पंख सकारात्मकतेचे : जसा विचार तसा आजार

Life
Lifeesakal

लेखक - डॉ. हेमंत ओस्तवाल

कुठल्याही आजाराची म्हणा अथवा कुठल्याही घडलेल्या नकारात्मक प्रसंगाची पहिली फाइट कोणाशी असते तर ती तुमच्या मानसिकतेशी. तुम्ही तेथे सकारात्मक असाल तर निदान ५० टक्के लढाई तिथेच जिंकलेली असते. उरलेल्या ५० टक्क्यांसाठी मग फार वेळ लागत नाही. कुठलीही नकारात्मक गोष्ट असेल तर तिला आपल्या पद्धतीने सकारात्मक व गोड करून घ्यावे, म्हणजे आजपासून औषधाला औषध न म्हणता ‘माझा खाऊ खायचा आहे’ असे म्हणायचे आणि कितीही दुखत असले तरी ‘किती छान दुखते!’ असेच म्हणायचे.

आपण आज अत्यंत वेगळा असा परंतु अत्यंत महत्त्वाचा सकारात्मकतेचा रंग बघणार आहोत. ज्याचा थेट संबंध आपल्या प्रकृतीशी येणार आहे. ही सकारात्मकता एकतर शक्यतो आपल्याला आजारी पडू देत नाही आणि पडलो तरी हीच सकारात्मकता आपल्याला लवकर त्यातून बरे करीत असते. तसा कुणाच्याही मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो, की अर्थाअर्थी सकारात्मकतेचा आणि आजार बरे होण्याचा काय संबंध असावा बरे? कारण सकारात्मकता म्हणजे काही अँटिबायोटिक नाही, पेनकिलर नाही, मल्टी विटामिन नाही, स्टेरॉइड नाही, अमृताची कुपी तर नक्कीच नाही, तरीपण या सकारात्मकतेने एवढा फरक पडतो? होय. आपण इमॅजिन करतो त्यापेक्षा कितीतरी पट फरक सकारात्मकतेने पडत असतो.

Life
गरजेचे मूल्यांकन

आज आपण या गोष्टी आपल्या दैनंदिन घडणाऱ्या घटनांमधून समजावून घेणार आहोत. सगळ्यात पहिले आपण रोज म्हणा किंवा कधी प्रासंगिक म्हणा घ्यायला लागणाऱ्या औषधांबद्दल बोलू या. कित्येकांना साधी एक गोळी घ्यायची म्हटले तरी पोटात गोळा उभा राहतो. औषध घेणे हा एक मोठाच कार्यक्रम होऊन बसतो. घरातील इतर मंडळीदेखील ‘तुमचे औषध घ्या, औषध घ्या’ अशी वारंवार आठवण करून देत असतात. नाहीतर शुगर वाढेल, रक्तदाब वाढेल, परत तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळ येईल, यांसारख्या सूचनांचादेखील भडिमार असतो. नकळतपणे आपलाही मेंदू सबकॉन्शस माइंडमध्ये आपल्याला वारंवार आठवण करून देत असतो, ‘तू आजारी आहेस औषध घे, औषध घे!’ एकूणच काय तर जवळपास सगळाच नकारात्मक कार्यक्रम. याउलट जर आपण वेगळे काही केले तर? कसे आपण बघू या. औषधे तर अशीही घ्यायला लागतात अन् तशीही घ्यायला लागतात. मग का नाही त्याचापण छोटासा आनंदोत्सव करायचा? आपल्या लहानपणी आपला सगळ्यात आवडता कार्यक्रम कुठला असेल तर तो म्हणजे खाऊ खाणे. ‘आई मला खाऊ दे, बाई मला खाऊ दे, अक्का मला खाऊ दे, मावशी मला खाऊ दे, आजी मला खाऊ दे’ असा भुंगा आपण प्रत्येकाने आपल्या लहानपणी आपल्या घरात लावलेला आहे. नुसते घरातच नव्हे, आपल्या घरातील कोणीही वडीलधारे बाहेर निघाले रे निघाले की ‘मला खाऊ आणा’ हा धोशा आपण नक्कीच लावलेला असायचा. आपल्या प्रत्येकाच्या गावातील जत्रा आणि खाऊ याचा अतूट संबंध असायचा. मग तो गुडीशेवचा खाऊ असो की जिलबीचा खाऊ. आजही आपल्या लहानग्यांना, बच्चेकंपनीला आपण आठवणीने कुठूनही खाऊच आणत असतो. अगदी त्याने अभ्यास करावा म्हणून, कोणी पाहुणे आले तर शांत बसावे म्हणून, वेळेवर अंघोळ करावी म्हणून. थोडक्यात काय, आपणही आपल्या बाळांना खूश करण्यासाठी आजही खाऊच देतो. असा हा खाऊ कुठल्याही वयामध्ये आवडणारा आहे. याच्याभोवती आपल्या खूप सुंदर सुंदर आठवणी गुंफलेल्या आहेत. आता मी काहीसे वेगळे, शक्यतो कधीही असला विचार आयुष्यात न केलेला, पण त्याचबरोबर अत्यंत सकारात्मक अशी छोटीशी गोष्ट करण्यास सांगणार आहे. आपण विश्वास ठेवा या छोट्याशा गोष्टीचा आपल्या आयुष्यामध्ये खूपच मोठा सकारात्मक फायदा होतो. तर काय करायचे? एक अत्यंत छोटी गोष्ट करायची, ती म्हणजे, आपल्या औषधांना औषध न म्हणता फक्त खाऊ म्हणायचे! फार छोटी गोष्ट. फक्त खाऊ म्हणायचे. फार अवघड आहे का? नाही आणि नुसतेच आपण नाही म्हणायचे तर आपल्या घरातील सर्व सदस्यांनादेखील हीच सवय लावायची. याच्याने कसा काय फरक पडत असेल? सोपी गोष्ट आहे. कोणीही औषध औषध, मेडिसिन, गोळ्या घ्यायच्या आहेत, असे म्हटले, की मेंदूकडे एक प्रकारे नकारात्मक मेसेज जात असतो. आपल्याला आजारपण आहे आणि म्हणून आपल्याला औषध घ्यायचे आहे हा मेसेज मेंदूकडे जात असतो. या मेसेजमध्येच एक प्रकारे नकारात्मकता भरलेली आहे. त्यामुळे या आजारांवर नियंत्रण मिळविणे अवघड होत जाते. कारण आपल्या शरीराला जणू एक प्रकारची सूचनाच वारंवार मिळत असते, की तू आजारी आहेस, तुला अमुक आजार आहे, तुला तमुक आजार आहे. थोडक्यात काय? तर परत परत आपल्यावर नकळत एक प्रकारे बिंबविले जाते, की ‘आपण आजारी आहोत, आजारी आहोत, आजारी आहोत.’ याउलट जर आपण औषधाला खाऊ म्हटले तर गोष्ट अगदी छोटीशी आहे; परंतु ती सकारात्मकता आपल्यामधला आजार एकतर फार लवकर बरा करते किंवा कंट्रोलमध्ये तरी ठेवते. कारण एकतर आपण आजारी असल्याच्या फिलिंग्स परत परत येत नाहीत. सोबत ज्या गोष्टीमुळे अगदी लहानपणापासून तर कितीही वयापर्यंत आनंद मिळतो तो आपण यानिमित्ताने परत परत उपभोगतो. नुसताच आनंद उपभोगतो असे नव्हे, तर आपल्या मेंदूला वारंवार सगळीकडून सकारात्मक संदेश जात असल्याने आणि आपल्या नकळत आपण त्या आजारांना सहज बाजूला ठेवत असल्याने आपला आजार एकतर लवकर बरा होतो किंवा लवकर आटोक्यात तरी येतो.

Life
फ्रान्स अध्यक्षांना अडथळ्यांचे आव्हान

चला, खाऊ तर खाऊन झाला! अशीच आपण अजून एक गंमत बघू या. आपल्याला अनेक आजारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पेन्स (वेदना) होत असतात. जसे की कुठल्याही प्रकारचा मार लागणे, मग तो अपघातात असो की अजून कुठला! अगदी छोटा चटका असो की मोठे जळीत अगदी साधा नखुर्डा असो की एखादा मोठा ॲबसेस, एखादे हेअरलाइन फ्रॅक्चर असो की एखाद्या हाडाचा तुकडा पडलेला असो; वेदना होतातच. ज्या वेळी आपण ‘माझं दुखतंय दुखतंय’ असे सारखे म्हणत असतो त्या वेळी त्या 'दुखतंय दुखतंय' असे म्हटल्याने आपल्या वेदना कमी होत असतात का? नाही. खरे सांगायचे तर उलटपक्षी वाढत असतात. कारण आपण आपल्या मेंदूला जणू वारंवार सूचनाच देत असतो, की ‘तुला लागलंय, तुला मार लागलाय, तुला खूप वेदना होत आहेत.’ जणू काही या गोष्टीच आपल्या मेंदूवर हॅमरिंगचे काम करीत असतात आणि याच्याने आपल्या वेदना कमी होण्याऐवजी होतच राहतात. याउलट जर आपण असे म्हणत राहिलो, ‘किती छान दुखतंय!, किती छान दुखतंय!!’ तर वेदना वाढणार आहेत का? नाही. कदापि नाही. उलट असे जेव्हा आपण म्हणतो, ‘छान दुखतंय’ त्या वेळी आपल्या मेंदूकडे सकारात्मक संदेश जात असतो. वेदना जरी तशाच असल्या तरीदेखील आपल्याला त्या कमी होत असल्याच्या किंवा कमी झाल्यासारख्या नक्कीच वाटतात. आहे त्या वेदना स्वीकारण्याची आपली मानसिकता तयार होते. मग त्या वेदना वेदना राहत नाहीत.

थोडक्यात काय? आयुष्यामध्ये कितीही नकारात्मक गोष्टी समोर आल्या तरी त्याला सामोरे कसे जायचे हा एवढाच परंतु अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. याच विषयाला अनुसरून एक संशोधन आपण बघू या. डॉक्टर बर्नी सीगल थोर प्रख्यात कॅन्सर सर्जन आहेत. कॅन्सरमधील हे संपूर्ण जगात एक अॅथॉरिटी म्हणून आहेत. सरांचा कॅन्सर या विषयावरचा ‘लव मेडिसिन अॅन्ड मिरॅकल’ या नावाचा शोधग्रंथ खूपच प्रसिद्ध आहे. हा शोधग्रंथ काय म्हणतोय हे आपण समजून घेऊ. डॉक्टर सीगल यांनी हजारो कॅन्सरच्या पेशंट्सवर एक संशोधन केले. त्यांनी या हजारो रुग्णांना ज्या वेळी कॅन्सर झाला त्या वेळी त्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कोणती गोष्ट जास्तीत जास्त प्रमाणामध्ये समान आढळते याचा शोध घ्यायचा यशस्वी प्रयत्न केला. कारण सरळ होते. त्यांना कोणत्या गोष्टीमुळे कॅन्सर होतो हे शोधायचे होते आणि आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल परंतु जवळपास सर्वच रुग्णांमध्ये एक गोष्ट खूपच समान आढळली, ती म्हणजे, ताणतणाव, डिप्रेशन, टेन्शन. ही गोष्ट सर्वांत जास्त समान आढळली ते सर्व जण त्यांच्या त्यांच्या त्यांच्या आयुष्यातील सर्वात जास्त ताणतणावाच्या कालखंडात होते. इथपर्यंत ठीक आहे, की प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप ताणतणाव, टेन्शन होते पण त्याचा आणि कॅन्सरचा काय संबंध, त्याच कालखंडात त्यांना कॅन्सरसारखा जीवघेणा आजार व्हावा हा प्रश्न डॉक्टर बर्नी सीगल यांना सतावत होता. कदाचित आपल्यापैकी आपल्याकडचे कोणी एखादे असते तर म्हटला असते ‘होतंय होतंय, जाऊ द्या. काय विचार करायचा?’ परंतु ते डॉक्टर बर्नी सीगल होते. त्यांनी या गोष्टीचा पूर्ण छडा लावायचा, असा ठाम निर्धारच केला होता. आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल असा निष्कर्ष त्यांच्या संशोधनातून बाहेर आला. काय आहे तो निष्कर्ष बरे? ज्या वेळी आपण मनाने खचलेलो असतो, निराश असतो, त्या वेळी आपल्या शरीरातील रोगप्रतिकार करणारी पेशीदेखील तेवढीच खचलेली असते. निराश झालेली असते. जसे निराश झालेली व्यक्ती काहीही झाले, सांगत असते, बोलत असते, ‘आता माझं काही खरं नाही. आता माझ्याने काही होत नाही. जाऊ दे बाबा जसं होईल तसं होईल. मी काय करू, माझी ताकद संपली आहे. माझ्यात हिंमत नाही...’ वगैरे वगैरे. अगदी हीच मानसिकता या रोगप्रतिकार करणाऱ्या पेशीची होत असते. आपल्या शरीरात काही ना काही व्हायरस हे प्रत्येक श्वासाबरोबर जातच असतात, तसेच आहाराबरोबर काहीना काही बॅक्टेरिया आपल्या शरीरात जातच असतात मग आपण दरवेळी आजारी का पडत नाही. त्याचे कारण असते 24×365. रोगप्रतिकार करणारी ही आपली पेशी ज्या वेळी आपली मानसिकता सकारात्मक असते त्या वेळी आपल्या या पेशींचीदेखील मानसिकता तेवढीच सकारात्मक असते आणि मग तेवढ्याच ताकदीने रोगांचा प्रतिकार करीत असतात आणि म्हणून आपण रोज रोज आजारी पडत नसतो; परंतु ज्या वेळी आपली मानसिकता नकारात्मक असते मग त्या वेळी रोगांना प्रतिकार करणारी पेशीदेखील नकारात्मक स्थितीत असते आणि मग तीपण म्हणते स्वाइन फ्लू येतोय येऊ द्या, मलेरिया येतो आहे येऊ द्या, कोविड येतोय येऊ द्या. कोणताही आजार येतोय, येऊ द्या. थोडक्यात काय, तो कुठलाही आजार आला तर त्या वेळी त्या आजाराशी सामना करण्याची ताकद आपल्या पेशीने आपल्या नकारात्मकतेमुळे गमावलेली असते. त्यामुळे आपण वारंवार आजारी पडत असतो. पडलो तरी लवकर बरे होत नसतो. अगदी आजारी नसतानादेखील आजारी असल्याचे फिलिंग येत राहते. अशा वेळी मधुमेह असो, रक्तदाब असो, हृदयविकार असो, संधिवात असो, इतर कुठलाही आजार असो लवकर आटोक्यात येत नाही.

Life
जगण्याने छळले होते...

तशी भरपूर माझ्याच पेशंट्सची उदाहरणे मला येथे देता येतील, पण शब्दांच्या मर्यादेमुळे मी इथे एकच उदाहरण देतो. गोष्ट फार जुनी नाही. नाशिकमधीलच एक प्रथितयश कुटुंब माझे नियमित फॅमिली पेशंट होते. माझा आणि त्यांचा घरोबाही चांगला होता. योगायोगाने स्वभावाने मियाँ-बीबी दोन्ही नकारात्मक होते. देवाच्या दयेने सामाजिक, आर्थिक, सर्व दृष्टीने व्हेरी वेलसेटल्ड असे कुटुंब होते. एक आठवीला मुलगा आणि पाचवीला मुलगी अशी दोन अपत्ये होती. त्यांच्या दोघांच्या स्वभावामुळे जगात कुठलीही साथ आली की त्या आजाराची प्रचंड भीती या दोघांना असायची. मग तो कोविड-१९ असो की स्वाइन फ्लू असो; गल्लीत एखाद्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला की पुढचा महिनाभर या दोघांनाही हृदयविकाराची फसवी चिन्हे असायची. गल्लीत, शहरात, राज्यात, देशात, जगात कुठे काही घडले की त्याची चिंता या उभयतांना असायची. याचा सगळ्यात जास्त त्रास कोविड-१९ मध्ये झाला. भारतात लॉकडाउन झाल्यापासून आतापर्यंत या दोघांना मानसिकदृष्ट्या निदान दहा ते पंधरा वेळा कोविड झाला आहे. सुरवातीपासून आतापर्यंत कोविडचे पूर्ण प्रोटोकॉल त्यांनी १०० नाही तर २०० टक्के फॉलो केले आहेत. व्हॅक्सिन्सदेखील अगदी वेळेवर घेतल्या आहेत. गेल्या दोन-सव्वादोन वर्षांत ही मंडळी कुठेही अगदी घरगुती कार्यक्रमांनादेखील गेलेली नाही आणि एवढे करूनही व्हायचे तेच झाले. पहिल्या लाटेमध्ये कुठेही घराच्या बाहेर न गेलेले हे दांपत्य बरोबर कोविड-१९ ला अडकले. सुदैवाने कुठल्याही कोमॉर्ब्याडिटीज नसल्याने गरज नसतानाही रेमडेसिव्हिर घेऊन उशिरा का होईना सेटल झाले. खरे सांगायचे तर या दोघांनाही झालेले कोविड-१९ इन्फेक्शन हे अत्यंत अल्प प्रमाणात होते. यांचा स्कोअरदेखील शून्य होता. कुठलाही त्रास नसताना हॉस्पिटलमध्ये भरती झाले आणि निव्वळ आणि निव्वळ नकारात्मक स्वभावामुळे यांचा त्रास वाढत गेला. नशीब एवढेच म्हणायचे, की दोघेही वाचले. कारण या कोविड-१९ मध्ये जे जे लोक खूप घाबरत गेले ती माणसे या आजाराला लवकर बळी पडली. या दोघांना तर इतके माइल्ड इन्फेक्शन होते, की रेमडेसिव्हिर तर सोडा बाकी कुठल्याही औषधांचीदेखील गरज नव्हती. अशी अनेक उदाहरणे सांगण्यासारखी आहेत.

Life
दुनियादारी : तेरे नैना, तेरे नैना रे!

सारांश एवढाच येतो, की कुठल्याही आजाराची म्हणा अथवा कुठल्याही घडलेल्या नकारात्मक प्रसंगाची पहिली फाइट कोणाशी असते तर ती तुमच्या मानसिकतेशी. तुम्ही तेथे सकारात्मक असाल तर निदान ५० टक्के लढाई तुम्ही तिथेच जिंकलेली असते. उरलेल्या ५० टक्क्यांसाठी मग फार वेळ लागत नाही. कुठलीही नकारात्मक गोष्ट असेल तर तिला आपल्याला आपल्या पद्धतीने सकारात्मक व गोड करून घेणे आहे. जसे की आजपासून औषधाला औषध न म्हणता ‘माझा खाऊ खायचा आहे’ असे म्हणायचे आणि कितीही दुखत असले तर ‘किती छान दुखते!’ असेच म्हणायचे.

(लेखक सुयश या प्रथितयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com