लेखांक शंभरावा: ' लीले!' विकल अन विफल विलाप!

Jaykrishna Upadhye
Jaykrishna Upadhyeesakal

जयकृष्ण केशव उपाख्य बुवा उपाध्ये (१८८३ -१९३७) नागपूरचे. त्यांची आई ते दीड वर्षांचे असतानाच वारली. त्यांचा सांभाळ सुरवातीस आईच्या वडीलांनी व नंतर वडीलांच्या वडीलांनी केला. लहानपणी प्रेम-माया त्यांनी कधी अनुभवलीच नाही.

ओढ लागावी असे संसारात काही नव्हतेच. त्यामुळे ते अगदी तरुण वयात हनुमानगढावर जाऊन श्रीधरपंत परांजपेंकडून अनुग्रह घेत व्रतस्थ  झाले. पण श्रीधरपंतांचे दुटप्पी जिणे पाहून पुन्हा संसारात परतले.

परतल्यावर मनोरमाबाईंशी त्यांनी विवाह केला. त्यांना लीला नावाची एक गोड मुलगी ही झाली. एकाकीपणा सरून संसाराची ओढ लागते न लागते तोच त्यांची पत्नी नि मुलगी दोघीही वारल्या. पुन्हा एकाकीपणा त्यांच्या नशीबी आला.

या अशा वाताहतीतही त्यांचा जनसंपर्क व मित्रपरिवार कधी सुटला नाही. त्यामुळे एकटे राहण्याऐवजी कधी या तर कधी त्या मित्राकडे ते रहात. १९३७ साली तात्या वझलकर या मित्राच्या घरी त्यांचे निधन झाले. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet jaykrushna upadhye nashik news)

Jaykrishna Upadhye
जटायूसाठी आशेचा किरण

मृत्यूपूर्वी काही दिवस आधी 'संपवू आता खेळ' कवी म्हणतो,

संपवू आता खेळ, जाहली परतायची वेळ
संपवू आता खेळ, दिव्याचे संपत आले तेल

खरेच कवीचे जिणे दिव्याचे जळत जळत एकाकी संपणेच होते.

१९०६च्या आसपास कवीने क्रांतिवीर पांडुरंग सदाशिव खानखोजे व काही मित्रांसह समर्थ शिवराय समाज नावाची संघटना उभारली. ती फारशी टिकली नाही. मात्र कवीच्या मनातील स्वातंत्र्य व क्रांतीची उर्मी काही संपली नाही.

कवी संपादक असलेल्या वागीश्वरीत स्वातंत्र्याची उर्मी जागवणाऱ्या अनेक लेख नि कवितांना कवीने स्थान दिले. रसिका ! तुला स्मरत असेल, तर याच सदरात पाहिलेली वकीलांची संजीवन ही गुमनाम हुतात्म्यावरील कविता प्रकाशित करण्याचे धाडस उपाध्येंच्या वागीश्वरीनेच केले होते.

मराठी भाषेवर कवीचे अतोनात प्रेम आहे. तिची थोरवी वर्णन करताना कवी मराठीची अनेकविध रूपे खुबीने चितारतो,

मराठी चंद्रभागेच्या तटाकी भासते भोळी |
परी स्वातंत्र्यसंग्रामी जशी ती कर्कशाकाली ||

मराठीची ही दोन्ही रुपे कवीने अचूक ओळखली. म्हणूनच तिच्या पताकांच्या तलवारी आणि टाळाच्या ढाला होताना त्याला दिसतात. कवीची मराठी जयशाली आहे, म्हणूनच तो गर्जना करतो,

मराठीचा जनी जय हो, मराठीचा वनी जय हो,
मराठीचा रणी जय हो, करा गर्जून जयकारा

कवीच्या या पंक्ती मराठी रसिकात अभिमनाची भावना जागवून जातात.

कवीला लोकमान्य टिळक नि छत्रपती शिवराय हे दोघे आदर्शभूत वाटत. लोकमान्यांच्या देहावसानानंतर कवीने त्यांच्यावर द्विखंडात्मक काव्यमय चरित्र लिहिले. यातील पहिल्या खंडात सुमारे ९४७ श्लोक असून १३ अध्याय आहेत. यात लोकमान्यांचा गुणगौरव करताना कवी उच्चरवाने गर्जतो,

जय जय अज्ञानतम विध्वंसका । जय जय राष्ट्रबुध्दिविधायका
जय जय देशदैन्यविदारका । लोकनायका लोकमान्या

कवीच्या ओघवत्या नि वक्तृत्वपूर्ण शैलीचे गुणवर्णन करावे तेवढे थोडेच आहे.

Jaykrishna Upadhye
एका अन्यायाची गोष्ट

लोकमान्यांच्या अस्तानंतर आरंभलेले हिंदुत्व दुत्काराचे राजकारण कवीला विषण्ण करते. त्यातूनच त्याच्या अनेक कविता जन्मतात.

त्यातील हिंदू संघटन व तो हिंदू कशाचा? या कविता उल्लेखनीय आहेत. लोकमान्योत्तर राजकारणाची उडालेली धूळधाण नि साधनशुचितेचा टेंभा मिरविणारे राजकारण पाहून कवीने गरुडपुराण नावाचे दीर्घकाव्य लिहिले. हे मराठीतील बहुधा पहिलेच राजकीय दीर्घ काव्य असावे. त्यात कवी लिहितो, ‘स्वराज्यासाठी राजकारण कशास हवे इंग्रजी व्हॉईसराय स्वतःच धावतपळत येईल, अन् म्हणेल,

आम्ही जातो अमुच्या गावा । अमुचा रामराम घ्यावा ।
ऐसे म्हणत स्वराज्य ठेवा । परत करीन आपणाशी

जेंव्हा अशी वेळ येईल, तेंव्हा सुध्दा तत्कालीन नेते ते स्वराज्य न स्वीकारता इंग्रजी व्हॉईसरॉयला विनवतील, ’जाऊ नका ! भावाभावासारखे इथेच रहा । तुमचे राज्य ते आमचेच आहे.‘ आपल्याला जरी यात केवळ वक्तोत्रीपूर्ण उपहास दिसत असला, तरी तो राष्ट्रभक्त मनाच्या कवीला डाचत होता.

नवकाव्य आणि अहंमन्य कवींच्या उपहासातून कवीचे 'कविते करीन तुला ठार !' व 'मीच एक शाहिर' अशा अनेक विडंबनात्मक कविता जन्मतात. कवीची चालचलाऊ गीता उपहासाचे उत्तम उदाहरण ठरावी. यातील अर्जुन युद्धाला नकार देत घरी चलण्याचे आवाहन करतो. तेंव्हा उपाध्येचा कृष्ण अस्सल वऱ्हाडीत उत्तरतो,

कृष्ण म्हणे रे अर्जुना ! । हा कोठला बे बायलेपणा ?
पहिल्याने तर टणटणा । उडत होतास लढाया
मारे रथावरी बैसला । शंखध्वनि काय केला ।
मग आताच कोठे गेला । जोर तुझा मघाचा ?
तू बेट्या । मूळचाच ढिला । पूर्वीपासून जाणतो तुला;
परि आता तुझ्या बापाला । सोडणार नाही बच्चमजी !
अहाहारे ! भागूबाई । म्हणे मी लढणार नाही ।
बांगड्या भरा की रडूबाई । आणि बसा दळत ।।

वऱ्हाडी बोलीचा कवीने केलेला कसदार उपयोग कवितेत जोमदार वक्तृत्वाच्या नमुना सादर करतो. ही गीता गीतेवरील उपहास नसून तत्कालीन नेते व जनतेच्या षंढ मनोवृत्तीवरील व्यंग आहे.

त्यामुळेच प्रकांडपंडित ज्ञानकोशकार डाॅ. श्रीधर व्यंकटेश केतकर व उपहास नि विडंबनाचे सम्राट असणाऱ्या आचार्य अत्र्यांनी या चालचलावू गीतेची मुक्तकंठाने स्तुती केलेली आहे.

कवीने उमर खय्यामच्या रुबायांचे मराठी रुपांतर केलेले असून ते माधव ज्युलियनांनी केलेल्या रुपांतरापेक्षाही सरस आहे. असा विद्याधर गोखल्यांचा यथोचित दावा आहे. शिवाय कवीने गीत राघवातून श्रीरामाचे काव्यमय चरित्र वर्णन केलेले आहे.

आज आपण कवीची ‘लीले !’ ही मुलीवर केलेली कविता बघणार आहोत. कवीची पत्नी मनोरमा भर तारुण्यात वारली. पत्नी निधनानंतर आपले दुःख व्यक्तविताना ते लिहितात,

एकपणे विचरलो विहरलो परिहसलो धुसफुसलो
प्रेमसंगमी स्वैर पोहलो परस्परी समरसलो
परि ते अंतर्धान पावले स्वप्नापरि सुख ठरले
आता त्या स्मरणातच केवळ सौख्य मानणे उरले

रसिका ! या विदारक पंक्तीतील ‘स्वप्नापरि सुख ठरले’ शब्द काळजाला घर करुन जातात. या दुःखात सुख होते, पत्नी गेली तरी लहानगी लीला सोबत आहे. पण ते ही सुख कविच्या नशीबी नव्हते.

पत्नीच्या मृत्यूनंतर  काही काळातच चिमुकली लीलाही वारली. कवी पुन्हा एकाकी पडला. पण हा एकाकीपणा सुखानंतर एकाकीपणा होता. क्षणिक सुखानंतर कायमचा आलेला एकाकीपणा शल्यासम बोचणारा असतो.

त्या आघातात मी मी म्हणणारे कोलमड़ून पडतात. मोजकेच तग धरतात अन् विरळाच एखादा सर्जनात्मक काम करतो. कवी त्यातील एक आहे.

Jaykrishna Upadhye
अमृतमहोत्सवी मराठा मंदिर

कवीच्या नशीबी पत्नीच्या चिरविरहाचे नि कन्या निधनाचे अखंड दुःख साठवलेले होते. विशेषतः कन्येचे दुःख कवीला खूप जाळू लागले. दोनेक कवितांतून ते उफाळून वर येताना दिसते.

‘भग्न हृदयातील करुणोद्गार ! ’ कवितेत कवी सांगतो, ‘आसपास बागडणाऱ्या छोट्या-छोट्या निरागस बालक- बालिका पाहिल्या की मनाला हर्ष होतो. पण त्यात "माझी लिला नाही' हे लक्षात आले की विरस होतो.'  हे काव्यात कथन करताना कवि हताशपणे पुसतो,

‘द्याया दुःखची काय सौख्य दिसते काही कळेना खरे !’

खरेच कवीची ही भावना किती वास्तव, बोलकी नि तितकीच हृदय पिळवटून टाकणारी आहे.
तो काळाला विचारु लागतो, ‘जगांत रुप, रस, गंध नसलेली, गळायला आलेली, ज्यांचा जगास काहीही उपयोग नाही, अशी कितीतरी फुले आहेत. ती सारी सोडून तू माझीच कळी का खुडलीस?’

तोडाव्या कलिकाच मुग्ध अथवा पुष्पें गुणी साजिरी
काला ! काय असे कठोर हृदया ! तूते रुचे नाकळे ?*

आणि याच हताशतेत स्वतःलाच समजावू लागतो की,

होती सर्वची सुंदर प्रिय जगी मालिन्य कोणा रुचे
तेंव्हा दोष वृथा तुलाच असला द्यावा कशाला गड्या

जगात सर्वांनाच सुंदर नि गोजिऱ्या गोष्टी प्रिय असतात. मग मृत्युलाच कशाला उगाच दोष द्यावा. या कविच्या उक्तीतील आर्तता नि आर्ततेतील विकल समाधान सहृदय वाचकालाच समजेल.

यानंतर सुमारे नऊ वर्षांनी लिहिलेल्या ‘लीले !’ हे संबोधनार्थी शीर्षक असलेल्या कवितेत कवी लिहितो,’ ‘पापा पापा’ म्हणत तू जवळ यायचीस. तुझ्या चिमुकल्या ओठांनी चुंबायचीस, गाणे म्हण म्हणताच हात हालवित, नखरे करीत गोड गायचीस, बाहुलीची आई होत तुझी ममता दाखवायचीस.

मी तुला मंदिरात न्यायचो तेंव्हा न सांगता माथा टेकवायचीस. रोज सकाळी उठून अंगणात येणाऱ्या चिमण्यांसंगे खेळायचीस. त्या दाणे टिपून जायच्या अन् तू हसत हसत खिदळायचीस, आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी स्बतःशीच उद्गारतो;

येति चिमण्या आताही त्या तशाच
धान्य टिपुनी नाचती खेळतीच
परी लीले ! हासरी तू न तेथे
सौख्य पूर्वीचे स्मरुनि दुःख होते

'चिमण्या तशाच आहेत. पण माझी लीला तेथे नाही.' हा कवीच्या मनातील रिक्तभाव वरील पंक्तीत किती अलगद उतरला आहे. नकळत त्याला आठवते, 'तिने जसे हसून सुख दिले तसे रडूनही सुखच दिले.

'लहानमुलांचे हसणे जसे सौख्यदायी असते, तसेच विनाकारण रडणेही मजेदार नि सुखदायी असते. कवीने हा पितृभाव अचूक ओळखला आहे, असे रसिकाला जाणवते न जाणवते तोच -

हसणे रडणे सारेच सौख्य गेले
झरा सुकला पाणीही सवे नेले

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jaykrishna Upadhye
आपला अमूल्य वारसा

कवीच्या या हताश ओळी सहृदय मनात कालवाकालव करुन जातात. त्याच तंद्रित कवी

अशनि पानी वाचनी विचारीही
काहि लीलेवाचुनी सुचत नाही

अशी कबुली देत, स्वतःच्या वाट्याला आलेले कायमचे दुःख अधोरेखित करतो. मनाशीच तो पुटपुटतो ‘संतानाच्या मृत्यूची केवळ कल्पनाच मनाला अशुभ वाटते, अन् ती चुकून जरी मनांत आली तरी हृदयाला जाच लावते. पण तीच गोष्ट माझ्या नशीबी आली.’ आणि त्याच विराण व्यथेत स्वतःची दशा सांगताना लिहितो -

दुःखदाहे देहास आग लागे
हृदय उकळे करपूनि चित्त भागे
वेदना त्या एकांति अश्रुपाते
शांतवीतो परि दुःख शमेना ते
  

कवीचे हे म्हणणे किती खरे आहे. अशा वेदनेत होरपळणाऱ्या मायबापाच्या देहाची नुसती आग आग होते, हृदय अक्षरशः करपून जाते. एकांत मिळताच अश्रूंचा वर्षाव सुरु होतो. कितीही समजावले, बोध केला तरी दुःख शमता शमत नाही. कारण समजावणे बुद्धि पुरते असते. अशा भावनांना जाण नसते, फक्त बोचऱ्या वेदनेच्या जाणीवा असतात. कवीला आठवते दुसऱ्यांच्या दुःखात आपण मोठा विवेकी बोध केला. पण स्वतःची वेळ येताच तो विफल ठरला. त्याही अवस्थेत कवी याचे नेमके कारण सांगून जातो.

बोध करिताना नव्हती आग पोटी
आग पोटी ते जिरे बोध ओठी

खरंय । दुसऱ्याचे दुःख कणभर तर स्वतःचे मणभर वाटते. इथेतर मूळात कवीचे दुःखच मणभर आहे. तिऱ्हाईत माणसाला सुध्दा चटका लावून जाणारे आहे. त्यात कवीचे एकाकी जिणे आणखीनच पीडा देणारे आहे. त्यामुळेच तो लिहितो,

हृदय माझे हे करुनि चूरचूर
नेशि माझा बुलबूल कुठे दूर?
क्रूरकर्म्या निष्ठुरा दुष्ट दैवा !
कुण्यां जन्मीचा साधलास दावा

पहिल्या दोन पंक्ती हृदयाचे पाणी पाणी करणाऱ्या आहेत. आपल्या चित्तातील विकलता नि विफलता वाचकांपर्यत पोहोचविण्यात कवी कमालीचा सफल झाला आहे. दुसऱ्या दोन पंक्ती त्याचे तीळतीळ तुटणारे अंतःकरण तीव्रतेने चितारुन जातात.

नीट पाहिले दुसऱ्या पंक्तीअंती प्रश्नार्थक चिन्ह आहे. त्यामागे दोन कारणं आहेत. मृत्यू व मृत्यूनंतरचे जीवन याविषयी माणसाचे असलेले अज्ञान हे एक नि दुसरे मृत्यूने दूर नेलेला बुलबुल अर्थात लीला कवीच्या मनातच कायमची घर करुन बसली आहे.

त्याच्या चित्तातून गेलीच नाही. त्यामुळे प्रश्न आहे. तर चौथ्या पंक्तीत प्रश्नार्थक चिन्हच नाही. कारण क्रूर दैवाने साधलेला दावा कवी स्वतः जन्मापासून अनुभवतोय. दीड वर्षांचा असताना आईचे जाणे, तरुणपणात बायकोचे जाणे नि लहान मुलीचे जाणे.

तीन-तीन दुःख एकाच जन्मात भोगणाऱ्याला ते दैव क्रूरकर्मा, निष्ठूर नि दुष्ट वाटावे, यात प्रश्न कुठून येणार? दैवाने साधलेला दावा जगन्मान्यच आहे. कवीच्या कोमल हृदयाला ते विशेषत्वाने वाटते. म्हणूनच त्या दैवाला कळवळून तो विचारतो,

सर्व माझे लागले तुझ्या हाता
समाधानाचा एक तंतु होता
तोहि बरवा वाटला तुला नाही
खुडूनी केल्या मज शून्य दिशा दाही

यातील खिन्नता ‘शून्य दिशा दाही’ या शब्दांनी अधिकच गडद झालेली आहे. 'जगात सर्वकाही पुन्हा मिळते, पण 'लीला' परत मिळणार नाहीचे' हे दुःख व्यक्तविताना कवी

परी आता भेटेल कुठुनी लीला

तंतु तुटला तो पूर्ण तुटुनी गेला !

या पंक्तींनी कविता संपवितो. तेंव्हा वाचक सुन्न होऊन जातो. कविता मूलतः आत्मानुभवपर, त्यातही भयंकर दुःखाला नाजूक हाताने नि हळव्या भावाने कवी हाताळत असल्याने ती सरस उतरलेली आहे.

जाता जाता हे ही सांगणे गरजेचे आहे की, कवितेचे शीर्षक संबोधनार्थी असल्याने लीला जिवंत झाली नि रसिकाला पूर्ण काव्यात फिरताना दिसते. जर ते संबोधनार्थक नसते तर एवढी उजवी वाटली नसती.

कवितेसाठी कवीने योजलेली दिंडी वृत्ताची रचना, काव्याचा भाव तंतोतंत व्यक्तविण्यास समर्थ ठरली. शिवाय कवीची अंतर्गामी चिंतनशीलता कवीला आगळीच उंची देऊन जाते.

कवीच्या काव्यात सहजता आहे, प्रासादिकता आहे, उत्तम नि अस्सल वक्तृत्व आहे. शिवाय अभावाने आढळणारे उपहास, व्यंग अन् विडंबन इ गुण देखील आहेत. तरी तो विस्मृतीत कसा काय गेला? हे कोडेच आहे. ते तोडण्याचा हा तुटका फुटका प्रयत्न.

(लेखक प्रख्यात मनोविकार तज्ज्ञ असून दशग्रंथी सावरकर या पीएच.डी समतुल्य पुरस्काराने सन्मानीत आहेत.)

Jaykrishna Upadhye
उपेक्षितांचा चरित्रकार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com