सागरसूक्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savarkar

सागरसूक्त!

रसिका! सन १९०९, ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर दोन युवक फिरत होते, त्यापैकी एकाचे नाव होते निरंजन पाल, तर दुसऱ्याचे होते विनायक दामोदर सावरकर. तेथे बसलेल्या इतरांहून ते खूपच वेगळे भासत होते. इतर लोक केवळ मौज-मस्तीसाठी आपल्या प्रियजनांसह त्या किनाऱ्यावर पहूडले होते अन् हे दोघे बेचैनीने येरझाऱ्या घालत होते. त्यांच्या बैचनीचे कारण होते, गुलामगिरीत खितपत पडलेली त्यांची मातृभू। ती त्यांच्यापासून हजारो मैल दूर होती, तिच्या तीव्र ओढीतून सावरकरांनी तिला साद घातली,

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा। प्राण तळमळला।

त्यांना आठवले, तीन-चार वर्षांपूर्वी ते जेव्हा मुंबईला होते, तेव्हा ते समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी जात. तो अथांग सागर पाहून त्यांच्या मनाला प्रश्न पडे, याच्या त्या टोकाला काय असेल? विलायत, आपल्या देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचा देश। देशभक्तीने रसरसणारे त्यांचे मन त्यांना म्हणे, मग एकदा तरी तो देश आपण पाहायला हवा. या विचारांत दंग होऊन अवरुद्ध कंठाने गाऊ लागले-

भूमातेच्या चरण तला तुज धुतां। मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ।

हेही वाचा: संकल्प उदात्त परी... बोलके करतील काय!

सृष्टीची विविधता पाहू पण त्याकाळी रिवाज असा होता, की इंग्लडला जाणारा युवक एकतर ख्रिश्चन होई वा किमान आंग्लाळलेला होऊन मातृभूमीला विसरून सुखलोलुपतेत रममाण होई. त्याकाळी समुद्रगमन निषिद्धही होते. त्यामुळे त्यांच्या विदेशवारीला आप्तजनांचा विरोध होता. आप्तजनांच्या या भावनेला व्यक्त करणाऱ्या ओळी जन्मल्या-

तइं जननी-हृद विरहशंकितहि झाले । परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठि वाहिन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी ।
जगद्नुभव योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणीं । मी
येईन त्वरें कथुन सोडिले तिजला । सागरा, प्राण तळमळला


सावरकरांच्या प्रियजनांना वाटत होते, की लवकरच ते बॅरिस्टरचा झगा घालून दिमाखात परततील. पण तेथेही ते क्रांतिकार्यात गढले, त्यांच्या इप्सित कार्याला वेग आला. मदनलाल त्यांच्या संपर्कात येताच देशभक्त बनला. त्याच तीव्र देशभक्तीने प्रेरित होऊन त्याने १ जुलै १९०९ ला कर्झन वायलीला ठार केले. ५ जुलैला त्याच्या निषेधाची सभा सावरकरांनी विरोध करून उधळून लावली व स्पष्टीकरण देताना, ‘त्याला न्यायालयाने अद्यापी गुन्हेगार ठरविलेले नसताना, त्याला गुन्हेगार समजून त्याचा निषेध करणे हा न्यायव्यवस्थेचा अवमान आहे.’ असे वकिलीथाटाचे उत्तर वृत्तपत्रांत छापून आणले. इंग्रजांना दिसत होते, मदनलालचे प्रेरणास्रोत सावरकर आहेत, त्याचे निवेदन छापून आणणारे सावरकर आहेत; पण त्यांचे हात बांधले गेले होते. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना बॅरिस्टरची पदवी नाकारली. त्यांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लावला. सावरकरांना लंडनमध्ये राहायला घर मिळेनासे झाले. अक्षरशः पिंजऱ्यात अडकल्यागत त्यांची अवस्था झाली. त्यातूनच कवितेचे दुसरे कडवे प्रसवले-

हेही वाचा: मानाचा मुजरा...मनापासून

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती । दशदिशा तमोमय होती

आपला मुलगा जन्मजात इंग्लिश वाटावा, यासाठी मुलाला लहानपणापासून विलायतेत पाठवून विलायती कुटुंबात ठेवण्यात धन्यता मानण्याच्या काळात सावरकरांना असे वाटत होते. ही गोष्टच त्यांच्या जन्मजात देशभक्तीचा सज्जड पुरावा ठरावी.

गुण-सुमनें मी वेचियली या भावें । की तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा

रसिका, काय गंमत आहे, कवी म्हणतोय विद्येचा भार? विद्येचा भार होत नसतो, विद्या कोणी चोरू शकत नाही, तिच्यावर कर लावता येत नाही, ती सर्व धनांत प्रधान धन आहे, असे सुभाषितकार ठासून सांगतात. पण एका महाकवीला, सिद्धहस्त लेखकाला असे कां वाटावे? साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी ‘लेखण्या मोडा, बंदुका उचला’ असे आवाहन करीत सरस्वतीच्या मंदिरात महाकालीची पूजा का बांधावी? त्याचे कारण एकच देशाच्या कारणी न लागणारी विद्या सावरकरांना भार वाटत होती.
त्याचवेळी त्यांना आठवण येते, लोकमान्य टिळक, काळकर्ते परांजपे, थोरले भाऊ बाबाराव यांसारख्या आधारस्तंभाना आपण अंतरलो आहोत. पूज्य वहिनी, पत्नी अन् त्यांच्या मैत्रिणी यांना दुरावलो आहोत, तर लहान भाऊ बाळ आणि त्याचे मित्रही अंतरले आहेत. या विचारांचे प्रतिबिंब खालील पंक्तीतून उमटते,

ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता। रे
तो बाल गुलाबही आता। रे फुलबाग मला हाय पारखा झाला। सागरा, प्राण तळमळला।


त्यांना वाटते, आता इंग्लंडमध्ये राहणे शक्य नाही, ब्रिटिशांकित भारतात परतणेही शक्य नाही. मग काय करायचे? त्यापेक्षा सहयोगी क्रांतिकारक जसे अमेरिका, जर्मन, रशिया देशात आश्रय घेऊन, क्रांतिकार्य सोडून अन्य क्षेत्रांत नाव कमावताहेत, तसे आपण करावं का? पण ते त्यांच्या मातृभक्त मनाला पटेना. त्यांना केवळ मातृभूमीचाच ध्यास लागला होता. त्यातूनच पंक्ती जन्मल्या,

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा ।
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी ।

तिजविण नको, राज्य मज प्रिय साचा वनवास तिच्या जरि वनिचा ।

काय हा विचार, विलायत, अमेरिकेपेक्षा त्यांना त्यांची मायभूमी अधिक प्रिय होती. इतकेच नव्हे, तर तिच्याशिवाय मिळणारे राज्यही त्यांना नको होते त्यापेक्षा मायभूमीचा वनवास त्यांना प्रिय वाटत होता. ही केवळ कविकल्पना नव्हती; हा त्यांच्या हृदयीचा ध्यास होता. भारतमातेचा विरह त्यांना अक्षरश; छळत होता. त्याच विरहाने दग्ध होऊन त्यांनी सागराला शपथ घातली विरहाची । विरहाची शपथ; काय कल्पना आहे! यापूर्वीच्या कोण्या महाकवीला न सुचलेली ! काय अवस्था आहे, कोणाही प्रियकराने न अनुभवलेली!! अहो, आपण शपथ घालतो अमक्याची - तमक्याची । पण सावरकर शपथ घालतात विरहाची । विरहासारखं शल्यदायी दुःख नाही । विरहासारखी अस्वस्थता कशातच नाही। विरहात माणूस स्वस्थ बसूच शकत नाही।तीच तर त्यांची अवस्था होती केवळ त्यांच्या मायभूमीसाठी ।

हेही वाचा: दिग्गजांचं वास्तव्य आणि सृष्टिसौंदर्य !

भूलविणे व्यर्थ हे आता। रे
बहु जिवलग गमते चित्ता। रे
तुज सरित्पते जी सरिता । रे तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला

हाय! या विनवण्या अन् शपथांनी हा निर्दयी सागर अजिबात द्रवत नाही. उलट फेसाळत हसतोय. त्यामुळे सात्विक क्रोधाने उफाळून कवि सागरास पुसतो
या फेन-मिषे हससि निर्दया कैसा । कां वचन भंगिसी ऐसा?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरविते । भिऊनी का आंग्लभूमीते?
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनाते नेशी
एकदम त्यांना आठवले की, तो आर्जव व विनवण्यांनी बधणारा नाही, श्रीरामाने धनुष्य उचलताच तो दबला होता. आज नि;शस्त्र अन् विकल बनलेल्या भारतमातेला अबला समजून तो फसवतोय. त्याला ठाऊक नाही कां की याच भारतीच्या उदरांत अगस्ति जन्मला होता, ज्याने एका आचमनांत सागराला आटविले होते. अगस्तीला आठवताच करूण रसांत बुडालेली ही कविता रौद्ररूप धारण करते अन् सागराला त्याचा धाक घालत जरबेने सांगते...

तरि आंग्लभूमि-भयभीता। रे
अबला न माझी ही माता। रे
कथिल हे अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला। सागरा, प्राण तळमळला

हे काव्य जन्मत असताना सावरकरांचे हावभाव निरंजन पाल विस्मयचकित होऊन निरखित होते. सावरकर मराठीत गात असल्याने, ते काय गातात हेच त्यांना कळेना आणि अचानक काव्य संपताच मातृभूमीच्या वियोगाने भावविभोर झालेले सावरकर ढसढसा रडायला लागले. अभिनव भारताच्या निर्मात्याचे, वज्रादपि कठोरानि सावरकरांचे हे मृदुनिच कुसुमादपि रूप पाहून निरंजन पाल कायमचे सावरकरांच्या प्रेमात पडले. याच काव्यनिर्मितीच्या घटनेला आठवत त्यांनी अशी साक्ष दिली की, ‘‘आधुनिक भारतातील बहुतेक सर्व महान भक्तांना नि श्रेष्ठ नेत्यांना भेटण्याचे नि त्यांचा परिचय करून घेण्याचे भाग्य मला लाभले आहे. परंतु विनायक दामोदर सावरकर यांचे आपल्या मातृभूमीवर जसे नि जितके प्रेम होते, तसे नि तितके स्वदेशप्रेम असलेला दुसरा कोणीही देशभक्त मी अद्यापि पाहिलेला नाही.’’

हेही वाचा: स्वातंत्र्याचं मोल चुकवावंच लागतं

रसिका! अशा तद्रुप झालेल्या भावनेतून जन्मलेले असल्याने, महाराष्ट्रापासून दूर ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर जन्मलेले हे गीत महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राचे सागरसूक्त ठरले.

Web Title: Dr Neeraj Deo Writes Saptarang Marathi Article On Savarkars Marathi Poetry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top