पुत्र विलापातून राष्ट्रालापाकडे नेणारी ‘प्रभाकरास!’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savarkar

पुत्र विलापातून राष्ट्रालापाकडे नेणारी ‘प्रभाकरास!’


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (१८८३ -१९६६) एक बहुआयामी नि कर्तृत्वशाली व्यक्तित्व होते. लहानपणी त्यांचे स्वप्न महाकवि होण्याचे होते. पण तत्कालीन परिस्थिती पाहून ते सशस्त्र कांतिकार्याकडे वळले. याविषयी वर्णन करताना काव्यमय भाषेत कवि लिहीतो,
अहो! भारतमातेने मला सांगितले -
कविकक्ष पूर्ण हा माझा
परि उणीव तेथे जा जा
क्रांतिच्या बाष्पयंत्राचा । कक्ष तो ||

‘माझा कविंचा कक्ष पूर्ण भरलाय. मात्र सैनिकांचा कक्ष रिकामा आहे, तेथे तू जा !’ आईची आज्ञा प्रमाण मानून आपण या सैन्यकक्षात आल्याची साक्ष कवी देतो. मूळात कवी असलेल्या या स्वातंत्र्य सेनानीची काव्यप्रतिभा कधी पद्यातून तर कधी गद्यातून तर कधी प्रवाही व्याख्यानातून उचंबळून कोसळताना दिसते. रसिका ! १८५७ चे स्वातंत्र्य समर हे गद्य काव्याचे उत्तम उदाहरण आहे. आजच्या घडीला उपलब्ध असलेले सावरकरांचे साहित्य सुमारे १६ लाख शब्दांचे आहे. मायदेवांनी केलेल्या गणनेनुसार सावरकरांची काव्यरचना सुमारे १०,४४० ओळीची आहे. तर स ग मालशेना ती १३,५०० ओळींची आहेसे वाटते. जी तत्कालीन कोणत्याही मोठ्या मराठी कविपेक्षा कमी नाही. तरीही सावरकरांच्या प्रतिभेची भरारी, काव्यरचनेस पोषक असे स्वतःचे चरित्र नि प्रगल्भ, प्रवाही विचारसंपदा पाहता ती किमान ५०,००० ओळीची तरी असावयास हवी होती असे वाटते

सावरकरांच्या काव्यरचनेचा काळ सन १८९४ ते १९३८ असा ४४ वर्षाचा दिसतो. त्यातही अंदमानोत्तर केवळ २४ कविता नि नाट्यगीते एवढीच रचना १९२४ ते १९३८ या सुमारे २४ वर्षात दिसते. जी उत्तरोत्तर आकुंचित होत गेलेली आहे. तर १९३८ ते १९६६ या २८ वर्षाच्या प्रदीर्घ काळात एकही कविता जन्मलेली नाही.

सावरकर काव्याची समीक्षा करतांना बहुतेक समीक्षकांनी सावरकर काव्य म्हणजे त्यांच्या स्वत;च्या चरित्राची उसळी असल्याचे म्हटले आहे. जे वास्तवास धरून आहे. त्यामुळे प्रश्न उभा राहतो की नंतरच्या कालखंडांत सावरकरांची काव्यरचना ओस का पडली असावी? जीवनाचे अत्यंत भीषण वास्तव जगताना ही जो काव्यात्मा डळमळला नाही.तो ज्यांच्यासाठी आपण कष्टतो त्यांच्या आत्मघाती उपेक्षेने मौन झाला की काय? कळत नाही.
खरेतर भयाण एकांतवासातून सुटून आल्यावर लाखोच्या गाजवलेल्या सभा, शृङखला भोगलेल्या हातांनी भूषविलेले पुष्पांचे हार, अक्षरशः सुळाच्या खांबावरून सुटून अचानक सिंहासनावर बसावे, असे एकाहून एक नाटयमय प्रसंगाचे जिवंत उदाहरण कोणत्याही सुखांत काव्याला पोषकच होते. अन् तदनंतर गांधी हत्येचे जघन्य किल्मिष, स्वजनांनी केलेली तीव्र उपेक्षा अन् प्रतारणा हे प्रसंग कोणत्याही विदाहक शोकांत काव्याला अत्यंत उपयुक्त नि तितकेच उत्तेजक होते. या सा-या अकल्पित नि अलौकीक दिव्यातून गेल्यावर, मृत्युला आवाहन करत केलेले आत्मार्पण जीवन काव्यावर कळस चढविणारे होते. हे सारे जीवनात घडत-घडवित असताना, सावरकरांतील कवि मौन का झाला? केवळ अनुमानावरच थांबावे लागेल.

खरेतर सावरकरांनी त्यांच्या काव्यात हौतात्म्यास आवश्यक असणारे संकल्पमंत्र (चाफेकरांचा फटका), हवनमंत्र (माझे मृत्युपत्र) नि कवचमंत्र (अनादि मी) दिले आहेत. यावर प्रस्तुत लेखकाने अन्यत्र विस्तृत लिहीले आहे. पण शेवटचा पूर्णाहुती मंत्र सावरकर देऊ शकले असते. तो त्यांनी लेखरुपात दिला, पण काव्यरुपात नाही. याची चुटपूट विचक्षण मनाला उगाच लागून राहते.
सावरकरांच्या काव्यरचनेत ९५ स्फूट कविता असून ४ खंडकाव्ये आहेत. स्फूट कवितांत आरत्या, स्तोत्रे, श्लोक, ओव्या, आर्या, फटके, पोवाडे, उर्दू गझला असे बहुविध प्रकार आहेत. यातील सुमारे ८,००० पंक्तीची काव्यरचना दंडबेड्यांनी जखडून ठेवलेले असताना, कारागृहातील भिंतींवर काट्याखिळ्यांनी कोरून, तोंडपाठ करत जपलेली आहे. तर त्यातील कित्येक रचना अट्टल गुन्हेगार कैद्यांकडून पाठ करवून कारागृहाबाहेर धाडलेली आहे. असा अव्दितीय नि अश्रूतपूर्व रोमांचक इतिहास असलेली काव्यरचना मराठी शिवाय अन्य कोणत्याही भाषेस मिळाली असल्याचा संभव नाही. ही नाट्यमय घटना अनेक कविंना काव्यरचनेस स्फूर्ति देणारी ठरली. या घटनेला काव्यबध्द करताना कविवर्य राजा बढे
तुला बंदीशाळा न ते काव्यमंदिर जोपासली तू छळाने कला ।
शृंगारिल्या उंच भिंती सुलेखे अन् काळोख तेजोबले जाळला ।।’
म्हणत कविंना गौरवितात तर लोककवि मनमोहनांना ज्ञानेशानंतर भिंत विनायकासाठी चालल्याचा भास होतो. कमलात सावरकर ज्या ऐटीत सोनचाफयाला पुसतात तीच ऐट उसनी घेत नागपूरचे कवि श्रीनिवास बोबडे कमलेचे कविमंडन करताना सावरकरांना पुसतात,
आणि हे कविराया, तू शिकलास तरी कुठें
दिव्य ही किमया, आम्हां स्वयंमन्य नरां जिथे
सृष्टिच्या सहवासींही क्षण स्फूर्ति न लाभते
भुयारात तुरुंगाच्या बैसुनीया सख्या तिथे
तुज जीवंत काव्याची रसरम्य अशीं फुलें
सुवास मत्त पाहोनी निर्मिता मन हे भुलें

या कृतिशूर समरपंडीताचा पोवाडा थोर थोर कविंनी गायल्यावर त्यावर अधिक काय बोलावे.
रसिका! आज आपण सावरकरांची त्यांच्या मोठ्या मुलाच्या मृत्युनंतर केलेली विलापिका पाहणार आहोत. सावरकरांच्या जीवनात विलापिका लिहीता येतील असे अनेक प्रसंग आले होते. वयाच्या आठव्या वर्षी झालेला आईचा मृत्यु, पोर वयात प्लेगने झालेला पित्याचा मृत्यु, आई-बहिण-सखि-मैत्रिण नि वहिनी अशा अनेक नात्यांनी ते जिच्याशी जोडल्या गेले होते त्या येसू वहिनींचा मृत्यु, उतारवयात झालेला लहान भावाचा घातपाती मृत्यु, गुरुणां गुरु म्हणून ते ज्यांना सदोदीत पुजित त्या लोकमान्यांचा मृत्यु आणि त्यांच्या लहानग्या शालिनीचा अर्भकावस्थेत झालेला मृत्यु असे एक ना अनेक प्रसंग ! पण सावरकरांनी चारच विलापिका लिहिल्यात महादेव गोविंद रानडे यांच्या मृत्युनंतर पहिली चाफेकर नि भगतसिंह यांच्या हौतात्म्यानंतर दुसरी व चवथी नि लहानग्या प्रभाकराच्या मृत्युनंतर तिसरी याशिवाय मातृशोकालापाष्टक हे आईच्या मृत्युनंतर सहा वर्षानी लिहीले आहे ते धरले तर पाचवे होईल. पण त्याला विलापिका म्हणणे उचित ठरणार नाही. यात प्रभाकरास ही विलापिका उत्तमच गणली जावी अशी आहे.

सावरकरांना सप्टेंबर १९०५ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी मुलगा झाला होता. त्याचे नांव प्रभाकर ठेवले होते. तो उणापुरा १० महिन्यांचा असताना सावरकरांना लंडनला जावे लागले. जाताना त्याला जवळ घ्यावे, कुरवाळावे, चुंबावे ही स्वाभाविक इच्छा त्यांना झाली. पण तत्कालीन समाजबंधनांमुळे त्यांना ते करता आले नाही. त्यावेळी गमतीने ते बोलले होते, ‘याला देवी टोचून घ्याल. नाहीतर तो देवीकडे जाईल.’ सावरकरांचे दुर्भाग्य असे की खरोखरच देवीनेच तो फेब्रुवारी १९०९ मध्ये मरण पावला. त्यावेळी सावरकर लंडनमध्ये शीखांचा इतिहास लिहिण्यात व्यग्र होते. त्याचवेळी ही दुःखद वार्ता त्यांना कळाली. त्या शोकात असताना त्यांनी तो महाग्रंथ लहानग्या प्रभाकराच्या स्मृतिस अर्पण केला. त्याची अर्पण पत्रिका म्हृणजेच प्रभाकरास ही विलापिका होय.

कवितेच्या आरंभी ते लिहितात, ‘ तू म्हणजे माझ्या यौवन लतिकेला आलेले पहिले फूल होतेस. तुला पाहताच नकळत स्नेहाने रोमांच उभे राहिले. डोळे स्नेहाने स्निग्ध झाले. पुत्रजन्माचा हा पहिलाच प्रसंग असल्याने गुरुजन - मोठ्यांच्या मर्यादेने, तुझी आई तुला मला दाखवित असताहि नीट पाहता आले नाही. तरीही कधी कधी मी चोरुन तुझे अर्धे चुंबन घ्यावे तेंव्हा तू सुखाने तुझे डोळे लावून घ्यायचास.’ असे मनोरम वर्णन करताना कवि अत्यंत स्नेहार्द्र शब्दात लिहितो,

चोरूनि घ्यावें कधी कधी तव अर्ध चुंबनातें
सुखोत्सवें तव आपण होउनि नयन झाकती ते ।।
प्रभ्या प्रियकरा, होतासी बहु दिवस असा सखया
अमूर्त तू कल्पना एक मधु मधुर अशी हृदया ।।

यातील ‘प्रभ्या प्रियकरा’ ह्या शब्दातील स्नेहार्द्र माधुर्य मनाला मोह घालते न् घालते तोच तो प्रभाकर आता जगात न राहिल्याने केवळ अमूर्त कल्पना उरलाय. हे कविचे शब्द हृदयाला पिळवटून टाकतात. पण ती मधु मधुर हृदयाची साद घालीत कवि त्या स्नेहार्द्र भावनेला उत्तुंग उंचीवर नेतो.

पुढे आपला विलाप अधिकच अधोरेखित करत कवी लिहितो, 'लवकरच आईची मांडी सोडून तू दुडूदुडू धावू लागशील ते पाहण्यासाठी मी उत्सुक होतो. पण त्याचवेळी विदेश गमनाचे काम निघाले.' येथे कवी विदेश गमनाला प्रियजन विरहाचे काम संबोधतो. हे कवीच्या कुटूंबाविषयीच्या, स्नेह्याविषयीच्या कोमल भावनाच दर्शवतात. खरेतर दहाव्या महिन्यात मूल चालायला लागते. पण सावरकर त्या आधीच घरापासून दूर असल्याने, हे सुख त्यांना लाभले नाही. पुढे ते लिहितात, ‘तू स्तनपानात दंग असताना. तुझ्या आईसह तुला चुंबून मी विदेश गमन केले. माझी पत्नी अंतरल्याने मला खेद वाटला, पण खरे सांगतो त्याहून तुझा विरहच मला अधिक वाटला. जरी मी विदेशांत, देशकार्यात मग्न होतो तरी तू माझ्या मनातच होतास.’ हे सांगताना कवी म्हणतो,

देशि जसा होतास विदेशी सन्निधची सखया
अमूर्त तू कल्पना एक मधु मधुर अशी हृदया ।।
हे कसे काय शक्य झाले हे सांगताना सावरकर लिहितात,
अतनु मूर्ति तव लटकुनि कितिदां हृदयाशी निजली
हसली कितिदां दिव्याशेने कितिदा ती सजली ।।
आपल्या प्रियजनांपासून, त्यातही लाडक्या बाळापासून दूर राहणा-या, या कविमनाच्या पित्याला ते छोटेसे बाळ आपल्याला बिलगून झोपलेय असे वाटते. प्रत्यक्षात ते शरीराने जवळ नसल्याने कवी त्याला अतनु मूर्ति म्हणतो. सावरकरांचे हे शब्द म्हणजे कर्तव्य कठोर पित्याने दाबून ठेवलेले, आपले तळमळणारे पितृहृदय, मुलाच्या अकाली मृत्युनंतर कसे उंचबळून येते, ते या ओळीतून उठावदारपणे व्यक्तविलेले आहे. पण त्याचवेळी ती अतनू मूर्ति हसली सांगताना, सावरकर दिव्याशेने सजली सांगतात. दिव्याशा अर्थात् ज्याविषयी साधुजनांना ‘धन्य धन्य’ गर्जत म्हणावेशे वाटते ती होय. ही सुखकर नसून दुखद, कटू पण हितकर असते. ती दिव्याशा व्यक्तविताना राष्ट्रर्षि सावरकर लिहितात,

धर्म कार्य सिध्यर्थ धाडुनी रणीं खङगपाणि
बाल बाल झुंजार आपुले श्रीगोविंदांनी ।।
हुतात्म होता हसत पाहिले सुकीर्ति परिसुनि ती
म्यांहि कितीदा रणी पाहिली अमूर्त तव मूर्ती ।।
शीखांच्या आत्मबलिदानाने आपूर्ण इतिहासाचे परिशीलन करताना सावरकरांना श्रीगोविंद दिसतात. अन् त्याच सोबत धर्मकार्यार्थ ‘मौत साचा जन्म है’ ची धर्मगर्जना करीत बलिदान झालेले गुरु गोविंदांचे चार लहान लहान सुकुमार बालक दिसतात. त्यापाठोपाठ आपल्या चिमण्या बाळांच्या मृत्युने व्यथित न होता,
क्या हुआ यदि धर्म पै वार दिये सुत चार
चार मरै तो कया हुआ जिवित कई हजार
ची कृतकृत्य गर्जना करणारा तो वीरपिता दिसतो. युवा विनायक त्या चिरयुवा गोविंदाशी तादात्म्य पावत मनोमन निर्धार करतो की, 'माझाही लहानगा प्रभाकर, गोविंदाच्या त्या चार युवा कुमारांसारखा लढत लढत देशासाठी हुतात्मा होईल.'
गोविंद गुरुशी तादात्म्य होऊन सावरकर मनोमन ही कल्पना करत होते न होते, तोच प्रभाकराचे निधन झाल्याची विषम वार्ता त्यांना मिळाली.ती वार्ता ऐकून आपणच नव्हे तर आपल्या साऱ्या मित्र मैत्रिणी आपल्या इतक्याच विव्हळ झाल्या अशी साक्ष कवी देतो. त्याक्षणी त्याला स्मरते की तो दूर विदेशात असल्याने, प्रभाकराचा त्याला असलेला सहवास केवळ मानसिकच होता. आता त्याच्या मृत्यूनंतर ही तो तसाच मानसिक उरणार आहे. 'त्यामुळे प्रभाकराच्या मृत्यूमुळे मला फारसा फरक पडणार नाही.' असे कवी म्हणतो. कवीचे हे म्हणणे खरे नसून स्वत:च्या विव्हळ नि शोकाकूल मनाची तो घालत असलेली समजूत आहे. ही त्याची पद्धती त्याला काळ्या पाण्यावर खूप उपयुक्त ठरली. कवीचे हे दुःख त्याच्याच शब्दात पाहणे उद्बोधक ठरेल,
मृत्यु वंचके हरूनि मूर्ति तव वंचित त्यां केलें
परी सत्य सांगतां न कांहीं हरूनि मम नेलें
पूर्वि जसा होतास अससि तू नंतरही सखया
अमूर्त तू कल्पना एक मधु मधुर अशी हृदया

उपरोल्लेखित स्वगत म्हणता म्हणता कवी आपल्या त्या मृत बाळास आश्वासन देतो कि, 'तू मला आधी जसा प्रिय होतास तसाच पुढेही राहणार आहेस. जोवर हे माझे हृदय आहे तोवर तिथे तू सुखाने रहा. हे तुझे हक्काचे घर आहे.' तितक्यात कवीला त्याने स्वीकारलेला सशस्त्र क्रांतीचा मार्ग व त्यावरील धोके आठवतात. जेथे स्वत:चा जीवच धोक्यात आहे. तेथे हे हृदयरुपी घर तरी सुरक्षित कसे राहणार? या चिंतेने क्रांतिकारी पिता व्याकूळ होतो. अन् चटकन त्या लहानग्या बाळाला सांगतो, 'या क्रांतीच्या वणव्यात माझे हृदय जरी सुरक्षित नसले, तरी मी लिहीत असलेला शिखांचा इतिहास हा ग्रंथ सुरक्षित आहे. हा तुला मी अर्पण करतो. जोवर हा ग्रंथ राहील तोवर तुझी स्मृति चिरंजीव राहील.' आपल्या मुलाची स्मृति अमर करण्यासाठी पिता ग्रंथरुपी घर सुरक्षित नि अमर म्हणून आपल्या मुलाला देतो. पण दुर्दैव असे की सावरकरांचा तो ग्रंथच क्रांतीच्या वावटळीत गहाळ झाला. पुढे अंदमानात असताना ही कविता कवीला आठवली अन् क्रांतीच्या वणव्यात तो ग्रंथच इतिहास जमा झालेला आठवला. त्यावर सूचक भाष्य करताना कवी लिहितो, 'जी जागा मला सर्वात सुरक्षित वाटली होती, जेथे कोणी पोहोचू शकणार नाही असे वाटले होते. तेथे सुद्धा क्रांतीचे अग्नि- मेघ- वारे सहजपणे पोहोचले. अन् ते सुरक्षित वाटणारे ग्रंथरुपी घर सुद्धा बेचिराख करून गेले.' कवी येथे केवळ शोक दाखवित नाही तर शोक मिश्रीत आश्चर्य दाखवत, आपल्या कार्याचे परीणाम अधोरेखित करतो.

सावरकरांची ही विलापिका सशस्त्र क्रांतिकारकांच्या कर्तव्य कठोर हृदयात दडलेले वत्सल पितृ हृदयाचे दर्शन घडविते. देशासाठी स्वत:चे मरण कल्पणारे वीर अनेक असतील पण देशासाठी स्वतः च्या लहानग्याचेही मरण कल्पणारे वीर सावरकर आगळेच म्हणावे लागतील. संक्षेपात; पुत्रशोकातून आरंभलेली ही विलापिका राष्ट्रालापात परिवर्तित होताना दिसते जी कविशी तद्रुप होऊन शोकार्त झालेल्या हताश वाचकाच्या मनांत देशार्थ झुंजण्याची सुप्त प्रेरणा जागवून जाते