अतिआत्मविश्‍वासातून ओढवलेलं संकट

भारत महासत्ता होणार यावर आपला विश्वास होता, याला काही फार दिवस झालेले नाहीत किंवा देश महासत्तेच्या दिशेनं जातो आहे हेही आपलं ठाम मत होतं.
Oxygen Bed
Oxygen BedSakal

भारत महासत्ता होणार यावर आपला विश्वास होता, याला काही फार दिवस झालेले नाहीत किंवा देश महासत्तेच्या दिशेनं जातो आहे हेही आपलं ठाम मत होतं. त्याचे पुरावे लांबलचक आणि लक्षवेधकच होते : आपण जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहोत... जगातील सहाव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहोत... १.३८ अब्ज लोकांची बाजारपेठ आहोत... आपण माहिती तंत्रज्ञानात आघाडीवर व पाश्चिमात्य देशांचे बॅकऑफिस आहोत... आपला क्रिकेटचा संघ अपराजित आहे... हिंदी चित्रपटसृष्टी जोमात आहे... आणि होय, जगभरातील नेत्यांमधील एक प्रमुख नाव असलेले आपले पंतप्रधान... राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हे पटवून दिलं होतं, की आपला देश हिंदुबहुल असल्यानं हे शक्य झालं आहे. भारतीय जनता पक्षाचं याबाबतचं मत अधिकच स्पष्ट होतं : हे सर्व नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झालं आहे.

गांभीर्य ओळखण्यात अपयश

एका अदृश्य विषाणूनं बढायांचा हा फुगा फोडला. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आपल्या मित्रराष्ट्रांनी त्यांच्या देशाचे दरवाजे आपल्यासाठी बंद केले आहेत. भारतातून जाणारी विमानं पॅरिसपासून हाँगकाँगपर्यंत आणि कॅनबेरापासून दुबईपर्यंत सर्वांनीच रोखली आहेत. मधल्या काळात आपल्या शत्रुराष्ट्रांनी मदतीचा हात पुढं केला आहे. चीननं मदत देऊ केली आहे. पाकिस्तानातील स्वयंसेवी संस्थांनी सर्वप्रथम आपल्या पंतप्रधानांना मदत देण्यासंदर्भातील पत्र लिहिलं. त्यानंतर काही दिवसांनी इम्रान खान यांनी ट्विटद्वारे मदतीची घोषणा केली. हा त्या देशांनी दाखवलेला चांगुलपणाच म्हणायला हवा; पण त्यामुळे आपल्या सरकारला त्रासच झाला असणार. तर मग चूक नक्की कुठं झाली? याची अनेक उत्तरं आहेत.

मात्र, त्यापैकी मला ज्याबद्दल अधिक चिंता वाटते तो युक्तिवाद असंच सुचवतो, की हे संकट आपण स्वतःवर ओढवून घेतलं आहे. माझा रोख आपल्या यापूर्वीच्या दोन गृहीतकांकडे आहे व ती म्हणजे, ‘आम्ही खूप स्पेशल आहोत आणि आम्ही विषाणूवर विजय मिळवला आहे,’ त्याचबरोबर ‘आणखी वाईट घडू शकतं, यादृष्टीनं योजना आखण्यास आपण दिलेला नकार.’

दुसऱ्या शब्दांत, आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य ओळखण्यात आलेलं अपयश. याचं विवेचन करण्याआधी मी एक सांगतो, एका महाशक्तीकडून आकार आणि शक्तीव्यतिरिक्त आणखी काही अपेक्षित असतं. इथं आपण पूर्णपणे अयशस्वी ठरलो.

आत्मस्तुतीत मश्गुल!

पहिलं, मागील सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग आपण काहीही न करता वेगानं कमी होण्यास सुरुवात झाली आणि आपण विजयोत्सव सुरू केला. युरोप आणि अमेरिकेत दुसरी किंवा अगदी तिसरी लाट येत असताना आणि ती पहिलीपेक्षा अधिक मोठी असताना, आपण आपल्यासाठीचं विधिलिखित काही वेगळंच असल्याचं गृहीत धरून चाललो. जानेवारी महिन्यातच मोदी यांनी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ला सांगितलं, की ‘आम्ही कोरोनाला हरवलं आहे.’ त्यानंतर तीन आठवड्यांनी, ता. २१ फेब्रुवारीला भारतीय जनता पक्षानं पुढील ठराव मंजूर केला : ‘आम्ही हे अगदी अभिमानानं सांगू शकतो, की भारतानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम, संवेदनशील, दृढ व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वात आपण कोरोनाला केवळ पराभूतच केलं असे नव्हे, तर सर्व भारतीय नागरिकांमध्ये ‘आत्मनिर्भर’ भारताच्या निर्मितीसाठीचा आत्मविश्वासही निर्माण केला. त्यांनी देशाला जगासमोर कोरोनाच्या लढाईतील एक अभिमानी व विजयी राष्ट्र म्हणून पेश केल्याबद्दल आमचा पक्ष निःसंदिग्धपणे त्यांचा गौरव करत आहे.’

स्वतः डॉक्टर असलेल्या देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी मार्च महिन्यात त्यात स्वतःची भर घातली. त्यांनी ‘दिल्ली मेडिकल असोसिएशन’कडे असा दावा केला, की ‘देश कोरोनाच्या महामारीचा अंत करण्यापर्यंत (एंडेमिक) येऊन पोचला आहे.’ हे सर्व अयोग्य, अशास्त्रीय, अतार्किक होतं आणि तो थेट वेडेपणानं करून घेतलेला समज होता. त्याचीच फळं आज आपण सर्वजण भोगतो आहोत. परिणामी, आपण दुसऱ्या लाटेसाठीची तयारीच केली नाही. खरं तर, आपण पहिल्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी निर्माण केलेल्या सर्व सुविधा बंद करून टाकल्या. विशेष समित्यांनी ऑक्सिजनचं उत्पादन वाढवण्याच्या एप्रिल २०२० मध्ये केलेल्या सूचनांना केराची टोपली दाखवली गेली. त्यानंतर उत्पादन करण्याचं ठरवण्यात आलं. मात्र, आठ महिने कोणतंही टेंडर काढलं गेलं नाही. स्थिती आपल्या बाजूनं आहे, या भ्रमात आपण राहिलो. त्यामुळे ऑक्सिजनच्या मंजूर झालेल्या १६२ प्लॅंटपैकी केवळ ३३ पूर्ण होऊ शकले. परिणामी, देशाला उद्योगांसाठीचा ऑक्सिजनचा वापर पूर्ण थांबवावा लागला आहे आणि आपण जो देश ५० हजार टन ऑक्सिजन विकण्याची तयारी दाखवेल, त्याच्याकडून तो आयात करण्यासाठी उतावीळ झालो आहोत. आपला बेजबाबदारपणा आणि अक्षमतेचं आणखी एक उदाहरण मी देतो. आम्ही जगातील सर्वांत मोठे लस-उत्पादक असल्याची बढाई आपण मारत होतो. मात्र, स्थिती स्पष्ट दिसत असूनही, संपूर्ण देशाचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी आवश्यक लशींचं उत्पादन आपण करू शकलो नाही. पुन्हा एकदा, याचं कारण, आपण तशी योजना आखण्याची तसदीच घेतली नाही किंवा हुशारीनं हे काम पूर्ण करण्याची आपली क्षमताच नव्हती.

देश असहाय्य, वाऱ्यावर...

लक्षात घ्या : मागील वर्षीच्या मे किंवा जूनमध्येच आपल्याला हे समजलं होतं, की देशातील ७५ टक्के लोकसंख्येला लशीच्या दोन मात्रा द्यायच्या ठरल्यास आपल्याला दोन अब्ज मात्रांची गरज पडेल. हे अगदी सोपं गणित आहे.

आपल्याला हेही माहीत होतं, की देशाची लस-उत्पादनक्षमता पाहता, आपण विशिष्ट कालावधीमध्ये आवश्यक लशींची निर्मिती करू शकणार नाही. मग आपण काय करणं अपेक्षित होतं? एखाद्या महाशक्तीनं ताबडतोब आपली उत्पादनक्षमता वाढवली असती. ती गरजेनुसार दुप्पट किंवा तिप्पट केली असती. मात्र, आपण काहीही केलं नाही. विषाणूचं कोणतंही संकट नसल्याप्रमाणे आपण आनंदानं जगत राहिलो. आता आपण संकटात सापडलो आहोत. जगावर छाप पाडण्याच्या नादात मश्गुल असताना आपल्या बाबतीत आपण हे कसं काय घडू दिलं, हे समजेनासं झालं आहे.

आता जगाला भारताचं चित्र असं दिसत आहे, की हा देश संभाव्य महासत्ता नाही. उलट, भारत एक हास्यास्पद व कोसळायला सुरुवात झालेला तिसऱ्या जगातील देश आहे. देश स्वतःवर ओढवून घेतलेलं संकट हाताळण्यात अयशस्वी ठरत आहे. बेडच्या व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णालयं कमजोर झाली आहेत. रुग्ण रुग्णवाहिकेतच, काही वेळा रस्त्यात आणि फुटपाथवर मरत आहेत. मोकळ्या मैदानांची स्मशानं झाली आहेत. देशातील प्रत्येक जण असहाय्य आहे, रडतो आहे. नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिलं गेलं आहे व त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणीही नाही. पाश्चिमात्य माध्यमांत आपल्या देशाची अशी भयंकर प्रतिमा निर्माण झाली आहे. आपल्या देशाच्या सरकारचा विचार करता, ती यापेक्षाही वाईट आहे. याचं कारण, त्यांच्या लक्षात आलं आहे की, भारताचं नेतृत्व कणखर, निर्णयक्षम वाटत होतं, मात्र या नेतृत्वाला सध्या निर्माण झालेल्या आव्हानाची काही कल्पनाच नाही किंवा ते त्याला तोंड देण्यासाठी अक्षम आहे.

बढाईखोरीचा बुरखा फाटला

खरंच, नेतृत्वाची वागणूक असंच सुचवते की, परिस्थिती किती भयावह होऊ शकते याबाबतीत ते अज्ञ आहेत किंवा तसं मान्य करण्याची त्यांची इच्छा नाही. त्यामुळे आज संपूर्ण जगाला, भारतात काय चाललं आहे, हे पाहून भीती वाटते आणि ते हताश होतं. देशाच्या बढाईखोरीचा बुरखा फाटून गेला आहे. त्यातून उघडं पडलेलं वास्तव विद्रूप आहे व ते झाकणं आता अशक्य झालं आहे. आपण स्वतःला फार विशेष समजत होतो; पण तसं काहीही नाही. दूरचित्रवाणीनं व सोशल मीडियानं वेगळंच सत्य समोर आणलं आहे. ‘एक भयभीत झालेला देश,’ अशी आपली प्रतिमा झाली आहे. आपण घाबरून गेलो आहोत. देशाला आघाडीचा व महान बनवण्याचं स्वप्न आता दुःस्वप्नात परिवर्तित झालं आहे. आपली स्वतःचीच अकार्यक्षमता व बेजबाबदारपणा याला कारणीभूत असल्याच्या भावनेनं आपल्याला पछाडलं आहे. उजळ आणि सुंदर सकाळ पाहण्यासाठी मोठा कालावधी जावा लागणार आहे. मात्र, ही यातनादायी रात्र संपणार तरी कधी?

(सदराचे लेखक दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

(अनुवाद : महेश बर्दापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com