आपल्या पूर्वजांनी चातुर्मासात बंद केले. जेवढा देवधर्म, व्रतवैकल्ये, उपवास, पोथीवाचन इत्यादी इत्यादी. जे आपण चातुर्मासात करतो तेवढे वर्षभरात करतो का हो? नाही ना? देव काय फक्त चार महिनेच जागा असतो का? इतर आठ महिने देवबाप्पा काही परदेशवारीवर वगैरे असतो काय? त्या वेळी तो आपली प्रार्थना ऐकत नाही का? नाही, असे काहीही नसते. तरीही या चातुर्मासातच जवळपास सर्व धार्मिक कार्यक्रम गुंफण्याचा जो अत्यंत सकारात्मक कार्यक्रम आपल्या पूर्वजांनी लावलेला आहे त्याचे उत्तर तुम्हाला वरील विवेचनातून नक्कीच कळले असेल.

हेही वाचा: दुनियादारी : थोडा भाव पण खाऊया...

धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने आपल्याला आपल्या पूर्वजांनी अत्यंत सकारात्मकरीत्या गुंतवून ठेवले. त्यामुळे आपल्याला आजारपणही येत नसते, स्थूलपणा येत नसतो, आपण व्यसनाधीन होत नाही, आपल्या हातून कुठलेही चुकीचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे काम होत नाही. यासाठी त्यांनी छानपणे उपवासांची संकल्पना आणली आणि जे की विज्ञानाने आज सिद्धही केले आहे. जर आपण २४ तासांहून जास्त वेळ संपूर्णपणे उपाशी राहिलो म्हणजे उपवास केला तर आपल्या शरीरात निर्माण होणारे आजार यामध्ये अगदी कॅन्सरसारखे आजारदेखील बरे करण्याचे काम आपल्या शरीरातील पेशी चोवीस तासांच्या उपवासानंतर स्वतः करायला लागतात. याबरोबरच पावसाळ्यातील वातावरणाचा विचार करा. आत्ताचे सोडा; पण त्या काळी किती जोरदार पावसाळा होता. जेथे महिनोंमहिने सूर्यदर्शन होत नसे. वातावरण कुंद असे. त्या वातावरणात आपली पचनक्रियादेखील मंद होत असते. आपल्या शारीरिक हालचालींनादेखील मर्यादा आलेली असते आणि म्हणूनच त्या काळात लंघण, उपवास करणे हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते, आहे म्हणून धर्माच्या आवरणामध्ये पावसाळ्यामध्ये उपवासच उपवास असतात. जसे की निर्जळी एकादशी आमच्या जैनानमधील वास, बेला, तेला इत्यादी. शरीराला विश्रांती, मनाला ऊर्जा हे सर्व धार्मिक कार्यक्रम केल्याने आपल्याला मिळत असते. मानसिक शांती, आधार, आत्मविश्वास मिळत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचे आपल्यातील सकारात्मकतादेखील अतिशय चांगल्या पद्धतीने वाढत असते. जरा विचार करा, जर पूर्वजांनी आपल्याला सरळ सरळ सांगितले असते, की हे करू नका, ते करू नका, हे केल्याने असा असा प्रॉब्लेम होऊ शकतो. खरंच आपण ऐकले असते का हो? जसे सिगारेटच्या पाकिटावर अत्यंत भयावह असे चित्र तर असतेच सोबत त्या अर्थाचा मजकूरदेखील छापलेला असतो. त्या चित्राने, त्या मजकुराने किती लोक सिगारेट, तंबाखू सेवनापासून दूर राहतात किंवा राहू शकतील? याउलट जसे मी आधी लिहिलेय त्याप्रमाणे नको करू म्हटले की आपण अजून मुद्दामहून त्या गोष्टी जोराने करतो आणि करा म्हटले, की बंडखोर मनाची तयारी असते का ते करण्याची.

आपण आता दुसरे उदाहरण बघू या. दर महिन्याला येणारी स्त्रियांची मासिक पाळी. मासिक पाळी सुरू झाल्यापासून तर पाळी बंद होईपर्यंत दर महिन्याला पाळी आली की चार दिवस त्या स्त्रीला बाजूला बसविले जाते. तिला स्वयंपाक करू दिला जात नाही की कुठलीही महत्त्वाची कामे तिने करावयाची नाहीत. इतरांनी तिला शिवायचे देखील नाही. चार दिवसांनंतर तिने डोके धुऊनच कामाला लागायचे ही आहे आपली रूढी-परंपरा, जी की विनातक्रार आजतागायत शेकडो पिढ्यांनी पाळली आहे. मला तर खरे खासकरून या विषयांमध्ये आपल्या पूर्वजांना मनापासून सलाम करावासा वाटतो, त्यांना मानाचा मुजरा करावासा वाटतो. हा विषय समजून घेण्यासाठीदेखील आपल्याला बरीच बरीच वर्षे परत मागे जायला लागेल. शेकडो, हजारो वर्षे आधी आपल्याकडे बालविवाहाची प्रथा होती. जी की अगदी अगदी सत्तर-ऐंशी वर्षे आधीदेखील होती. इतकेच कशाला, आपल्या देशातच अजूनही अगदी थोड्या प्रमाणात का होईना पण होय आजही बालविवाह होतातच. या विषयाला अगदी त्या काळापासूनच्या नजरेतून आपल्याला बघायला लागेल. समजून घ्यायला लागेल. त्या काळी बालविवाह पाच ते सात वर्षांची मुलगी होत असतानाच होत असत; पण लग्न झाल्याझाल्या मुलीला सासरी मात्र पाठविले जात नसे. साधारणतः अकरा बारा तेरा या कुठल्याही वर्षी पाळी आली की ज्याला अनेक प्रदेशांमध्ये ‘गौना आया’ असे म्हणतात. मुलीला अगदी समारंभपूर्वक सासरी रवाना केले जायचे. किती वय असायचे मुलीचे त्या वेळी सरासरी? बारा-तेरा वर्षे, आठवा तो काळ. त्या काळच्या सासवा, नणंदबाई, जेठानी, आजेसासू ,चुलत सासू, नंबर एक, दोन आणि कधी-कधी त्याहूनही जास्त. जॉइंट फॅमिली ही संकल्पना त्या वेळी सर्रास होतीच म्हणून घरातील ज्येष्ठांची संख्या भरपूर असायचीच. नवीन छोटी सून म्हणजे त्या काळातील वेठबिगारीपेक्षाही अत्यंत वाईट दयनीय अवस्था तिची असायची. सगळ्यांनी तिला कामाला जुंपायाचे. वरतून अतिशय वाईट पद्धतीने तिच्याशी बोलायचे. पदोपदी तिचा अपमान करायचा. यावर कडी म्हणजे तो काळ पुरुषप्रधान संस्कृतीचा. हे आधीच सगळे कमी की काय म्हणून नवऱ्यानेही आपला रुबाब क्षणोक्षणी दाखवायचा. मारहाण झाली नाही म्हणजे नशीब, अशी परिस्थिती आणि त्या पुरुषाच्या खरे म्हणजे १५, १७ वयाच्या मुलाचा रात्रीचा विचार करा. तो इतर कसलाही विचार न करता, दयामाया न दाखवता रात्री त्याला जे करायचे तेच करणार ना! बिचारी ही अक्षरशः अबला नारी असायची. त्या काळामध्ये मोबाईल होते ना लँडलाइन, ना टेलिग्राम, ना पत्र, ना कुरिअर. कुठल्याही पद्धतीने एकदा सासरी गेल्यानंतर त्या मुलीच्या माहेरचे कोणी आल्यागेल्याचा अपवाद वगळता संपर्क व्हायचा नाही. मन मोकळे करायचे तरी कुणाकडे? किती हतबल असतील त्या काळातील या कोवळ्या वयातील मुली. कोवळे वय सासूप्रधान, इतर सीनिअर्स प्रधान, पुरुष प्रधान अशा संस्कृतीमध्ये या बारा-पंधरा-वीस वयोगटांतील कोवळ्या मुलींची ही भयानक अवस्था या आपल्या सकारात्मक, हुशार अशा पूर्वजांच्या लक्षात आली आणि तेथूनच जन्म झाला या सुंदर अशा चार दिवस बाजूला बसण्याच्या प्रथेचा.

हेही वाचा: दगडांच्या देशा | स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

आता आपण याची दुसरी बाजू म्हणजे वैद्यकीय विज्ञान समजून घेऊ या. खरेतर ही मासिक पाळी म्हणजे ईश्वराने मानवाला दिलेले वरदानच आहे. जर मासिक पाळी नसती तर आपल्या पुढच्या पिढ्या दिसल्या असत्या का? ते जाऊ द्या. आपणही स्वतः दिसलो असतो का? नाही ना? आणि हे आपणा सर्वांनादेखील माहीत आहेच. आपण आता अगदी साध्या, सरळ, सोप्या भाषेमध्ये अगदी थोडक्यात मासिक पाळीबद्दल समजून घेऊ या. जेव्हा कुठल्याही स्त्रीला गर्भधारणा होते तेव्हा जे काही बाळ मोठे होते ते काही आपोआप होते का? हवेतून होते का? नाही. याबद्दलच आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचे आहे. ज्या वेळी पाळी येते म्हणजे पहिल्याच दिवशी आधी तर मागच्या महिन्यातील हिशेब निसर्ग पूर्ण करीत असतो, म्हणजे काय? बघू या निसर्ग आपले काम किती चोख, काटेकोर, सुंदररीतीने पार पाडीत असतो. निसर्ग प्रत्येक महिन्याला एक स्त्रीबीज म्हणजेच ओव्हम प्रत्येक स्त्रीमध्ये तयार करीत असतो आणि त्याच वेळी तिकडे पुरुषांमध्ये वीर्याच्या एका थेंबामध्ये कोट्यवधी शुक्रजंतू म्हणजेच स्पर्म्स तयार होत असतात. बघा, निसर्ग किती हिशेबी आहे. ते इकडे कोट्यवधी शुक्रजंतू आणि तिकडे मोजून एकच स्त्रीबीज म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी गर्भधारणेची संधी प्रत्येक महिन्याला मोजून एकच असते. स्त्रीबीज पाळीच्या साधारणतः मध्यंतरी निर्माण होत असते. खरेतर हा एक संपूर्णतः वेगळा मोठा विषय आहे. आपण इथे अगदीच तोंडओळख असल्यासारखाच समजून घेतो आहोत. जसे की स्त्रीबीज पाळीच्या मध्यंतरी तयार होत असते तरीपण निसर्ग प्रत्येक महिन्याला गर्भधारणा होणारच आहे, याच हिशेबाने आपल्या तयारीला लागलेला असतो, म्हणून गर्भाशयामध्ये पाळीच्या पहिल्या दिवसापासूनच बाळाच्या वाढीकरिता संपूर्णपणे पोषक असे वातावरण, इन्फ्रास्ट्रक्चर निसर्ग तयार करायला लागतो. त्यामध्ये मग बाळाचे अस्तर असते, त्याच्या भरणपोषणाकरिता योग्य ते अस्तराबरोबरच निर्मिती होत असते. ही निर्मिती स्त्रीबीज तयार होईपर्यंत चालू असते. स्त्रीबीजाचे आयुष्य मोजून अठ्ठेचाळीस तासांच्या आसपास असते. त्यादरम्यान जर तिकडून शुक्रजंतू आलेत तर स्त्रीबीजाचा आणि शुक्रजंतूचा मिलाप होतो आणि गर्भधारणा होते. तोपर्यंत केलेली निसर्गाने तयारी ही कामाला येते. गर्भाची वाढ चालू होते म्हणूनच तेथून पुढे स्त्री बाळंत होईपर्यंत परत पाळी येत नाही. केलेली तयारी ही गर्भधारणेकरिता वापरली गेली आणि बाळ गर्भाशयात असेपर्यंत त्याची वाढ करण्याचे काम गर्भाशयाचे असते म्हणून पाळी येत नाही अन्यथा एकदा स्त्रीबीज ४८ तासांचे होऊन मृत्यू पावले की निसर्ग ही केलेली तयारी बाहेर टाकून देण्याच्या तयारीला लागतो. जेवढे दिवस तयारीला तेवढे दिवस आवराआवरीला लागतात आणि एकदा आवराआवरी झाली, की निसर्ग हे सर्व मृत झालेले मटेरियल फेकून देतो आणि पुनश्च एकदा येणाऱ्या महिन्यात होणाऱ्या गर्भधारणेची तयारी करायला लागतो. हे चक्र पाळी आल्यापासून तर पाळी बंद होईपर्यंत चालूच असते आणि मग सांगा यात कुठला आलाय विटाळ? कसलं आलंय बाजूला बसण्याचं?

हेही वाचा: दोष ना कुणाचा...

हे चक्र जर निसर्गाने बंद केले तर? नवीन मानवाची निर्मिती होईल काय? यात अजून एक भाग आहे तो म्हणजे कुठल्याही मुलीला, स्त्रीला पाळी सुरवात झाल्यापासून तर साधारणतः पहिले मूलबाळ क्वचित प्रसंगी दुसरे मूलबाळ होईपर्यंत पाळीच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशी खालच्या ओटीपोटात भरपूर दुखत असते. तिला मानसिक व शारीरिकदृष्ट्या खूप अस्वस्थपणा आलेला असतो. मनानेदेखील ती अस्वस्थ असते. याला वैद्यकीय भाषेमध्ये डिस्मेनोरिया असे म्हटले जाते. या प्रामुख्याने पहिल्या दोन दिवसांत तर तसे बघितले तर चारही दिवस त्या मुलीला, स्त्रीला विश्रांतीची फारच गरज असते. तिला पडून राहावेसे वाटत असते. त्या काळी या सगळ्या सासू, नणंदप्रधान, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये कितीही ओरडून सांगितले असते अरे नका रे त्रास देऊ त्या कोवळ्या जिवाला, तिला विश्रांतीची गरज आहे. विश्रांती घेऊ द्या तिला. औषध द्या. तर कोणी ऐकले असते का? आणि म्हणूनच अत्यंत सकारात्मकतेने आपल्या पूर्वजांनी या मानवी जीवन तयार होण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला बेमालूमपणे धर्माच्या आवरणामध्ये कॅप्सूलमध्ये टाकल्यावर किती सहजपणे आपल्या अनेक पिढ्यांनी ही कॅप्सूल अगदी छानपणे गिळलेली आहे.
(पूर्वार्ध)
----
(लेखक सुयश या प्रथितयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

Web Title: Dr Hemant Ostwal Writes Saptarang Marathi Article On Tradition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Traditionsaptarang
go to top