esakal | Women's Day : अमेरिकेने नाही, 'या' देशांनी दिल्या महिला पंतप्रधान आणि राष्ट्रप्रमुख!
sakal

बोलून बातमी शोधा

Int_Womens_Day

आतापर्यंत एकाही महिलेला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी झेप घेता आली नाही. किंवा तेथील जनतेने एखाद्या महिलेची राष्ट्राध्यक्षपदासाठी निवड केली नाही, हे वास्तव आहे.

Women's Day : अमेरिकेने नाही, 'या' देशांनी दिल्या महिला पंतप्रधान आणि राष्ट्रप्रमुख!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

महिला दिन विशेष :

उद्या ८ मार्च, जागतिक महिला दिन. संपूर्ण जगभरात या दिन उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने जगाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या अशाच काही महिलांविषयीची माहिती या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. 

दोन जागतिक महायुद्धांमुळे होरपळून निघाल्यामुळे जगभरातील जवळपास सर्वच देश शांततेसाठी पुढे आले. अगणित नरसंहार आणि वित्तहानी यातून सावरत जगापुढे आदर्श निर्माण करण्याची स्पर्धा देशांमध्ये सुरू झाली. याच काळात स्त्रियांनाही त्यांच्या कर्तृत्वाला वाव देण्यास पुरेसे पोषक वातावरण निर्माण झाले होते. कष्ट करण्याची ताकद, साहस आणि नेतृत्वक्षमता असलेल्या अनेक स्त्रियांनी देशातील पंतप्रधान, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष, राज्यपाल ते राजकीय पक्षप्रमुख ही विविध पदेही भूषविली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या जगातील २९ देशांचे सरकार या महिला प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली चालू आहे. तर १९५० पासून आतापर्यंत जगभरातील ७५ देशांमध्ये महिलांनी राज्य आणि केंद्र सरकारचे नेतृत्व केले आहे. 

येव्गेनिया बॉश या युक्रेनियन महिलेला आधुनिक जगाची पहिली महिला नेता म्हणून ओळखले जाते. 1917-18 या कालावधीत त्यांनी युक्रेनच्या पीपल्स सेक्रेटेरिएटमधील गृहमंत्रीपद भूषविले होते. खेरटेक अँचिमा-टोका या तुव्हान पीपल्स रिपब्लिक या पक्षाच्या नेत्या होत्या. तसेच देशाच्या राष्ट्रप्रमुखपदी निवड झालेली जगातील पहिली महिला म्हणूनही त्यांना ओळखले जाते. १९४० मध्ये त्यांनी तुव्हानच्या राष्ट्रध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती घेत कारभार चालविला होता. 

- Women`s Day:देशातच नव्हे, जगभरात महिलांच्या अडचणी सारख्याच; काय आहेत आव्हाने?

१९६०मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाला बहुमताने विजयी करत सिरीमाव भंडारनाईके या सिलोन (आताचे श्रीलंका)च्या पंतप्रधान बनल्या. लोकशाही पद्धतीने निवडून येत देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेली पहिली महिला म्हणून भंडारनाईके यांना ओळखले जाते. त्या तीनवेळा श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या. १९६०-६५, १९७०-७७ आणि १९९४-२००० अशा तीन टर्ममध्ये एकूण १७ वर्षे त्यांनी श्रीलंकेचे पंतप्रधानपद भूषविले. 

इसाबेल मार्टिनेज डी पेरॉन या उपराष्ट्रपती पद भूषविणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरल्या. १९७४ मध्ये पतीच्या निधनानंतर त्यांनी अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली. देशाच्या राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या जगातील पहिल्या महिलेचा मान जातो तो आईसलँडच्या विग्डीस फिनबोगाडट्टीर यांच्याकडे. १९८० मध्ये झालेली राष्ट्रपतीपदाची निवडणूक विग्डीस यांनी जिंकली होती. त्यानंतर हे पद सर्वात जास्त काळ भूषविण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर जमा झाला आहे. विग्डीस यांनी आईसलँडचे १५ वर्षे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते.

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान मिळाला तो इंदिरा गांधी यांना. यासोबत इंदिरा या जी-२० देशांच्या गटातील पहिल्या महिला पंतप्रधानही ठरल्या. त्यांनी १९६६-७७ आणि १९८०-८४ या काळात भारताचे पंतप्रधानपद भूषविले होते. इंदिरा गांधींनंतर आशिया खंडातील देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेली महिला म्हणजे गोल्डा मेयर. मध्य पूर्व आशियाई देशातील पहिली महिला पंतप्रधान होण्याचा मान इस्राईलच्या गोल्डा मेयर (१९६९-७४) यांना जातो.

युनायटेड किंगडम (युके)च्या मार्गारेट थॅचर (१९७९-९०) या जी-७ देशांतील आणि सार्वभौम युरोपियन देशांच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. त्यानंतर युकेच्याच एलिझाबेथ द्वितीय या जगाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या महिला ठरल्या आहेत. १९५२ पासून त्या आजतागायत युकेच्या राणी म्हणून सर्व जगाला परिचित आहेत. एखाद्या पुरुषापेक्षा जास्त काळ राजगादीवर बसणारी स्त्री म्हणून त्यांची २०१६ मध्ये त्यांनी नवा विक्रमही नोंदविला आहे. 

- Women`s Day:सिंगल मदरने आर्थिक नियोजन कसे करावे?

जगातील मुस्लीम बहुल देशांच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारी पहिला महिला पंतप्रधान ठरल्या त्या पाकिस्तानच्या बेनझीर भुट्टो. भुट्टो यांनी १९८८-९० आणि १९९३-९६ या काळात पाकचे पंतप्रधानपद भूषवले होते. तर तुर्कीच्या तानसू आयलर या युरोप खंडात प्रथम निवडून आलेल्या मुस्लिम महिला पंतप्रधान ठरल्या. 

युरोप आणि आशिया खंडातील देशांच्या महत्त्वाच्या पदांवर महिलांनी वर्चस्व गाजवलेला इतिहास आपण पाहिला. मात्र, जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत महिलांना आतापर्यंत एकाही महिलेला राष्ट्राप्रमुख होण्याचा मान मिळाला नाही. अमेरिका खंडातील उत्तर अमेरिका हा भाग वगळता महिलांना वर्चस्व राखता आले नाही. उत्तर अमेरिकेतील कॅनडाच्या जीन सावे (१९८४-९०) या पहिल्या महिला गव्हर्नर, तर किम कॅम्पबेल (१९९३) या उत्तर अमेरिकेच्या पहिल्या महिल्या राष्ट्रप्रमुख बनल्या. 

महिलांसाठीच्या विविध कोर्सेसची माहिती घेण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेत हिलरी क्लिंटन, मिशेल ओबामा, कॅथलिन सेबेलिअस, जेनेट नेपोलिटानो, मार्गारेट हँम्बर्ग, मायकेल बॅकमेन, मॅरी स्कॅपिरो, अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी, सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हान्का ट्रम्प या अमेरिका प्रशासन आणि मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या पदाधिकारी आणि मंत्री राहिल्या आहेत. मात्र, आतापर्यंत एकाही महिलेला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी झेप घेता आली नाही. किंवा तेथील जनतेने एखाद्या महिलेची राष्ट्राध्यक्षपदासाठी निवड केली नाही, हे वास्तव आहे.   

सध्या जर्मनीच्या अँजेला मर्केल, ब्राझीलच्या माजी राष्ट्रपती दिलमा रॉसेफ, अर्जेंटिनाच्या राष्ट्रपती ख्रिस्तिना फर्नांडीस, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड, म्यानमारच्या आंग सान सू की, जॉर्डनच्या राणी रानिया अल्-अब्दुल्ला, थायलंडच्या पंतप्रधान यिंगलक शिनवत्रा, लायबेरियाच्या राष्ट्रपती एलन जॉन्सन या जगभरातील सध्याच्या सर्वात ताकदवान महिला म्हणून ओळखल्या जातात.

- Women's Day : 'आहे ना ती... घेईल सांभाळून!'

जगातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत भारताच्या सोनिया गांधी यांचा समावेश आहे. तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देशाच्या राजकारणातील प्रमुख पदे भूषविली आहेत. मात्र, इंदिरा गांधींनंतर एकाही महिलेची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली नाही.