भाषा संवाद : भाषा प्रयोग आणि आवाजाचे संतुलन...

ज्याचे उच्चार घडतात, त्याचे बोलणे सहज, सोपे आणि प्रवाही वाटू लागते. त्याची भाषाही आपोआपच सुंदर आणि शैलीदार होत जाते.
language communication
language communicationesakal

लेखक : तृप्ती चावरे-तिजारे

जसे बाराखडी गिरविल्याने अक्षर घडते, तसेच बोलण्याची सवय केल्याने उच्चार घडतात. ज्याचे उच्चार घडतात, त्याचे बोलणे सहज, सोपे आणि प्रवाही वाटू लागते. त्याची भाषाही आपोआपच सुंदर आणि शैलीदार होत जाते.

ज्याला उच्चार आणि भाषा घडवायची आहे, त्याच्यासाठी ‘भाषा’ हा केवळ एक शिक्षण सोपस्कर किंवा माध्यम म्हणून उरत नाही, तर त्या भाषेतून भावना जिवंत करणारा संवाद आणि संवेदना जागा करणारा संस्कार त्याला दिसू लागतो व त्याचा स्वतःचा ‘भाषासंवाद’ आकार घेऊ लागतो... (saptarang latest marathi article by trupti tijare on Language Communication Experiments Sound Balance nashik news)

मराठी भाषा संवादात भाषा ऐकणे, भाषा वाचणे, भाषा बोलणे आणि भाषा लिहिणे असे चार वेगवेगळे प्रयोग असतात. त्यातील मूळ ‘भाषा’ मात्र एकच असते, त्यामुळे आपण या चारही घटकांचा सरसकट आणि एकत्र विचार करतो.

पण, अवगत केलेली भाषा व्यक्त करता येणे हा प्रगत कौशल्याचा भाग आहे. हे भाषाकौशल्य आत्मसात करण्यासाठी भाषेच्या वरील चारही क्रियांमधून मला स्वतःला ‘व्यक्त’ कसे होता येते, याचा अभ्यास करायला हवा. सवय म्हणजे तरी नक्की काय? सोप्या शब्दात सांगायचे तर अभ्यास म्हणजेच सवय.

मराठी ऐकण्याची सवय. मराठी मननाची सवय आणि मराठी बोलाण्याची सवय... जसे बाराखडी गिरविल्याने अक्षर घडते, तसेच बोलण्याची सवय केल्याने उच्चार घडतात. ज्याचे उच्चार घडतात, त्याचे बोलणे सहज, सोपे आणि प्रवाही वाटू लागते. त्याची भाषाही आपोआपच सुंदर आणि शैलीदार होत जाते.

ज्याला उच्चार आणि भाषा घडवायचे आहेत, त्याच्यासाठी ‘भाषा’ हा केवळ एक शिक्षण सोपस्कर किंवा माध्यम म्हणून उरत नाही, तर त्या भाषेतून भावना जिवंत करणारा संवाद आणि संवेदना जागा करणारा संस्कार त्याला दिसू लागतो व त्याचा स्वतःचा ‘भाषासंवाद’ आकार घेऊ लागतो.

या लेखमालेतून आपण या भाषासंवादाचाच अभ्यास करीत आहोत. हा विचार केवळ मराठी भाषेपुरता मर्यादित नाही, तर कोणत्याही भाषेला हा विचार आपण लागू करू शकतो.

अगदी कला, क्रीडा, साहित्य, अभिनय, नाट्य, काव्य, अभिवाचन, संगीत, शिल्प, नृत्य, चित्र अशा कोणत्याही कलाभाषेत जो संवाद असतो, तोही आपणास अनुभवास येऊ शकतो; पण तूर्तास विचार ‘मराठी’ बोलण्याचा आणि त्यातून उलगडणाऱ्या भाषासंवादाचा.

वरील चारही क्रियांपैकी भाषेचा सगळ्यात जास्त वापर करणारी व्यक्त क्रिया म्हणजे बोलण्यातली भाषा, अर्थात उच्चारांची क्रिया. बोलीभाषेचे मुख्य दोन प्रकार करता येतील.

language communication
भावना यंत्राच्या ताब्यात!

पहिली म्हणजे ‘अनौपचारिक’ बोलीभाषा आणि दुसरी ‘औपचारिक’ भाषा. या दोघी बहिणी-बहिणी; पण त्यांचे राहण्याचे आणि वावरण्याचे प्रांत मात्र निरनिराळे! बोलीभाषा म्हणजे दैनंदिन जीवनाची भाषा, व्यवहाराची भाषा... साधीसुधी, चार भिंतीत राहणारी... तर, ‘औपचारिक भाषा’ म्हणजे नट्टापट्टा करून चारचौघांत मिरवणारी! बोलीभाषा म्हणजे नात्यागोत्यांची, प्रेमाची आणि अगत्याची देवघेव, तर औपचारिक भाषा म्हणजे शिष्टाचाराचे अतीव सभ्य सादरीकरण.

आपापल्या जागी या दोघींचेही महत्त्व आहेच. त्यांची प्रयोगक्षेत्रे मात्र निरनिराळी आहेत. मुलगा घरात आईशी बोलतो, तशी भाषा त्याला ‘मुलाखतीत’ वापरून चालत नाही, त्यासाठी विशिष्ट शिष्टाचार हा पाळावाच लागतो.

हा शिष्टाचार प्रत्येक क्षेत्रागणिक वेगवेगळा असतो. संभाषण, भाषण, विपणन कौशल्य, कविता वाचन, साहित्य वाचन, व्याख्यान, उतारा वाचन, नाट्य, अभिनय, सूत्रसंचालन, समारंभ, प्रवचन, कीर्तन, प्रबोधन, नेतृत्व अशा विविध क्षेत्रांतून एकाच भाषेच्या वेगवेगळ्या शैली आणि आवाजाच्या क्षमता वापरून बोलावे लागते.

आपापल्या अनुभवानुसार आणि वकुबानुसार प्रत्येक जण आपल्याला सहज सोपी वाटेल, अशी सोयीची बोलीभाषा, त्याची ‘वैयक्तिक भाषाशैली’ म्हणून श्रवण संस्कारातून घडवीत असतो आणि निरीक्षणातून ती स्वीकारतही असतो.

तीच भाषा तो स्वतःची ढब किंवा शैली म्हणून जमेल त्या आवाजात बोलतही असतो; परंतु मी ‘बोलीभाषा’ म्हणून स्वीकारलेली शैली आणि आवाज, आहे त्यापेक्षा आणखी सुंदर करता येईल का? असा विचार फार थोडे जण करतात.

जे असा विचार करतात, त्यांच्या हे लक्षात येते की आवाज आणि भाषाशैली कशी घडते आहे, याचा फार मोठा संबंध व्यक्तिमत्त्व घडण्याशी किंवा बिघडण्याशी असतो.

नेहमीच्या बोलण्यातली भाषा प्रवाही आणि प्रभावी करायची असेल तर त्यासाठी भाषा व्यक्त करणाऱ्या आपल्या आवाजाकडे कानाने आणि मनानेही लक्ष द्यावे लागते. भाषेतील बोली कौशल्ये व्यक्त करण्याचे एकमेव माध्यम म्हणजे आपला आवाज. तो स्वतंत्रपणे आणि जाणीवपूर्वक घडवावा लागतो.

language communication
ज्योती झाली ज्वाला!
आवाजाच्या संतुलनाचा त्रिकोण
आवाजाच्या संतुलनाचा त्रिकोणesakal

आवाजाच्या संतुलनाचा त्रिकोण

आवाज घडवीत असताना आपल्याला आपल्याच बोलण्यातले ‘संतुलन’ समजू लागते. हे संतुलन मुख्यत्वे पुढील तीन गोष्टींवर अवलंबून असते. भाषेतील प्रत्येक उच्चार करताना आपण १. आपली शारीरिक आवाज यंत्रणा (आर्टीक्यूलेशन) कशी वापरतो?, २. श्वास कसा वापरतो?, ३. भावना व्यक्त करण्यासाठी आवाजातील चढ-उतार कसे वापरतो?

हा मुद्दा आपण एका संतुलन त्रिकोणाच्या आधारे समजावून घेऊ या. चित्रात दाखविलेल्या त्रिकोणाच्या टोकावर उच्चाराचे संतुलन दाखविले आहे. या त्रिकोणातील एका जरी कोनाचा तोल गेला, तरी बोलण्याचे संतुलन ढासळणार आहे.

आवाज हा या संतुलन त्रिकोणाचा पाया. भाषा कितीही तयार केली; पण आवाजच तयार केला नाही तर भाषेचा डौल जातो. भाषेचा डौल हा आवाजाच्या तोलावर अवलंबून आहे.

उत्तम भाषा ही उत्तम आवाजात बोलता येणे हे आपल्याला श्वास घेण्याइतके महत्त्वाचे वाटत असेल, तर आवाजाचा तोल सांभाळायला शिकले पाहिजे. आवाजाचा तोल कसा सांभाळावा, याविषयी अधिक चर्चा आपण पुढील भागात करणार आहोत.

(क्रमशः)

language communication
बोलू ऐसे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com