शेख महंमद महाराजांचा ग्रंथराज योगसंग्राम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Granthraj Yogasangram
शेख महंमद महाराजांचा ग्रंथराज योगसंग्राम

शेख महंमद महाराजांचा ग्रंथराज योगसंग्राम

वाहिरे ग्राम संभूतं अविंध कुल भास्करम ।

योगसंग्राम निर्माता तं नमामि महंमदम् ॥

वाहिरा गावचे (ता. आष्टी जि. बीड) मुस्लीम कुळात जन्मलेले तेजस्वी सूर्य, योगसंग्राम रचियते संत शेख महंमद महाराजांना वंदन. सार्थ योगसंग्राममधील सुरुवातीचा हा श्लोक लक्ष वेधून घेतो. श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठान प्रकाशित हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे मूळ लेखक संत शेख महंमद महाराज. या ओवीबद्ध ग्रंथातील अर्थ जनमानसाला समजावा, शेख महंमद महाराजांचे विचार सर्वसामान्य माणसाला कळावे. यासाठी ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी जुन्या हस्तलिखित तसेच संपादकांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा अभ्यास केला. भगवान महाराज शास्त्री यांनी अतिशय सोप्या भाषेत त्याचे विवेचन केले आहे.

हेही वाचा: खाकी वर्दीवर रक्ताचा डाग; मद्यधुंद अवस्थेत डिलिव्हरी बॉयला उडवलं

संपादकीय प्रस्तावनेत ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी योगसंग्राम ग्रंथाचे महात्म्य अतिशय सहज, सोप्या शब्दात सांगितले. प्रत्येक अध्याय जगण्याचे मूल्य शिकवतो. ओवीचा अर्थ समजल्यामुळे वाचक वाचतच राहतो. वाचकाला आत्मानंद मिळतो. एकंदरीत हा चर्चात्मक ग्रंथ आहे. गुरु शिष्याचा संवाद आहे. देवी-देवताही यात सामील आहेत. ज्ञान, भक्ती, वैराग्य, पुराणकथा व त्यावरील वास्तव्य. अंधश्रद्धा कर्मकांड यावर ताशेरे ओढले आहेत.

चौदाव्या अध्यायात शेख महंमद महाराज म्हणतात,

देवता असत्या सामर्थ्यपणे । तर तोंडावर का मुतती श्वाने ।

प्रसिद्ध दोखोनी झकली अज्ञाने । कनिष्ठ भजन करिती ॥

म्हणजेच ’तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी’, हा विचार शेख महंमद महाराज निर्भिडपणे पटवून देतात. सामाजिक, धार्मिक, राजकीय, वैज्ञानिक, ऐतिहासिक सर्व विषय अगदी सोप्या भाषेत व चर्चात्मक पद्धतीने महाराजांनी सांगितला आहे.

हेही वाचा: अखेर लसीकरण प्रमाणपत्रावरुन हटवला जाणार PM मोदींचा फोटो

हरी आणि अल्लाच्या नावाने समाजात तेढ निर्माण करणाऱ्या धर्मठकांना शेख महंमद महाराज सांगतात, ऐका हरि अल्ला जरी दोन असते। तरी ते भांडोभांडोच मरते। वोळखा काही ठाव उरो न देते। येरून येराचा पैं॥

नवसासायासावर बोलताना ते म्हणतात,’ नवस केलीया जरी पुत्र जाले । व्याघ्र सिंह नवसेविण जन्मले । चौर्‍यांशीचे दुःख सुखसोहळे । जाले नवस केलियाविण ॥

हेच पुढे तुकाराम महाराज म्हणतात, ’नवसे कन्या पुत्र होती । तरीका करणे लागे पती?॥’ शेख महंमद महाराज हे विज्ञानवादी संत होते, प्रबोधनकार होते. हेच या विचारातून दिसून येते. भगवान महाराज शास्त्री अनुवादकाचे मनोगतात सांगतात, शेख महंमद महाराजांचा योगसंग्राम म्हणजे एक अध्यात्मिक युद्ध आहे.

हेही वाचा: ‘... तरच मुस्लिमाचे घर सुरक्षित राहील’

आत्मा विरुद्ध विकार असे हे युद्ध आहे. ग्रंथाचे योगसंग्राम नाव सार्थ आहे. या योगसंग्राम ग्रंथात 18 अध्याय असून 2301 ओव्या आहेत. या ग्रंथाची रचना श्रावण शु.15 शके 1567 सोमवार या दिवशी सांगता पावली. या ग्रंथाची टाईप सेटिंग श्री. रुपेश चव्हाण व श्री. गणेश बोरुडे यांनी केली आहे. मुद्रित शोधन श्री. धनंजय ढोरजे यांनी तर याचे मुद्रन न्यू तिरंगा प्रिंटर्स अहमदनगर यांनी केले आहे. अतिशय सुरेख सुंदर पाहताक्षणीच ग्रंथ लक्ष वेधून घेतो असे मुखपृष्ठाचे काम श्री. सार्थक वाळके यांनी केले. ग्रंथात शेख महंमद महाराजांच्या हस्तलिखित ओव्यांचा फोटो आहे. सार्थ योगसंग्राम ग्रंथातील विचार हे मानवतावादी आहेत. समाज शिकावा, शहाणा व्हावा यासाठी प्रबोधन आहे. संत शेख महंमद महाराजांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. चांगले जीवन जगण्यासाठी, जीवनमान उंचावण्यासाठी हा ग्रंथ आवश्य वाचा.

- किसन आटोळे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :articlewriterssaptarang
loading image
go to top