महात्मा गांधींनी देशाची फाळणी केली का? आक्षेप आणि वास्तव

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

३० जानेवारी १९४८ साली झालेल्या त्यांच्या हत्येनंतर त्यांच्याबाबत असंख्य अशा अफवा पसरवण्याचं काम काही गटाकडून सातत्याने झाले आहे.

महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती. 2 ऑक्टोबर १८६९ रोजी जन्म झालेल्या मोहनदास करमचंद गांधी यांना लोकांच्या प्रेमामुळे 'महात्मा' अशी पदवी मिळाली.  भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या महात्मा गांधी यांनी अहिंसेचं अभिनव शस्त्र संपूर्ण मानजातीला दिलं. पण, ३० जानेवारी १९४८ साली झालेल्या त्यांच्या हत्येनंतर त्यांच्याबाबत असंख्य अशा अफवा पसरवण्याचं काम काही गटाकडून सातत्याने झाले आहे. हे लोक सार्वजनिकरित्या महात्मा गांधी यांच्याबद्दल आदर दाखवत असली, तरी आपल्या कृतीद्वारे त्यांनी गांधी यांना 'विलन' करण्याचा एकही प्रयत्न सोडलेला नाही. गांधींबद्दल पसरवण्यात आलेली सर्वात मोठी अफवा म्हणजे, त्यांच्यामुळे देशाची फाळणी झाली. महात्मा गांधी यांना गोळ्या घालणाऱ्या नथुराम गोडसेनेही फाळणीसाठी त्यांना जबाबदार धरत आपल्या कृतीचे समर्थक करण्याचा प्रयत्न केला होता. पण, इतिहासाकडे आपण पूर्वग्रहदूषीत न होता पाहिलं, तर आपल्या समोर अनेक गोष्टी स्पष्ट होत जातील.

हेही वाचा - गांधी आणि सावरकर : विरोधी प्रवृत्तींचं चिरंतन द्वंद्व...

स्वतंत्र भारताचे पहिले व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सगळ्यांत आधी सरदार पटेल यांचं फाळणीसंदर्भात मन वळवलं होतं. त्यानंतर त्यांनी पंडित नेहरूंनाही फाळणीसाठी राजी करुन घेतलं. नेहरूंची संमती मिळवल्यानंतर माऊंटबॅटन यांनी गांधींसमोर फाळणीचा प्रस्ताव ठेवला. सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरु फाळणीसाठी अनुकूल आहेत. तुम्ही एकटे पडल्यामुळे फाळणीचा निर्णय स्वीकारा, असं माऊंटबॅटन यांनी महात्मा गांधी यांना सूचित केलं. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांना नाईलाजाणे फाळणीला होकार द्यावा लागला. समकालीन नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्य हवंय हे लक्षात आल्याने गांधींना फाळणीचा निर्णय स्वीकारावा लागला. 

हेही वाचा - 1948 पूर्वी गांधी हत्येचे झाले पाच प्रयत्न! कागदोपत्री आहे नोंद

नाईलाजाणे स्वीकारली फाळणी!

भारताची फाळणी करण्याचा निर्णय ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा होता. यातच त्यांचे हितसंबंध गुंतले होते. शिवाय मुस्लीमांसाठी नवीन देश निर्माण होणे, म्हणजे मुस्लीम नेत्यांसाठी मोठी उपलब्ध ठरणार होती. पण फाळणीला शेवटपर्यंत विरोध करण्याचा प्रयत्न महात्मा गांधींनी केला. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांची अनुकूल भूमिका, मुस्लिम लीगची हट्टी मागणी आणि देशात वाढत चाललेली जातीय हिंसा व त्यातून निर्माण होऊ शकणारे अराजक याचा विचार करून नेहरू व पटेल यांनी फाळणीचा निर्णय स्वीकारला. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये गांधींनी त्यास विरोध केला होता आणि शेवटी बैठक सोडून ते निघून गेले होते हे सत्य आहे.

हेही वाचा - भारतीय नोटेवर गांधीजींचा फोटो का? जाणून घ्या

महात्मा गांधींनी फाळणी घडवून आणली नाही तर दुखावलेल्या मनस्थितीत त्यांना फाळणीला हो म्हणावं लागलं. इतिहासाकडे सम्यकदृष्टीने पाहणाऱ्याला हे सहज लक्षात येईल. अखंड भारताच्या फाळणीसाठी गांधी जबाबदार आहेत असा ठपका ठेवण्याचा प्रयत्न एका गटाकडून आजही केला जातो. महात्मा गांधींचे स्वातंत्र्य काळातील योगदान नाकारता न येण्यासारखे असल्याचे हे लोक जाणून आहेत. त्यामुळे बाहेर हे लोक गांधींबद्दल आदर दाखवून ढोगींपणाचा आव आणतात. दुसरीकडे हेच लोक नथुरामच्या फोटोची पुजा करतात आणि नथुराम कसा बरोबर होता याचा प्रचार करतात.

संदर्भ -
1. महात्म्याची अखेर - जगन फडणीस
2. गांधीजी आणि त्यांचे टिकाकार - सुरेश द्वादशीवार - साधना प्रकाशन
3. नथुरामायण - य. दि. फडके - अक्षर प्रकाशन
4. लेट्स किल गांधी - तुषार गांधी - मेहता पब्लिशिंग हाऊस
5. ओह माय गोडसे - विनायक होगाडे - विश्वकर्मा प्रकाशन
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias partition was not done by Mahatma Gandhi