व्यवसायासाठीचे घोटाळे घातकच

व्यवसायात टिकून राहण्यासाठी, कंत्राटं पदरात पाडण्यासाठी किंवा अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी काही कंपन्या पद्धतीचे गुप्त किंवा अपारदर्शक व्यवहार करतात.
Scams are dangerous for business
Scams are dangerous for businesssakal

- अपूर्वा जोशी, apurvapj@gmail.com / मयूर जोशी, joshimayur@gmail.com

देशाचा आर्थिक विकास गेल्या दशकात मोठ्या प्रमाणात झाला. एक दशकापूर्वी सहा हजारच्या पातळीवर रेंगाळणारा राष्ट्रीय भांडवल बाजाराचा निर्देशांक २२ हजारांच्या आसपास रुंजी घालू लागला, मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधा निर्माण झाल्या, भारताची अर्थव्यवस्था जगातल्या तिसऱ्या क्रमांकाची बलाढ्य अर्थव्यवस्था बनण्याकडे मार्गक्रमण करू लागली.

पण या वाढीच्या मागं काळ्या पैशाची सावलीही दिसू लागली. निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर अचानक निवडणूक रोख्यांचा मुद्दा उपस्थित केला गेला, याचा राजकीय मथितार्थ काहीही असला, तरी यातून व्यवसाय कोणत्या पद्धतीनं घोटाळे करू शकतात याचे नमुने सादर होऊ लागले.

व्यवसायात टिकून राहण्यासाठी, कंत्राटं पदरात पाडण्यासाठी किंवा अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी काही कंपन्या अशा पद्धतीचे गुप्त किंवा अपारदर्शक व्यवहार करतात. कोणी कोणत्या राजकीय विचार सरणीला पाठिंबा द्यावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि ती विचारसरणी जगावी म्हणून कोणत्या राजकीय पक्षाला आर्थिक मदत करावी यावर काही निर्बंध नाहीत. पण या मदतीचा उद्देश केवळ विचारसरणीला पाठिंबा देणं हा न राहता त्यातून नफा कमावणं होतो तेव्हा मात्र समीकरणं बदलू लागतात.

नफा ही कोणत्याही व्यवसायाची प्राथमिक गरज असते. पण काही वेळा या नफ्याच्या लालसेपोटी व्यवसाय चुकीच्या मार्गावर जातात आणि घोटाळे करतात. या घोटाळ्यांची व्याप्ती खूप मोठी आहे. निवडणूक रोखे घेऊन त्या बदल्यात सरकारी काम करवून घेणं हे देशात घडणाऱ्या घोटाळ्यांच्या हिमनगाचं एक टोक आहे. पण त्याची व्याप्ती समजावून घ्यायची असेल, तर मात्र आपल्याला खोलात जाणं भाग आहे.

भारतातील व्यावसायिक घोटाळ्यांचे प्रामुख्यानं दोन प्रकारात वर्गीकरण होतं. पहिले म्हणजे व्यवसायाविरोधात घडणारे घोटाळे आणि दुसरे म्हणजे व्यवसायाद्वारे केले जाणारे घोटाळे. कंपनीत काम करणारे कर्मचारी, पुरवठादार, ग्राहक किंवा इतर त्रयस्थ भुरटे एखाद्या व्यवसायाला फसवण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करतात. सध्याच्या युगात व्यवसायांविरोधात घोटाळे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कळसाला पोचला आहे.

व्यवसायांना फसवायला रॅनसमवेअरचा वापर होऊ लागला आहे. संगणकावरच्या सगळ्या फाइल्स लॉक करून बिटकॉइनमध्ये पैसे मागायचं प्रमाण वाढत आहे, तसेच डीपफेकचा वापर करून कंपनीच्या सीएफओला मालकाच्या आवाजात पैसे हस्तांतरित करायचे फोन येऊ लागले आहेत, पैसे हस्तांतरित केल्यावर कळतं, की मालकांनी कधी असे पैसे कोणाला द्यायला सांगितलेलेच नसते पण तोवर चोरट्यांनी पैसे घेऊन पळ काढलेला असतो.

या शिवाय ई-कॉमर्स कंपन्यांना फसवणारे ग्राहक पण काही कमी नाहीयेत, एखाद्या ई-कॉमर्स कंपनीकडून वस्तू मागवून त्याच्या बदल्यात खोट्या वस्तू परत करायच्या किंवा एखादी वस्तू वापरून ती काम संपल्यावर परत करायचं प्रमाण वाढतं आहे. एकूणच काय तर व्यवसायाविरोधात घडणाऱ्या घोटाळ्यांची संख्या वाढत आहे.

मात्र या सगळ्या पार्श्‍वभूमीवर व्यवसायांद्वारे केले जाणारे घोटाळे, त्यात गुंतलेल्या रकमांमुळं जास्त विदारक स्वरूप धारण करू लागले आहेत. एखादा कर्मचारी व्यवसायाला काही कोटी रुपयांना फसवत असेल, तर व्यवसायाचे मालक व्यवसायासाठी घोटाळे करताना, ताळेबंदात फेरफार करून बँकांना अथवा सरकारी संस्थांना हजारो कोटींना फसवताना दिसतात.

व्यावसायिक जगतात यशस्वी दिसण्याचा मोह जास्त असतो. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा बँकांकडून कर्ज मिळवण्यासाठी काही कंपन्या आपल्या आर्थिक आकाराची फसवी माहिती देतात. आपण भारतातली चौथी मोठी आयटी कंपनी आहोत, हे भासवण्याच्या नादात सत्यमनं सात हजार कोटींचा घोटाळा केला.

आयएलएफएस प्रकरणात, कंपनीनं बनावटी कंपन्यांचं जाळं उभं करून आपल्या आर्थिक बळकटीची झलक बँकांना आणि गुंतवणूकदारांना दाखवली; या खेरीज जेट एअरवेज नावाची कंपनी वर्षानुवर्षे दुबईस्थित एका कंपनीला अवाजवी कमिशन देत होती, यामुळं वाढीव खर्च आणि कमी नफा दाखवून, ‘जेट माइल्स’वरील बनावट पावत्यांचा हिशेब दाखवून, आणखी बऱ्याच क्लृप्त्या करून जेट एअरवेजनं देखील मोठ्या प्रमाणात घोटाळे केले.

याशिवाय काही व्यवसाय सरकारी निविदा किंवा परवाना मिळवण्यासाठी लाचखोरी आणि चुकीच्या पद्धती अवलंबतात. यामुळं इतर पात्र व्यवसायांना संधी नाकारली जाते तसेच सरकारी यंत्रणेचेही नुकसान होते.

व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी छोटे असोत की मोठे व्यवसाय असोत, अनेक बाह्य संस्था आणि व्यक्तींसोबत व्यवहार करत असतात. व्यवसायाच्या स्वरूपानुसार त्याच्या घोटाळ्यांचे प्रकार बदलत जातात. गुंतवणूकदारांकडून पैसे उभे करायचे म्हणून पेटीएमनं खोटी वॉलेट्स चालू केली, तर नीरव मोदीनं मोठ्या चतुराईनं बँकिंग व्यवस्थेमधील तांत्रिक त्रुटींचा फायदा आणि बँकिंग कर्मचाऱ्यांना हाताशी धरून स्वतःच्या व्यवसायाला कर्ज मिळवण्यासाठी करून घेतला.

काही कंपन्या आपल्या शेअर्सची किंमत कृत्रिमरीत्या वाढवण्यासाठी बनावट व्यवहार करतात. यामुळं गुंतवणूकदारांना आकर्षित करून नगण्य किमतीचे समभाग हजारो रुपयांना गळ्यात मारले जातात. यासाठी आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांना आपल्या युट्युब चॅनेल किंवा टीव्ही चॅनेलवर एखादा समभाग विकत घेण्यासाठी विविध कारणं द्यायला सांगितलं जातं.

कंपनीचे मोठे विस्तार करायचे प्लॅन्स, त्यांची कारकीर्द, सरकारी संस्थांसोबत असलेले त्यांचे नाते-संबंध आदी अनेक गोष्टी रंगवल्या जातात. स्वतः व्यावसायिक किंवा त्या व्यवसायातील काही मोठी धेंडं या परिस्थितीचा फायदा घेतात आणि आपले समभाग वाढीव किमतीत विकून बाहेर पडतात. यांसारखे अनेक व्यावसायिकांनी रचलेले घोटाळे सध्या आपल्या आजूबाजूला घडताहेत.

वरकरणी पाहता व्यवसायाविरोधात घडणारे घोटाळे हे संख्येनं जास्त असले, तरी व्यवसायासाठी केल्या गेलेल्या घोटाळ्यांची तीव्रता प्रचंड असते. ताळेबंदात काही आकडे बदलल्यानं थेट परिणाम काहीच होत नाही पण सामान्य गुंतवणूकदारांचे भांडवल बाजारात होणारे, किंवा खोट्या ताळेबंदावर दिलेल्या कर्जानं ठेवीदारांच्या पैशाचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत असतं. ‘व्यवसायासाठी केले जाणारे घोटाळे’ भारताच्या आर्थिक विकासाला आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा देतात. त्यामुळं गुंतवणूक कमी होते आणि बाजारपेठेत अस्थिरता निर्माण होते.

एखाद्या कंपनीमध्ये घोटाळा झालाय हे जेव्हा समोर येतं, तेव्हा अशा कंपन्यांची बाजारातून कर्ज घेण्याची क्षमता कमी होते. ज्याचं पर्यवसान आर्थिक ताणात होतं इतकंच नाही तर नजीकच्या काळात कंपनीचे व्यवहार सुरू राहतील का या मुद्द्यावर नियामक आणि गुंतवणूकदार साशंक होतात. तेव्हा या प्रकारच्या घोटाळ्यांवर नजर ठेवणं सद्यःस्थितीत महत्त्वाचं होत चाललं आहे.

(लेखिका ह्या सर्टिफाइड अँटी मनीलाँडरिंगविषयक तज्ज्ञ आणि सर्टिफाइड बॅंक फॉरेन्सिक अकाउन्टंन्ट आहेत, तर लेखक हे चार्टर्ड्‌ अकाउन्टंट आणि सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाउंटिंग तज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com