कोंबडा! साध्या विषयातील मोठा आशय!

Marathi Poet Datta Prasanna Karkhanis
Marathi Poet Datta Prasanna Karkhanisesakal
Updated on

कवी दत्तप्रसन्न कारखानीस (१९०८-१९८६) मूळचे चाळीसगावचे होते. कवीची काव्यप्रतिभा आरंभीच्या काळातच बहरलेली दिसते. तिशी पस्तीशीतच कवीचे ‘क्षितिजावर’ नि ‘काव्यविलास’ हे दोन्ही काव्यसंग्रह प्रकाशित झालेले दिसतात. त्यानंतर कवीचे उल्लेखनीय असे कोणतेच वाङ्‍मयीन कार्य सापडत नाही. कवीचा पहिला काव्यसंग्रह क्षितिजावर, त्याच्या अगदी तरुण वयात १९३५ मध्ये प्रकाशित झाला होता. त्याला आचार्य अत्रेंची प्रस्तावना होती. पहिलेवहिले पुस्तक प्रकाशित होताना कवी असो वा लेखक मन साशंक असते, त्याचेच प्रतिबिंब कवीच्या

साशंक चित्त बावरें भरें कापरें।

क्षितिजावर यायाला कां संकोच वाटतो बरें?

(Saptarang Latest Marathi Article by dr neeraj deo on marathi poetry of poet dattaprasanna karkhanis nashik news)

Marathi Poet Datta Prasanna Karkhanis
देवकीच्या आवाजाची ‘आभाळमाया’

या काव्यपंक्तीत पाहायला मिळतो. या काव्यसंग्रहात कवीच्या ५३ कविता असून, त्या पाहता कवीच्या कल्पना तत्कालीन रूढ कल्पनांहून बऱ्याच वेगळ्या नि विलक्षण सापडतात. रस्त्याने चाललेला युवतींचा थवा बघून कवीला वाटते,

बेदर्द गुलाबी फौज
चालली कुठें ही आज? -- नच कळे !

या गुलाबी फौजेला पाहून त्याला त्यांच्या बेदर्दपणाची याद येते, पण ती फौजच्या फौज जरी बेदर्द असली तरी कवी बेदर्द नाही तो नाजूक, हळूवार मनाचा नि संवेदनशील आहे, त्यामुळेच ईश्वराला प्रार्थितो,

ईश्वरा! दया करि जरा-करी लव त्वरा-

फौज सांभाळ- नीट सांभाळ
नच जडो दृष्टि चांडाळ!- ती वरी

त्या बेदर्द तरीही दिलकश फौजेवर कुणाही चांडाळाची दृष्टीही पडू नये, अशीच त्याची इच्छा आहे.

Marathi Poet Datta Prasanna Karkhanis
वैद्यकीय गोपनीयता

दुसऱ्या एका कवितेत पिंजऱ्यातून बाहेर पडण्यास कासावीस झालेल्या पोपटास तो पिंजऱ्यात राहण्याचे फायदे गणत सांगतो, की बाहेर कितीतरी लोकांना खायला अन्न मिळत नाही, राहायला घर मिळत नाही, तुला येथे सारेकाही मिळते, मग बाहेर पडायची एवढी आस का? केवळ स्वातंत्र्यासाठी? पण तुला ठाऊक आहे का, बाहेर पडल्यावर तुला कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागेल ते?

गिरीगव्हरिं हिण्डता व्याध- शर अवचित बसतां उरीं
स्वातंत्र्याच्या तरल कल्पना विरतिल वाऱ्यावरी!

कवीची ही कल्पना त्याकाळी अहर्निश वनवृत्तीच्या सुखाला स्मरणाऱ्या दुःखात झुरणाऱ्या पोपटाच्या चिरपरिचित कल्पनेला मूळातून छेदणाऱ्या होत्या. या कल्पनेत अन्नान्न दशेत खितपत पडलेल्यांविषयीची कणव होती नि स्वातंत्र्यापाठोपाठ येणाऱ्या सामर्थ्याच्या गरजेची जाणीव होती.
वय वाढते तसतशी झोप नि झोपेच्या समस्या जाणवू लागतात. झोप न येण्याने पोळलेले कविमन खिन्नपणे सांगू लागते, ‘नाही झोप सुखे अहो! हरपली ती ईश्वराची दया।’ पण दत्तप्रसन्नांचे कविमन झोपेला सांगते,

चिंताग्रस्त कितीक जीव असती या भव्य विश्वांतरी
दुर्दैवी तुजवीण कंठिती जिणे जीवन्मृताचे परी?
जा; जाऊनि तयांस भेटुनि करी त्यांचे सुखी जीवन;
निद्रे, लाभ कळे न काय तुजसीं माझ्यासवें राहून !

झोपेला माझ्यासोबत राहून तुझा काय फायदा, हे विचारणारी कवीची ही कल्पना विलक्षणच म्हणावी. अर्थात त्यामागे कवीचे तरुण वय हेही कारण असावे.

Marathi Poet Datta Prasanna Karkhanis
वन्यप्राण्यांचे हत्यासत्र?

कवीची अशीच एक वेगळी कल्पना म्हणजे ‘कोंबडा’ ही कविता होय. ती त्याकाळी अत्यंत लोकप्रिय होती. कवितेच्या आरंभीच कवी सांगतो, ‘कुणाला पिसारा फुलविणारा मोर आवडतो तर कुणाला मधुर गाणारी कोकिळा आवडते, तर कुणाला मिठू मिठू बोलणारा पोपट आवडतो, पण मला यातील कोंबडा जास्त आवडतो. पुढे तो सांगतो, ‘आपल्याला पिसाराऱ्याचे नि मधूर कंठाचे काय करायचे? नुसते खायला घातले तर बडबड करणाऱ्या नटव्या पोपटाशी काय करायचे’, नीट पाहिले तर येथे कवी पोपटाला पोटभरू, नटवा म्हणत निराळेच व्यंग करून जातो.

‘या सर्वांपेक्षा तो कोंबडा बघा किती ऐटदार, डौलदार आहे, त्याच्या माथ्यावर जास्वंदीच्या फुलासारखा छानदार तुरा शोभतो आहे, त्याचा पिसारा किती झोकदार आहे, तर चोंच चिमुकली असूनही बांकदार आहे’, असे कोंबड्याचे रसभरीत वर्णन करीत कवी सांगतो,

अर्ध पायीं पांढरीशी विजार
गमे विहगांतिल बडा फौजदार!

कोंबड्याच्या पायांत अर्धी विजार आहे ,असे कवीने केलेले वर्णन वाचताना कवीच्या निरीक्षण क्षमतेस नि काव्यविलासास दाद दिल्यावाचून रहावत नाही. तोच कवी कोंबड्यास पक्षातील पोलिसाची उपमा देत त्यावर कळस चढवितो.

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

Marathi Poet Datta Prasanna Karkhanis
बायोपिकच्या ‘मिस कास्टिंग’ची कथा

पोलिस म्हटला, की महत्त्वाची बाब आली जनजागृती नि लोककल्याण. तेच तर कोंबडा करत असतो, हे रसिकांच्या चित्तावर ठसविताना कवी गातो,

‘उठा मूर्खांनो ! झोंप काय घेतां?
अरुण उदयाचा काल असे आतां!
करा कांहीं तरि आळसा त्यजून,’’
उषःकाली सांगतो ओरडून !

जणू तो सांगतो, ‘मूर्खांनो! उठा आळसाला त्यागून कामाला लागा. कोणी काहीही म्हणो पण कोंबडा आपले कर्तव्य सोडत नाही. मोर, पोपट, कोकिळा, राजहंसादी पक्ष्यांचा पोकळ बडेजावच फार आहे, पण कोंबड्यासारखे जनहित दक्ष कोणीच नाही; पण अतिपरिचयामुळे बिचाऱ्याची अवहेलना होते, असे सांगत कवी पुन्हा एकदा तुम्हाला आवडो वा नावडो, मला मात्र कोंबडा फार आवडतो सांगत कविता संपवितो.

नीट पाहिले तर कोंबडा या अत्यंत सामान्य पक्ष्यावर लोक व्यंगच करताना आढळतात, पण कोंबडा हा पक्ष्यांतील पोलिस आहे असा कल्पनाविलास करीत सकाळी आरवणाऱ्या कोंबड्याची भावना अशी लोककल्याणाची आहे, असे कवी जेव्हा सांगतो तेव्हा साध्या विषयात गहन आशय शोधणाऱ्या त्याच्या लोकविलक्षण प्रतिभेचे दर्शन रसिकाला होते, जे खचितच मनाला भावत राहाते.

Marathi Poet Datta Prasanna Karkhanis
‘घाशीराम’ची रंगकिमया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com