तुझा गेम करणार आहे! पोलिस ठाण्यातच एकावर चाकूहल्ला

तुझा गेम करणार आहे! पोलिस ठाण्यातच एकावर चाकूहल्ला

कऱ्हाड (जि. सातारा) : शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या दालनातच पूर्ववैमनस्यातून एकावर चाकूहल्ला झाला. हल्ला करणाऱ्याला पोलिस निरीक्षक पाटील यांनी त्वरित पकडल्याने पुढील अनर्थ टळला. लखन भागवत माने (वय 40, रा. हजारमाची) असे चाकूहल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. किशोर पांडुरंग शिखरे (वय 27, रा.हजारमाची) असे जखमीचे नाव आहे. साेमवारी दुपारी झालेल्या घटनेत मानेने केलेले तीन वर्मी वार शिखरे यांच्या पाठ, पोटात व हातावर झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
पोलिसांनी सांगितले की, लखन माने व किशोर शिखरे यांच्यात पूर्वीपासून वाद आहे. त्या कारणावरून शिखेरला घाबरून माने पंढरपूर येथे राहण्यास गेला होता. तेथे विठ्ठल मंदिरात येणाऱ्यांना गोपीचंद टिळा लावण्याचे काम करत होता. अलीकडे तो तेथेच स्थायिक होणार होता. तेथे असूनही किशोर शिखरे याच्या वडिलांशी लखन माने नेहमी फोनवर बोलायचा. ते संभाषण करू नकोस, असे किशोर शिखरे मानेला सांगायचा. त्यावरून मानेशी त्याचा वादही झाला होता. त्याचा राग मनात धरून मानेने 25 फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता मोबाईलवर शिखरेला धमकी दिली. तुझा गेम करणार आहे, असे तो शिखरेला म्हणाला होता. शिखरेने त्याची 26 फेब्रुवारीला पोलिसात तक्रार दिली होती. माने पंढरपूरला असल्याने पोलिसांनी त्याला साेमवारी चौकशीला बोलावले होते. सकाळी अकराच्या सुमारास माने येथील पोलिस ठाण्यात आला. पहिल्यांदा त्याला पोलिस निरीक्षक पाटील यांच्या दालनात नेण्यात आले. श्री. पाटील यांनीही दाखल एनसीच्या अनुशंगाने माने याच्याकडे चौकशी केली.

त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर शिखरे यांना बोलावण्यास तपासी अंमलदारांना सांगितले. त्यानुसार शिखेरही अर्धा तासात तेथे आला. त्यालाही पोलिस निरीक्षक पाटील यांना भेटवले. श्री. पाटील यांनी शिखरे याचीही बाजू ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी मानेला समोर बोलावण्यास सांगितले. मानेला पोलिस घेऊन श्री. पाटील यांच्या दालनात गेले. त्याचवेळी पोलिसाला हिसका देऊन मानेने स्वतःजवळील चाकूने थेट शिखरे याच्यावर सपासप वार करण्यास सुरवात केली. शिखरेच्या हात, मान व पाठीत वार झाले. या प्रकाराने पोलिस निरीक्षक पाटील हबकले. मात्र, क्षणाचाही विलंब न करता त्यांनी खुर्चीतून उठून मानेच्या दिशेने धाव घेत त्याच्या मुसक्‍या आवळल्या. त्याला पुढील वार करण्यापासून थांबवले. दालनात झालेली घाईगडबड ठाण्यातील अन्य कर्मचाऱ्यांच्या कानावर गेल्यावर तेही तेथे धावले. त्यावेळी स्थिती आटोक्‍यात आली. पोलिसांनी मानेला अटक केली आहे. त्याबाबत शिखरे यांची फिर्याद घेण्यात आली आहे. 

खुर्च्या झिजवण्यापेक्षा राजीनामा द्या, आम्ही पालिका चालवून दाखवतो

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com