
एम् ने एन् ला ! नाथ निफाडकरांचे प्रेमगीत !
एकनाथ यादव निफाडकर उपाख्य नाथ निफाडकर (१८८८ - १९४९) नाशिकात कार्यकर्तृत्व गाजवलेले कवी होत. कवीचे शिक्षण धुळे नि नाशिक येथे झाले.
कवीचे गोत्र गौतम असल्याचा उल्लेख कवी अनेक कवितातून करताना सापडतो तर कवीचे वडील वेदांचे ज्ञाते असून त्यांनी ऋग्वेदावर भाष्य केल्याचे, त्यातील काही लेख प्रकाशित झाल्याचे व ते भाष्य लिहित असतानाच त्यांना मृत्यू आल्याचे वर्णन कवी करतो.
कवीची पत्नी इंदिराबाई, मुलगी कुमुदिनी तर मुलगा सुरेंद्र असल्याचे कवीच्या लिखाणावरुन सापडते. कवीची पत्नी इंदिरा कवयित्री असून तिची एक कविता ‘गुण न करां बाळा !’ ही गोदातटीच्या गुंजारवात सापडते.
कविता सामान्य दर्जाची असून तीत इकडून म्हणणे ‘’मामंजी तू’’। अर्थात मुलाच्या रुपात वडिलच परत आल्याची कवीची धारणा दाखवतो. शिवाय कवी पत्नीची एक कथा मानारचे आखातात पण सापडते. कवीची पहिली पत्नी वाररेली असल्याचे देवा, एवढे तरी दे! या कवितेतील तळटिपेवरुन समजते. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet eknath nifadkar upakhya nashik)
कवीने आपल्या नावात प्रास व नाजुकपणा यावा म्हणून त्यांनी स्वतःच्या नावातील ‘एक’ काढून केवळ नाथ ठेवले पण प्रत्यक्षात मूर्ती वेगळीच होती. पक्का काळा रंग, ओबडधोबड चेहरा, नेहमी वैतागात गळ्यापर्यंत बुडालेले असे दिसायचे, असे कुसुमाग्रज त्यांच्याविषयी ललितच्या १९६७ च्या दिवाळी अंकात लिहितात.
सोबतच ‘ते हुशार व व्यासंगी असावेत’ अशी अंदाजवजा पुष्टी जोडतात. तसे पाहिले तर कवीच्या व्यासंगाविषयी प्रा. सदानंद मोरेसुध्दा ‘मनस्वी विचारवंत’ म्हणत त्यांच्या ‘राजवाड्यांची इतिहासशास्त्रमीमांसा’ या गाजलेल्या निबंधाचा दाखला देतात.
तर आणखी एक समीक्षक भवानीशंकर पंडित ‘लोकमान्य’ या निफाडकरांच्याच संपादकत्वाखाली छापल्या जाणाऱ्या नियतकालिकात नाथ निफाडकरांनी लिहिलेले विविध कवींवरील लेख उल्लेखनीय असल्याचे सांगत त्यांनी गोदातटीचा गुंजारव नि बालकवींची मधुगीते संपादून मराठीची चांगली वाङ्मय सेवा केली असल्याचा निर्वाळा देतात.
तर रा. श्री. जोगांना कवीचा सतीचा शाप आणि तारागड या दोन खंडकाव्याचा उल्लेख मराठीतील ऐतिहासिक खंडकाव्यात करणे महत्वाचे वाटते. उपरोक्त सतीचा शाप महाराणी पद्मीनीवर आहे.
कवीचे साहित्य विपुल असून त्यात मालतीमाधव, सोनपत पानपत, काव्यानंद मंजुषा, आर्यतेज, देवाची दंडेली असे विविधांगी साहित्य आहे. यातील बहुतेक मराठी साहित्य संघाच्या ग्रंथालयात उपलब्ध असल्याचे दिसते.
प्रस्तुत लेखकाला कवीचे मानारचे आखात हा लघुकथासंग्रह नि महात्मा गांधी साधू की सैतान हे पुस्तक पाहायला मिळाले. त्यातही कवीने काही कविता लिहिल्या आहेत.
कवी अवाजवी आत्मस्तुती व प्रसिद्धीप्रिय होता. मानारचे आखात या सामान्य वकुबाच्या कथासंग्रहावर कवीने तीन-तीन जणांकडून प्रस्तावनारुपी स्तुतिसुमने उधळून घेतली होती.
तर गोदातटीचा गुंजारव या त्याने प्रकाशित केलेल्या संग्रहात स्वतःचा, स्वतःच्या पत्नीचा, मुलीचा नि तान्ह्या मुलाचा फोटो प्रकाशित करण्याची कवीची वृत्ती त्याच्या प्रसिद्धीप्रियतेकडेच निर्देश करते.
वाङ्मय या कवीच्या नियतकालीकात मोठ-मोठ्या महापुरुषांसोबतच कवी स्वतःची सुवचने उध्दृत करत असल्याची बाब नोंदवत, त्या नियतकालीकात ‘रंगूनहून अमकेतमके निफाडकरांच्या कथेसंबंधी काय म्हणतात’ याचा भरणा असायचा, असे सांगत कुसुमाग्रज निफाडकरांत आत्मगौरव ज्यादाच होता ही बाब नोंदवतात.
तर आचार्य अत्रे कवीवरील मृत्युलेखात निफाडकरांना कालिदास, भवभूती, शेक्सपिअरसारखे कवी खिजगणतीत वाटत होते, असे सांगत ‘आपण कोणीतरी एक अलौकिक पुरुष या हिंदुस्थानात जन्माला आलेले आहोत आणि आपण बोलू ते उपनिषद नि लिहू तो वेद’ असा भ्रम होता, असा उल्लेख करतात.
साधारणपणे असा भ्रम एकतर मानसिक व्यक्तीत्व विकृतीत किंवा मॅनिया किंवा मूड डिसॉर्डर या मनोविकारात होतो. तो त्यांना होता की काय अशी शंका सहजच बळावते. कारण कवीचा मृत्यू १९४९ चा आणि त्यापूर्वी तीनच वर्षे आधी कवीने महात्मा गांधी साधू की सैतान हे पुस्तक प्रकाशित केले होते.
या मधल्या काळात सोपानदेव चौधरींना कवी मुंबईत भीक मागताना दिसला होता, असा उल्लेख अत्र्यांच्या लेखात मिळतो. केवळ तीन वर्षांत कोणतेही व्यसन नसताना होणारी ही गत त्याच विकृतीकडे निर्देश करत नसावी ना? काहीही असो ! कवी मात्र अत्यंत हालअपेष्टात वारल्याची नोंद आचार्य अत्रे व कुसुमाग्रजांनी केलेली आहे.
ती अंतःकरणाला पीळ पाडून जाते. गोदातटीचा गुंजारव हा ग्रंथ कवीने दा. ग. पाध्ये, पां. गं. लिमये व बाबासाहेब वाड या तीन संपादकांसोबत मिळून प्रकाशला. त्यात नाशिक परिसरातील ३६ कवींच्या १३८ कविता आहेत.
या कवींत सोपानदेव चौधरी, ग. ल. ठोकळ असे दोन सन्मान्य अपवाद वगळता नावाजलेले कवी कोणीही नाहीत. ग्रंथ १३ भागात विभागलेला असून त्यात ईश्वर, कवी-काव्य, प्रेम शृंगार, विविध इ. भाग आहेत. प्रस्तुत ग्रंथात कवीच्या १८ रचना असून त्या ९ वेगवेगळ्या विभागातील आहेत. शिवाय कवीच्या पत्नीची एक कविता देखील समाविष्ट आहे.
‘देवा, एवढें तरी दे !’ या कवितेत कवी,
मोक्ष बीक्ष नलगे कांही; वल्गना नको त्या ! ।
मोक्ष दूर कुठला कोठे! माझी ना तपस्या !! ।।
कवीला मोक्षाची अपेक्षा नाही, आपली तेवढी तपस्या नाही, याची जाणीव आहे. म्हणूनच तो खुल्या मनाने मान्य करतो की,
अजुन तृप्त झाला नाही नाथ भावनांनी ।
भावनांची तृप्ती कधीच होत नसते, भावनांच्या पार जावे लागते, भावातीत व्हावे लागते तीच मोक्षपदाकडे नेणारी पहिली पायरी असते तिला योगवसिष्ठकार मनोनाशही म्हणतात.
पण कवीमनाच्या नाथांचे कवित्व भावनांवरच होते. त्यामुळे आपल्याला मोक्षबिक्ष नको सांगत कवी अधुऱ्या स्वप्नांचे गीत गात एकच आस व्यक्त करतो, की
तिथे काव्यशास्त्रांमाजी चित्त मम रमो दे; ।
सृष्टि तूं नि चिंतन माझे, वृत्ति दे सुखाच्या ।।
गंमत अशी की चिरंजीव नि चिरपरीणामी काव्याचा जन्मच मूळी शोकात, व्यथेत होतो. पण येथे कवी काव्यशास्त्रात मन रमावे ही मागणी करताना सुखाची वृत्ती मागतो. सुख मागणे नि सुखाची वृत्ती मागणे दोहोत भेद असतो.
सुख हा परीणाम असतो. सुखाची वृत्ती हा स्वभाव असतो. स्वभाव हा स्वतःत रत असतो. नि स्वतःची व्याप्ति ही मी पासून सुरु होऊन सृष्टिमार्गे ईशतत्वात विलीन पावते.
तेच तर कवी इथे मागताना सापडतो. आपली कविता कशी असावी याची कल्पना करताना ‘अद्भूततेचा वीट आल्यानंतर’ कवीतेत कवी स्वतःला उद्देशून म्हणतो,
आता ये जगतात या, प्रिय कवे, नक्षत्रमालांतुनी ।
गावोनी मज तृप्ति दे सुकविता साधी सुधी मानुषी ।।
खरोखर कवीची कविता साधीसुधी असून मानुषी आहे. त्यामुळेच तिला अस्पृश्य म्हणत माणसाने माणसाचा चालविलेली अवहेलना सहन होत नाही. अस्पृश्याची कालवाकालव या कवितेत तो एका निर्धन नि गलितगात्र वृद्ध मांगाचा विलाप चितारतो.
कवितेच्या पहिल्याच पंक्तीत त्याला होणाऱ्या यातना शारीरिक नाहीत तर मानसिकच अधिक असल्याचे सांगत तुझ्या पायी येण्याचे भाग्य माझ्या नशिबात नाही, सांगताना तीव्र व्यथेने तो म्हणतो,
विधर्मी धर्मपाखंडी तुलाही खंडिती शस्त्रे;।
मला पाया मरायाही तुझ्या त्या वाव ना कोठे !-।।
या पंक्ती सुजाण वाचकाच्या मनाला टोचणी लावून जातात. सोबतच विचार करायला भाग पाडतात तर विधवा मातेचे शेवटचें गाऱ्हाणे या गद्य शीर्षक असलेल्या कवितेत एक विधवा माता होते.
तिला घडलेली घटना पाप म्हणून जाचत असते. नि जन्मलेली तान्ही मुलगी लळा लावीत असते. एकाच वेळी एकाच बाबीविषयीचा ‘हवे पण नि नको पण’चा हा संघर्ष चितारताना कवी कल्पकतेने लिहितो,
रडे कां, बालिके ! आले?- तुला मी एकदा घेते- ।
नको पण् ! एकदा घेता तुलाही पाप-पापी मी !
रसिका ! किती साध्या शब्दांत कवीने एकाच वेळी उठणाऱ्या बाळाविषयीच्या मायेच्या नि स्वतःविषयीच्या तिरस्काराच्या भावना टिपल्यात. शेवटी ती त्या बालिकेसह गोदेत जलसमाधी घेते.
ती गोदा ते पाप नि ते पुण्य सखेद होऊन स्वीकारते. त्या तिघीही याला कारण असणाऱ्या नराला शाप देतात. कवीची प्रतिभा नि कल्पना तत्कालीन काळाचा कोष भेदून बाहेर जात नाही हेच या शेवटावरुन सिद्ध होते.
कवीची एम् कडून एन् ला ही कविता पाहताना एम् एन् ला म्हणते, ‘तुम्ही माझ्यावर किती कृपाळू झालात. साधारणतः स्त्रीच्या तनूची आस सगळेच पुरुष धरतात. पण तू माझ्या मनाची प्रीत ओळखलीस’ म्हणत ती त्याचे मन अगम्य असल्याचे म्हणत, ‘माझा देह कवडी मोल असून मन कस्तुरीचे असल्याची जाण तू मला दिलीस’ हे वर्णन करताना कवी लिहितो,
मम कस्तुरी मनाची मज तूच दावियेली; ।
रमणा तुवांच गीती हृदयांत खेळवीली ।।
खरी प्रीत ही मनःसापेक्ष असते, देहसापेक्ष नाही, हेच कवी येथे खुबीने सांगतो. कस्तुरीची जाणीव ज्याच्याजवळ ती असते त्याला होत नसते तर दुसऱ्याला होत असते, याचे उत्तम उदाहरण आपल्याला कबीराच्या कस्तुरी कुंडल बसै । मृग ढुंढे बनमाही ।। या दोह्यात सापडते.
हरिणाच्या नाभीतील कस्तुरीच्या गंधाने हुरळून तिला शोधण्यासाठी हरिण स्वतःच इतस्ततः रानात भटकत असते. स्वतःजवळच ती आहे याची जाणीव त्याला येत नाही. इथे ‘मनाची कस्तुरी’ म्हणजे व्यक्तिमनात दडलेल्या चांगुलपणाची व चांगल्या गुणांची जाणीव करुन देणे होय.
तीच एन ने दिल्याने एम त्याच्यावर खूष आहे. मजा ही असते की एकदा प्रेम सुरु झाले, की सगळे चांगलेपणाचे गुण आपल्या प्रियकर वा प्रेयसीतच दिसायला लागतात. त्यामुळेच ती म्हणते,
इथुनी तिथोनि सारा जगतात तोच वारा, ।
पण तो तुझाच पावा मज नाचुं लावणारा ।।
असे असल्यानेच तिला वाटते
तव मूक भाषणेंही मज गीत गाववीती ।
मूक भाषण म्हणजे शब्दातीत भावनांची आंदोलने होत. ही देहातून आपोआप प्रकट होतात. ही पूर्णतः व्यक्तीनिष्ठ स्वरुपाची असतात. ती बहुधा प्रीतीतच प्रत्ययास येतात.
मग ती प्रीति व्यक्तीव्यक्तीतील असो वा भक्त देवातील ! ती प्रत्ययास येताच मन गीत गावू लागते ते शाब्दीक असण्याची शक्यता जास्त असते. नव्हे नव्हे; ते शाब्दिक होते, तेव्हाच त्याची ओळख जगास होते.
हे सारे घडत असतानाही एम् ला एन् काही लाभत नाही, ही सलणारी व्यथा व्यक्तविताना ती गाते,
पण एकदाही देवा मज लाधलास नाही; ।
जरि एम् नि ‘’एन्’’ मधे तो नसतो दुजा कुणीही ! ।।
शेवटची पंक्ती मनाला व्यथित करणारी असून बुद्धिला कवि-कल्पनाविलासाने आल्हादीत करणारी आहे. एम नि एन मध्ये इंग्रजी वर्णाक्षरांत कोणीच नसतो.
पण वास्तविक जीवनात कोणीही कोणाही मधी असतो, याची विलक्षण जाण देणारी ही पंक्ती आहे. तिच्या या व्यथेवर एन् तिला सांगू लागतो,
तुजसी कधी कृपाळू सखये, मूळी न झालो; ।
उलटा तुझ्या दयेने बघ शांत मीच झालो ।।
मी तुझ्यावर कधीच कृपा केली नाही. उलट तुझीच दया मला लाभली तू माझ्यावर नि मी तुझ्यावर अनुरक्त होतो. त्यामुळेच तुझा नि माझा देहाभाव गळून पडला खरे सांगायचे तर
तव कस्तुरी मनाची मज तूंच अर्पियेली; ।
रमणी तुवाच गीती मम कंठी खेळवीली ।।
‘मी तुला तुझ्या मनातील कस्तुरी दाखविली नाही तर तू स्वतः होऊन ती मला अर्पण केलीस. तेंव्हापासून तुझेच नाव गीत बनून पुनःपुन्हा माझ्या मनामनात खेळते आहे.
गगनात जे तेज दिसते ते पण तुझेच आहे. इथून तिथून सारी गति तूच चालवितेस तुझ्या मनाचा थांग लागत नाही’ अशी कबुली देत एन् सांगतो,
पण एकदाही देवी ! मज लाधलीस नाही; ।
मग ‘’एन्’’ अणीक ‘’एम्’’ ही तुज वेगळी सदाही ? ।।
‘ तू मला एकदाही लाभली नाहीस. त्यामुळे एन नि एम ही दोघे परस्परांजवळ असून, दोघांमध्ये कोणीही नसून सदा एकमेकांपासून भिन्नच आहेत’ पुन्हा एकदा एन नि एम या इंग्रजी मूळाक्षरांचा उल्लेख करताना कवी जवळ असले, तरी दोघांची गति नि प्रकृति भिन्न असल्याचे सांगत अर्थपूर्ण चमत्कृति साधत एम ला उत्तर देतो.
मात्र तो ‘सदाही’च्या पुढे प्रश्नार्थक चिन्ह टाकतो. कारण कुठेतरी त्याच्या मनात अजुनही ती लाभण्याची आस आहे. या कवितेतील एन म्हणजे नाथ होय तर एम कोण? हा प्रश्न शिल्लक राहतो. कवीच्या पत्नीचे नाव इंदिरा म्हणजे आय पासून आहे.
तिचे माहेरचे असते वा कदाचित पहिल्या पत्नीचे एम पासून असते तर त्याने प्रश्नार्थक चिन्ह वापरले नसते. म्हणजे एम गुलदस्त्यात राहते. अर्थात ही कहाणी निव्वळ कविकल्पना की वास्तविकता समजायला मार्ग नाही.
कवीच्या कवितांचा विचार करता त्यात कुठे कुठे चमक दिसत असली, तरी काळाच्या कसोटीवर टिकण्याच्या बाबतीत तकलादू वाटतात.
शेवटी असे म्हणावेसे वाटते की बेताच्या प्रतिभेवर नि जेमतेम व्यासंगावर आत्मगौरव नि चिरप्रसिद्धीची आस बाळगणारा हा कवी थोड्याच काळात अप्रसिद्धीच्या काळोखात फेकल्या गेला.
(लेखक हे प्रख्यात मनोचिकित्सक आहेत)