Latest Marathi Article | घरी एकच पणती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

V S Khandekar

घरी एकच पणती!

प्रतिभासंपन्न साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या ‘घरी एकच पणती’ ही कविता प्रबोधनात्मक स्वरूपाची आहे. प्रबोधनात्मक कवितेतील आशय सहज स्पष्ट होणारा नि अत्यंत साध्या, सरळ भाषेत असावा, असा संकेत असतो. काव्यानंद हा त्यामागील हेतू नसून जागृती नि प्रबोधन साधणे, हा त्यामागील मुख्य हेतू असतो. त्यादृष्टीने पाहता प्रस्तुत कविता अत्यंत साचेबद्ध असून, अलंकारादी किचकट प्रकारापासून दूर आहे. विषयाची गरज ओळखून केलेली ही रचना साहित्यकाराची उंचीच दाखवते. सुधारणेच्या आरंभी माझ्याजवळ कसली साधने नाहीत, अशी कुरकूर करणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालून कृतीची दीक्षा देणारी ही कविता आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. (saptarang Latest Marathi Article by dr neeraj deo on marathi poetry of VS Khandekar nashik news)

हेही वाचा: दिन-ए-मर्द

वि. स. खांडेकर (१८९८ ते १९७६) या नावाने विख्यात झालेल्या साहित्यिकाचे मूळ नाव गणेश आत्माराम खांडेकर होते. १९११ मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांना त्यांचे चुलत चुलते सखाराम खांडेकरांना दत्तक देण्यात आले, तेव्हापासून त्यांचे नाव विष्णू सखाराम खांडेकर पडले. अगदी लहान वयातच त्यांनी काव्यलेखनाला आरंभ केला. त्याच काळात त्यांचा संपर्क राम गणेश गडकऱ्यांसारख्या महान साहित्यिकाशी आला. त्यांनी दिलेला केशवसुतांचा काव्यसंग्रह वाचल्यावर कवीला स्वतःची रचना हिणकस वाटू लागली, त्यामुळे ती त्यांनी जाळून टाकली. १९२० मध्ये पुणे सोडून ते सावंतवाडीसारख्या दुर्गम भागात पोचले.

त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील शिरोडा गावी शिक्षकाची नोकरी धरली. ही नोकरी म्हणजे नोकरी नसून प्रत्यक्ष शाळा उभारणे होते. त्यासाठी देणग्या गोळा करून येणाऱ्या १०० रुपये मासिक वेतनातून सुमारे रु. १,००० देणगी देऊन त्यांनी ती शाळा नावारूपास आणली. त्यामुळे मुख्याध्यापकपदाचे दायित्वही त्यांच्यावरच पडले. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वा. सावरकर, अच्युतराव कोल्हटकर, न. चि. केळकर अशा अनेक महापुरुषांना नि साहित्यिकांना आमंत्रित केले होते.

येथे हेही सांगणे अनुचित होणार नाही, की वि. स. खांडेकर लोकमान्य टिळकांच्या विचारांनी मनोमन भारलेले होते. देशभक्ती नि राष्ट्रीय बाणा त्यांच्या अंगी मुरला होता, त्यामुळेच ते पुण्याहून दूर खेड्यात जायला तयार झाले. शिरोड्यासारख्या भागात राहून त्यांनी चालविलेल्या वैनतेय या नियतकालिकावर त्यांनी रचलेला नि उद्धृत केलेला श्लोक

वसे दास्यी माता, नयनसलिली मग्न जनता ।
असे पंगु भ्राता, अहिकुलछले भीत जनता ।।
नसे साह्या कोणी, अमृत लपले स्वर्गभुवनी ।
हसे माता आणी, विहगपति शत्रूस बघुनी ।।

त्यांच्या राष्ट्रभक्त मानसिकतेचीच साक्ष देतो. यातील ‘वसे दास्यी’ मातेतून पारतंत्र्यात पडलेल्या भारतमातेचा तर ‘पंगू भ्राता नि अहिकुल छले भीत जनता’तून समाजातील भेदाभेदाचा बोध देत या दोन्हीतून स्वातंत्र्याची आस खांडेकर बाळगताना दिसतात. ते केवळ लिहूनच थांबत नाहीत, तर १९३० मध्ये झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात सहभागी होताना दिसतात.

हेही वाचा: चित्रपटांचा जनप्रभाव!

अध्यापनासोबतच त्यांचा वाग् यज्ञ अव्याहत चालूच होता. सुमारे १७ कादंबऱ्या, ४३ कथासंग्रह, ४ रुपक कथासंग्रह, १५ लघुनिबंध संग्रह, ११ लेखसंग्रह, ४ व्यक्तिचित्रणे, एका पानाची कहाणी हे आत्मचरित्र, एक नाटक असा मोठमोठ्या साहित्यिकांना हेवा वाटावा असा साहित्य संसार त्यांनी लिलया उभारला, तो केवळ संख्यात्मक नसून गुणात्मक होता. याशिवाय मराठी, हिंदी, तमीळ नि तेलुगू भाषेतील सुमारे २८ चित्रपटांसाठी पटकथा, संवाद नि गीते लिहिली.

त्यांच्या पहिल्या चित्रपटास गोहर सुवर्णपदक, तर शेवटच्या चित्रपटास भारत सरकार नि महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळाले होते. या साऱ्यांचे फळ म्हणून की काय, वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी त्यांना सोलापूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देण्यात आले. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यावर त्यांच्या ‘ययाति’स राज्य शासनाचा पुरस्कार देण्यात आला. १९६८ मध्ये पद्‍मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७४ मध्ये त्यास ज्ञानपीठ हा भारतीय भाषातील सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मराठी साहित्याला मिळालेला हा पहिलाच ज्ञानपीठ पुरस्कार होता.

कादंबरीकार म्हणून विख्यात असलेल्या या साहित्यिकाने थोडीथोडकी नव्हे, तर १३७ कविता लिहिल्या. त्यातील अनेक गीतांना मोठमोठ्या गायकांनी स्वरबद्ध केले आहे. या कवितातील ‘घरी एकच पणती’ ही कविता आपण पाहणार आहोत. प्रस्तुत कविता त्यांच्या १९३४ मध्ये प्रकाशित ‘उल्का’ या कादंबरीतील आहे. या कादंबरीत मला हे नाही, ते नाही म्हणून कुरकुरणारा मध्यमवर्ग नि दुसऱ्या बाजूस पोटासाठी दोन वेळेची भाकरी न मिळणारा कामगार वर्ग, अशा दोन धृवाचे दर्शन आहे. त्यातील कथानायक चंद्रकांत असून, त्याला त्याच्या कामगाराच्या लढ्यात साथ देण्यासाठी उतरणारी नायिका म्हणजे उल्का होय.

हेही वाचा: मुलं मोठी झाल्यानंतरची पोकळी...

या कथानकाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत कविता पाहिली तरच तिची समर्पकता ध्यानी येईल. कवितेच्या धृपदात कवी लिहितो,

घरिं एकच पणती मिणमिणती ।
म्हणुं नको उचल चल लगबग ती ।।

रसिका ! धृपदाची शेवटची ओळ कमालीची नादमय आहे धृपदात कवी सांगतो, की घरात असलेली ती मिणमिणती म्हणजे थोड्याही वाऱ्याने विझू शकणारी ती पणती तू लगबगीने उचल. कवी येथे पणतीला जागृतीचे प्रतीक मानतो. ती मिणमिणणारी वाटत असली तरी तिच्या ज्योतीत असलेली असीम ताकद तो ओळखतो. त्यामुळेच तो सांगतो, ‘तुझे अगणित बांधव अंधारात वास करतात. तेथे किर्रर रान आहे.

भवती भारी भय दाटले आहे.’ येथे कवी वापरत असलेली अंधाराची उपमा दारिद्र्याला सूचित करते, तर किर्रर रान अज्ञानाचे प्रतीक बनून येथे दाटणारे भय यमदूतसदृश नसून किड्याकिटकासारखे यःकश्चित असल्याची ग्वाही कवी देत असतानाच तो पुन्हा जाणीव देतो, ‘कुणी म्हणतील काळोखाच्या भयाण लाटा बारा वाटांनी धावत येताना या तारका काय करतील, तर त्याची तमा तुम्ही बाळगू नका.’ त्याबरोबरच खबरदारीचा इशारा देताना तो सांगतो, श्रीमंताच्या महाल लख्ख प्रकाशून टाकणारे ते भव्य दीप काय कामाचे? त्यांना गरीब, कष्टकरी कामगारांविषयी तिळमात्र तरी स्नेह अन् जिव्हाळा असतो का? त्यांची गणती करण्यात तू वेळ वाया दवडू नकोस. येथे कवी श्रीमंतांच्या श्रीमंतीत दडलेली गरिबीच दाखवतो, असे वाटल्यास चुकीचे नाही. तितक्यात त्याला मंदिरात तेवत असलेला नंदादीप दिसतो. त्याचे वर्णन करताना तो सांगतो,

हेही वाचा: स्वप्नपूर्ती घराची!

अखंड नंदादीपज्योती ।
दगडी देवा सोबत करिती ।
नच बाहेरी क्षणभरी येती ।
अप्सरा विलासी नसती सती ।।

पणतीप्रमाणेच या नंदादीपातही ज्योती आहे; पण दुर्दैवाने ती स्वतःचा समाजधारणेचा मंत्र विसरली आहे. हे सांगताना कवी दगडी देवाला सोबत करते, असे भाष्य करतो. येथे त्याला माणसात असलेला देव महत्त्वाचा हे तथ्य मांडायचे आहे नि समाजधारणा हेच धर्माचे विसरलेले सत्य स्वरूप अधोरेखित करावयाचे आहे. ते विसरल्यानेच तो नंदादीप मंदिराबाहेर येत नाही, ही त्याची खंत आहे. त्यामुळे कवी नायकाला सूचित करतो, की

धांव म्हणुनि तव घेउनि पणती ।
हृदय नाचुं दे तिजसांगाती ।

श्रीमंत स्नेहशून्य आहेत, तर धर्मवान आत्ममग्न आहेत. त्याकारणाने तुला तुझी मिणमिणणारी तरी जिवंत पणती घेऊन धावत बाहेर यावयाचे आहे. पण नुसती पणती कामाची नाही, तर त्यासोबत तुझे स्नेहशील मन हवे, तेच समतेची नि बंधुतेची पखरण करील. संस्कृतीचा भव्यदिव्य नि उदात्त दाखला तुला सोन्याच्या घरासारखा वाटत असला तरी तो आज मातीमोल ठरला. त्याच्यावर न विसंबता तू पुढे चल, असा संदेश देतो. तू जर हे असे केले तर

पहा पुढे या दीन लोचनीं ।
रविकिरणांचे स्मरण होउनी ।
आशा नाचे ज्योत दुज्या क्षणी ।
जरि विझे तरि करी कोण क्षिती ? ।।

तुझ्या या जागृतीरूपी पणतीने आज हीन दीन वाटणाऱ्या यांच्या नयनात रविकिरणांचे अर्थात आत्मसन्मान, स्वत्वाचे स्मरण झाले अन् आशारूपी ज्योत पेटली आणि लगेच दुसऱ्या क्षणी तुझी मिणमिणणारी ही पणती विझली तरी हरकत नाही, असे सांगत कवी कविता संपवतो.

प्रस्तुत कविता प्रबोधनात्मक स्वरूपाची आहे. प्रबोधनात्मक कवितेतील आशय सहज स्पष्ट होणारा नि अत्यंत साध्या-सरळ भाषेत असावा, असा संकेत असतो. कारण काव्यानंद हा त्यामागील हेतू नसून जागृती नि प्रबोधन साधणे, हा त्यामागील मुख्य हेतू असतो. त्यादृष्टीने पाहता प्रस्तुत कविता अत्यंत साचेबद्ध असून अलंकारादी किचकट प्रकारापासून दूर आहे. विषयाची गरज ओळखून केलेली ही रचना साहित्यकाराची उंचीच दाखवते. सुधारणेच्या आरंभी मी काय करू शकणार, माझ्या जवळ कसली साधने नाहीत अशी कुरकूर करणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालून त्यांना कृतीची दीक्षा देणारी ही कविता आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.

हेही वाचा: समुद्रच जेव्हा किनारा खातो!