#InnovativeMinds हॅकेथॉन : उत्तरे शोधणाऱ्यांची जननी

#InnovativeMinds हॅकेथॉन : उत्तरे शोधणाऱ्यांची जननी

भारतामध्ये तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रमांना एकाच वेळी ५० लाख विद्यार्थी प्रवेश घेत असतात. या तीन ते चार वर्षांच्या अभ्यासक्रमांदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने सहा महिने एखाद्या प्रकल्पावर किंवा कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणे अनिवार्य असते. या विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी घालवलेला वेळ व ऊर्जा प्रतिवर्ष ५ ते ८ लाख व्यक्ती वर्ष (पर्सन इयर्स पर इयर) आहे. हा आकडा प्रचंड मोठा आहे!

यातील बहुतांश वेळ वायाच जातो, कारण अनेक विद्यार्थी संकल्पना, माहिती किंवा आराखडे इंटरनेटवरून थेट कॉपी-पेस्ट करतात. काही विद्यार्थी बाजारातून थेट रेडिमेड प्रकल्प विकत आणण्याचे धारिष्ट्यही दाखवतात... असे असले, तरी अनेक विद्यार्थी खऱ्या अर्थाने चांगले काम करू इच्छितात. मात्र, त्यांना मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी सध्याची बाजारपेठ आणि समाजाच्या गरजांच्या विपरीत अत्यंत पुस्तकी किंवा कालबाह्य प्रकल्प सादर करतात. त्यामुळे आपण प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात असमर्थ असलेले अत्यंत सामान्य दर्जाचे पदवीधर तयार करतो. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, आपले ६० पेक्षा अधिक तंत्रज्ञानातील पदवीधर नोकरी देण्याच्या योग्यतेचे नाहीत. हे दर्जा नसलेले विद्यार्थी अकुशल व कमी प्रतीचे काम करीत राहतात किंवा अधिक पैसा ओतून एखाद्या सामान्य दर्जाच्या संस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतात किंवा एखादा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करून चांगल्या संधीच्या शोधत फिरत राहतात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रश्‍नांची सोडवणूक करणारा असल्याचे या विद्यार्थ्यांच्या लक्षातही येत नाही आणि आपली शिक्षण व्यवस्था ही अत्यावश्‍यक गोष्ट त्यांच्या मनावर बिंबविण्यात कमी पडते. 

भारताला संशोधन क्षेत्रात प्रगती करायची असल्यास प्रश्‍नांची सोडवणूक करू शकणाऱ्यांचा मोठा गट निर्माण करणे गरजेचे आहे. एचआरडी मंत्रालय, एआयसीटीई आणि यूजीसी यांना ही गोष्ट समजली व त्यामुळेच या संस्था अनेक उपक्रमांच्या माध्यमांतून इनोव्हेशन, निर्णायक विचारपद्धती व माहितीवर आधारित कौशल्य विकसित करण्यावर भर देत आहेत. यातील ‘एमएचआरडी’चा महत्त्वाचा उपक्रम हॅकेथॉन असून, त्याद्वारे शैक्षणिक संस्थांमध्ये इनोव्हेशन व प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची संस्कृती रुजविण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. 

हॅकेथॉन्स (हॅक अधिक मॅरेथॉन) हे धावण्यातील ‘स्प्रिंट’ या प्रकारचे उपक्रम आहेत. त्यामध्ये अभियंते किंवा विद्यार्थी, ग्राफिक डिझायनर्स, इंटरफेस डिझायनर्स व तज्ज्ञ एकत्र विचार करतात. त्यातून दिलेल्या प्रश्‍नाची सोडवणूक करू शकणारे एक कार्यशील उत्पादन दिलेल्या वेळात विकसित करतात. उदा. ३६ किंवा ४८ तासांत. ‘एखाद्याच्या संगणकामध्ये अनधिकृतपणे प्रवेश मिळवून माहिती पळवणे,’ असा ‘हॅक’ या शब्दाचा नकारात्मक अर्थ भारतामध्ये घेतला जातो. खरेतर त्याचा ‘वेगळ्या आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने काम करणे,’ असा अत्यंत सकारात्मक अर्थ आहे. हॅकेथॉनचा प्राथमिक उद्देश दिलेल्या कमी कालावधीमध्ये काम करणाऱ्या उत्पादनाच्या निर्मितीद्वारे चांगल्या इनोव्हेशनच्या उपयुक्ततेची चाचणी घेणे आहे. 

‘एमएचआरडी’ आणि पर्सिटंट सिस्टिम्सच्या ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ची संकल्पना अत्यंत साधी आहे. एका बाजूला आमच्या देशात लाखो प्रश्‍न आहेत, तर दुसरीकडे प्रश्‍नांची सोडवणूक करणे अपेक्षित असलेले लाखो विद्यार्थीही आहेत. आपण हे सर्व प्रश्‍न आणि त्यांना सोडविणाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणू शकतो का? हे साध्य झाल्यास आपण संशोधनाद्वारे चांगली उत्पादने निर्माण करू शकू व त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सक्षम बनविणारा आणि बाजारात टिकून राहण्यास उपयुक्त ठरणारा प्रचंड मोठा तांत्रिक अनुभवही देऊ शकू. 

स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे (एसआयएच) यंदाचे तिसरे वर्ष असून, याआधीचे दोन उपक्रम खूपच यशस्वी ठरले आहेत. ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१७’ या पहिल्या उपक्रमात आम्ही केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांना त्यांच्या प्रशासकीय कामासंदर्भातील प्रश्‍न सांगण्याची विनंती केली. आमच्याकडे केंद्र सरकारच्या विविध संस्थांकडून ५९८ प्रश्‍न आले. या संस्थांमध्ये ‘इस्रो’, आण्विक ऊर्जा विभाग, ‘अर्थ सायन्सेस’ व रेल्वे अशा मान्यताप्राप्त संस्थांचाही समावेश होता.

देशातील सर्व प्रमुख तंत्रविषयक संस्थांमधील तंत्रज्ञ विद्यार्थ्यांना हे ५९८ प्रश्‍न एक आव्हान म्हणून सोडविण्यासाठी देण्यात आले. पहिल्या फेरीमध्ये १२००पेक्षा जास्त संस्थांतील ४० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले. दोन टप्प्यांतील चाळणीनंतर आम्ही इनोव्हेटिव्ह कल्पना असलेल्या ८ हजार विद्यार्थ्यांची निवड केली आणि देशभरातील २६ शहरांमध्ये या विद्यार्थ्यांनी सलग ३६ तास आपल्या कल्पनांवर काम केले. हे निश्‍चितपणे जगातील सर्वांत मोठे हॅकेथॉन ठरले. आम्ही अजाणतेपणी यशस्वीरीत्या जगातील सर्वांत मोठे ‘ओपन इनोव्हेशन’ मॉडेल विकसित केले! विद्यार्थ्यांनीही आम्हाला निराश केले नाही व समस्यांवरील काही अत्यंत वेगळी उत्तरे घेऊन समोर आले. सहभागी संस्था उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल अत्यंत समाधानी होत्या व त्यांनी हॅकेथॉननंतरही विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या कल्पनांवर काम करणे चालू ठेवले. अनेक वर्तमानपत्रांनी लेख लिहून स्मार्ट इंडिया हॅकेथॉन मॉडेलचे यश व त्याच्या क्षमतांबद्दल  भाष्य केले. 

ही यशोगाथा २०१८च्या हॅकेथॉनमध्ये आणखी पुढे गेली व १६००पेक्षा अधिक शिक्षण संस्थांतील १ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले. या वेळी उपक्रमामध्ये केंद्रीय संस्थांबरोबरच १७ राज्येही सहभागी झाली व त्यांनी आपल्या तब्बल १२०० प्रश्‍नांची यादी सादर केली. या वेळी आम्ही ‘हार्डवेअर हॅकेथॉन’ ही इनोव्हेटिव्ह हार्डवेअर उत्पादने विकसित करण्यासाठीची अत्यंत वेगळी संकल्पना समोर आणली. हार्डवेअर हॅकेथॉनसाठी आम्ही आयआयटी कानपूर, आयआयटी खरगपूर, आयआयटी गुवाहाटी आदी मान्यताप्राप्त संस्थांमधील १० वर्कशॉपची निवड केली. नावीन्यपूर्ण कल्पनांच्या जोरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या गटांना आम्ही या वर्कशॉपमध्ये ५ दिवस काम करायला सांगितले आणि त्यांच्या कल्पनांना उत्पादनामध्ये परावर्तित करण्याचे आव्हान दिले. हा पथदर्शी प्रकल्पही खूपच यशस्वी ठरला. त्यामुळेच ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९’मध्ये आम्ही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा समावेश निश्‍चित केला आहे. 

उद्योजकांकडून मागविलेली प्रश्‍नांची यादी, हे २०१९च्या हॅकेथॉनचे वैशिष्ट्ये आहे. आम्हाला २०० उद्योगांकडून प्रश्‍न पाठविले जातील, अशी अपेक्षा आहे. हे प्रश्‍न आमच्या तंत्रज्ञ तरुणांसाठी मोठे आव्हान ठरतील, यात शंका नाही. मी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख उद्योगांना या राष्ट्रीय यज्ञात सहभागी होण्याचे आव्हान करतो. आपण सर्व जण मिळून भारतीय शिक्षण व्यवस्थेतून दर्जेदार तंत्रकुशल विद्यार्थ्यांच्या निर्मितीचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ. निःसंशयपणे, हेच आमचे स्वप्न आहे.  (क्रमश:)

(लेखक भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयात चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com