भाषा संवाद : उच्चारातील भावसंवाद - आवाजाच्या क्षमता व मर्यादा

Marathi Article : भाषासंवादात ‘आवाजनिर्मिती’ हा एक शारीरिक क्रियायोग आहे, हे आपण ‘भाषासंवाद’च्या मागील भागातून पाहिले
Language Communication
Language Communicationesakal

लेखिका : तृप्ती चावरे-तिजारे

भाषा संवादाचे एकमेव माध्यम म्हणजे आवाज. या माध्यमाकडे आपण साधन म्हणूनही पाहत आहोत. याचा अर्थ भाषेच्याही आधी ‘आवाज’ हा घटक अधिक महत्त्वाचा आहे. वरकरणी वाटत असल्या, तरी भाषा आणि आवाज या दोन गोष्टी स्वतंत्र नाहीत, हे आपल्याला भाषेसाठी आवाज वापरू लागल्यावर अनुभवास येते. सुरवातीला त्या दोन असतात; पण त्या एक झाल्यावर जी भाषा निघते, ती अनेक गुणांनी संपन्न अशी असते. आपल्याला याच गुणसंपन्नतेकडे आवाजाच्या बाजूने पाहायचे आहे. (nashik saptarang latest article on Language Communication news)

भाषासंवादात ‘आवाजनिर्मिती’ हा एक शारीरिक क्रियायोग आहे, हे आपण ‘भाषासंवाद’च्या मागील भागातून पाहिले. क्रिया ही शरीराला घडविते; तर योग हा मनाला घडवितो. म्हणून भाषेचा डौल घडविण्यासाठी शरीराच्या आणि मनाच्या एकत्रित क्रियायोगाला विशेष महत्त्व आहे.

हे क्रियायोग भाषा अभ्यासकांनी सरावाने, स्वतंत्ररीत्या आणि जाणीवपूर्वक साधले पाहिजेत, यासाठी आवाजाचे शरीर घडविणे जितके महत्त्वाचे, तितकेच मन घडविणेही महत्त्वाचे. म्हणून आता सर्वप्रथम, आपल्याला व्यक्तिगत पातळीवर भाषेचे सौष्ठव कसे घडविता येईल, ते पाहायचे आहे.

त्यासाठी या भागातून आपण भाषेला जन्म देणाऱ्या आवाजाच्या क्षमता आणि मर्यादा यांचा विचार करणार आहोत. भाषा ही आवाजातून निर्माण आणि व्यक्त होत असते. अगदी छापील भाषेलाही आवाज असतो. छापील वाक्ये आपण पुस्तकातच सोडून देऊ शकत नाही, तर त्यांचा प्रत्यक्ष बोलण्यात वापरही करतो.

भाषा संवादाचे एकमेव माध्यम म्हणजे आवाज. या माध्यमाकडे आपण साधन म्हणूनही पाहत आहोत. याचा अर्थ भाषेच्याही आधी ‘आवाज’ हा घटक अधिक महत्त्वाचा आहे. वरकरणी वाटत असल्या, तरी भाषा आणि आवाज या दोन गोष्टी स्वतंत्र नाहीत, हे आपल्याला भाषेसाठी आवाज वापरू लागल्यावर अनुभवास येते. सुरवातीला त्या दोन असतात; पण त्या एक झाल्यावर जी भाषा निघते, ती अनेक गुणांनी संपन्न अशी असते. आपल्याला याच गुणसंपन्नतेकडे आवाजाच्या बाजूने पाहायचे आहे.  (latest marathi news)

Language Communication
भाषा संवाद : भाषा प्रयोग आणि आवाजाचे संतुलन...

गाताना आणि बोलताना आवाज कसा वापरावा, याविषयी आवाजाचे अध्यापक आणि अभ्यासक सचिन चंद्रात्रे यांचे एक फार सुंदर वाक्य या ठिकाणी मला आठवते. ते म्हणजे, ‘आवाज ही देवाने मानवाला दिलेली एक अद्‌भूत देणगी आहे. ती डोळ्यांनी दिसत नाही; पण कानांनी ऐकता येते.

सुरवातीला ती नक्कल म्हणूनच दिसते; पण ठरविले, तर नंतर ‘कला’ म्हणूनही ऐकता येते...’ किती नेमकं वाक्य आहे हे ! आवाजाचा वापर हा गाणे आणि बोलणे या दोन्ही क्रिया व्यक्त करण्यासाठी केला जातो. या दोन्ही क्रियांमध्ये सर्वप्रथम आपण कुणाची तरी नक्कल करीत असतो.

लहान मुलाच्या आणि लहान गायकाच्या आवाजाचा प्रवास हा नकलेपासूनच सुरू होत असतो, हे लक्षात घेण्यासारखे आहे. आपल्या स्वरयंत्रावर कल्पनेचे राज्य असते. माणूस केवळ माणसाचीच नव्हे, तर पशु, पक्षी आणि प्राण्यांच्याही आवाजाची नक्कल अगदी सहज करू शकतो; पण प्रश्न स्वतःची शैली निर्माण करण्याचा असतो.

तेव्हा नकलेपासून दूर होऊन कलेकडे पाहावे लागते, म्हणूनच आपण भाषेसाठी लागणाऱ्या आवाजाकडे ‘कला’ म्हणून पाहणार आहोत. सचिन सरांनी मला सांगितलेली कलेची सोपी व्याख्या म्हणजे ‘ज्यात नकला नाहीत, ती कला’. वर पाहायला गेलो, तर हे फार सोपे वाटते; पण प्रत्यक्ष अनुभवायला गेल्यावर तितकेच अवघड. म्हणूनच, आता ही कला, भाषा म्हणून शिकण्यासाठीचे आवाजाचे विशिष्ट तंत्र आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यासाठी थोडीशी पूर्वतयारी...

आवाजाला भावना असते आणि भावनेलाही आवाज असतो. आवाज हे एकाच वेळी शरीरविज्ञान, मनोविज्ञान, तंत्र आणि कलाही आहे. या प्रत्येक बाजूने आवाजाकडे पाहिले गेले पाहिजे. प्रत्येकाच्या आवाजाला काही क्षमता असतात; तर काही मर्यादा... जगद्‌विख्यात कवी हरिवंशराय बच्चन यांची कविता ख्यातनाम अभिनेते अमिताभ बच्चन वाचतात, तेव्हा त्यांच्या त्या प्रयोगातून आवाजाच्या क्षमतांची कल्पना करता येते; आणि तीच कविता आपण स्वतः वाचायला घेतली तर त्या क्रियेतून आपल्याला आपल्या आवाजाची ‘मर्यादा’ कळून चुकते.

ज्याला मर्यादा कळते, त्याला त्या मर्यादेवर मात करून क्षमतेचे रस्तेही दिसू शकतात. भाषेशी संवाद साधताना आवाजाच्या क्षमता आणि मर्यादा यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो, तरच उच्चारांशी भावसंवाद साधता येतो. घडलेल्या आवाजात क्षमता दडलेल्या असतात; तर बिघडलेल्या आवाजात ‘मर्यादा’ दिसून येतात.

भाषा अभ्यासकाने या दोन्हींचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या आवाजात आणि उच्चारात झालेला बिघाड दुरुस्त करणे म्हणजेच उच्चार, भावना आणि भाषा घडविणे. आवाज आणि उच्चार निर्मितीत बिघाड घडवून आणणारे मुख्य तीन घटक. शरीररचना, श्वास आणि चढ-उतार. या तीन घटकांतील विसंवाद ओळखणे आणि त्यावर काम करणे हे आवाज निरीक्षणातून शक्य आहे. या तीन घटकांमध्ये सुसंवाद सुरू झाला की आवाज घडू लागतो, भाषेतील भावसंवाद उमगू लागतो. हा संवाद सोपा व्हावा, म्हणूनच भाषा संतुलनाचा त्रिकोण आपण डोळ्यांसमोर ठेवला आहे.  (latest marathi news)

Language Communication
भाषा संवाद : आवाज - भाषा संवादाचे एकमेव प्रभावी माध्यम
आवाजाचा संतुलन त्रिकोण
आवाजाचा संतुलन त्रिकोणesakal

सुंदर आणि नादमय भाषा घडविणारी भाषा संतुलन त्रिकोणाची तिसरी बाजू म्हणजे भावना किंवा मन. भाषेत चढ-उतार आले, की मनाचे किंवा भावनेचेही चढ-उतार समजू शकतात. वाक्य वाचणे, वाक्य बोलणे, वाक्य उच्चारणे आणि त्या वाक्याशी संवाद साधणे यापैकी वाक्याशी संवाद साधण्याचे काम भावनेचे ! एखादे वाक्य बोलत असताना त्या वाक्यातील भावना ओळखून वाक्य-उच्चारात ती भावना योग्य तो आवाज वापरून जाणीवपूर्वक ओतावी लागते.

यासाठी एक क्रिया करता येते, ती म्हणजे आवाजाचा लहान मोठेपणा वापरून वाक्यातील चढ-उतार हाताळणे. संगीतात ज्याप्रमाणे सुरांना उंची असते, त्याचप्रमाणे भाषेतही शब्दांना आवाजाकडून चढ-उतार असतात. “गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार” आणि “जन पळभर म्हणतील हाय हाय” हे दोन्हीही कवितेचेच प्रकार... लेखन किंवा वाचन पातळीवर ते एकाच साहित्य प्रकारातले आहेत, मात्र उच्चारांचा विचार केला तर या दोन रचना कविता या गेय साहित्य प्रकारातल्याच असल्या तरीही त्या परस्पर विरुद्ध भावना आहेत हे वाचनातून सिद्ध करता येते.

त्यांतील भावना वेगवेगळया असल्याने कविता वाचन करीत असताना त्यातील चढ-उतारही, त्या-त्या रचनेतील स्वभावाप्रमाणे वेगवेगळे हाताळावे लागतात. ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’मधील वीररसाचा भाव व्यक्त करायचा असेल तर उच्चारांचा आवेश भारदस्त आणि खड्या आवाजात व्यक्त करावा लागेल; पण ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ म्हणत असताना उच्चारातील मार्दव आणि नाजूक भावना संयमाने हाताळावी लागेल.

‘मराठी भाषा ही नवरसांची खाण आहे’ असे म्हणत असताना ते नऊ रस समजण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी त्या-त्या रसाच्या भावना परिपोषानुसार भाषेचा अभिनिवेश किंवा उच्चारांचा अभिनय करावा लागतो. याला भाषिक किंवा वाचिक अभिनय असेही म्हणतात. भाषेला भावनेकडून न्याय देण्याचा प्रयत्न हा वक्त्यांपेक्षाही अभिनेत्यांकडून अधिक दर्जेदारपणे केला जातो.

कारण, आवाजातील चढ-उतार हा अभिनेत्यांसाठी नाट्यप्रवेशाचा प्राण असतो. आपण एखाद्याशी कठोर बोललो, तेव्हा त्या बोलण्याचा त्याच्यावर होणारा परिणाम आणि याउलट एखाद्याशी लाघवी भाषेत संवाद साधला, तेव्हा त्या बोलण्याचा त्याच्यावर पडणारा प्रभाव हा वेगवेगळा असतो. व्यक्ती तीच, भाषा तीच; पण भावनेचे अंतर असते.

अर्थमंत्र्यांनी संसदेत केलेल्या अर्थसंकल्पीय अभिभाषणाच्या तुलनेत, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरचे जनतेला उद्देशून केलेले संबोधन उजवे ठरते, कारण त्यात भावनिक आवाहन असते, देशप्रेम असते. कीर्तनकार, कथाकार, नाटककार हे इतरांपेक्षा संवादात्मक शैलीत सरस ठरतात.

कारण, इतरांच्या एकसुरी भाषणात असलेला भावनेचा अभाव ते आपल्या भावपूर्ण शैलीतून भरून काढतात. वाक्यातले चढ-उतार हाताळता येणे हा भाषामानसशास्त्राचा भाग ज्याला समजला, त्याच्यासाठी श्रोतृसभा जिंकणे फारसे अवघड नसते. भाषा संवादाचा अभ्यास करीत असताना आवाजाच्या क्षमता वापरता येणे या पुढची पायरी म्हणजे उच्चारातील भावना वापरता येणे. त्याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या भागात.

(क्रमशः)

Language Communication
भाषा संवाद : श्वास अन आवाजनिर्मिती, एक शारीरिक क्रियायोग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com