esakal | खळबळजनक घटना: आई वडिलांनी मुलीचा मृतदेह परस्पर पुरला
sakal

बोलून बातमी शोधा

खळबळजनक घटना: आई वडिलांनी मुलीचा मृतदेह परस्पर पुरला

या संपूर्ण प्रकरणाची दखल जादूटोणा कायद्यांतर्गत घेऊन "सु मोटो' अधिकारातून कारवाई करावी. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोन्ही देवऋषी, तसेच परस्पर मुलीच्या मृतदेहाची वाट लावणाऱ्या दोषींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे

खळबळजनक घटना: आई वडिलांनी मुलीचा मृतदेह परस्पर पुरला

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : दोन कथित "देवऋषी'च्या भूत लागल्याच्या "सल्ल्याला' भुलून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे एका चौदा वर्षीय मुलीचा हकनाक बळी गेल्याची खळबळजनक घटना येथे उघडकीस आली. या घटनेची जादूटोणा कायद्यान्वये सखोल चौकशीची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. सध्या हे कुटुंब फरारी झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
 
याबाबतची माहिती अशी, की दहिवडी येथील फलटण रस्त्यावरील माऊली मंगल कार्यालयाजवळ काही फिरस्त्या लोकांची वस्ती आहे. या वस्तीवरील बायली सुभाष इंगवले या चौदा वर्षीय मुलीचे सतत डोके दुखत होते, तसेच तिला तापही आला होता. तिच्यावर वडूज येथील एका डॉक्‍टरकडे उपचार करण्यात आले होते. वैद्यकीय उपचारानंतरही मुलीच्या पालकांनी बायलीला गोंदवले येथील एका देवऋषीकडे नेले. त्याने "तुमच्या घराच्या आसपास बारव आहे. तेथील भूत मुलीला लागले आहे. अमावास्येपर्यंत ठीक होईल,' असे सांगून मंत्रतंत्र करून त्यांना परत घरी पाठवले.
 
त्यानंतरही सायंकाळी जास्त त्रास झाल्याने बायलीला मोही गावच्या रामचंद्र सावंत या अन्य एका देवऋषीकडे नेण्यात आले. त्यानेही बारवीतील भूत लागले आहे. पौर्णिमेपर्यंत देव बांधले आहेत आणि ते ठीक होणे खूप कठीण आहे. 20 तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत बायलीला भयंकर धोका आहे, असे सांगून मंत्रतंत्र व अंगारे धुपारे करून परत पाठवले. शनिवारी 20 तारखेच्या रात्री घरातील सर्व जण बायलीला गराडा घालून काय होतेय ते केवळ बघत बसले. बायली शांत बसली होती व तिचे हातपाय थरथर कापत होते; पण तरीही सगळ्यांच्या नजरा घड्याळाच्या काट्यांकडे होत्या व सर्वजण बारा वाजण्याची वाट पाहात होते. रात्री बाराला पाच मिनिटे कमी असताना बायली निपचित पडली व निधन पावली. या घटनेमुळे देवऋषीने सांगितल्याप्रमाणे खरोखरच भूताने बायलीला नेले, असा समज करून कुटुंबीयांनी काहीही बोभाटा न करता बायलीच्या मृतदेहाचे जवळ असलेल्या ओढ्याच्या शेजारी दफन केले. 
 
ही घटना सातारा जिज्ञासा ग्रुपचे सदस्य नीलेश पंडित यांनी दहिवडीच्या सुनील काटकर यांना सांगितली. काटकर यांनी ही माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रशांत पोतदार यांना दिली. समाजात नाचक्की होईल, तसेच देवऋषीच्या भीतीने या मुलीच्या कुटुंबीयांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांना भेटण्यास नकार दिला व आमची काहीही तक्रार नाही, असे सांगितले. संबंधित मुलीचा मामा पोलिस दलात कार्यरत आहे. त्याच्याशी चर्चा करून घडलेली घटना जादूटोणा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. कुटुंबातील कोणी तक्रार दिल्यास देवऋषींना अटक करता येईल व पुढील घटना टाळता येतील, असे सांगून तक्रार देण्यास सांगण्यात आले; परंतु त्यांनीही तक्रार दिली नाही, असे समितीने म्हटले आहे. 

सखोल चौकशी करा : अंनिस 

या संपूर्ण प्रकरणाची दखल जादूटोणा कायद्यांतर्गत घेऊन "सु मोटो' अधिकारातून कारवाई करावी. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोन्ही देवऋषी, तसेच परस्पर मुलीच्या मृतदेहाची वाट लावणाऱ्या दोषींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे. 

""मृत मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते संबंधित ठिकाणी आढळून आले नाहीत. हे कुटुंब तिथून निघून दुसऱ्या गावी गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचा शोध सुरू असून, पोलिस पथक रवाना झाले आहे. लवकरच या घटनेची संपूर्ण माहिती समोर आणून दोषींवर कारवाई करण्यात येईल.'' 
- राजकुमार भुजबळ, सहायक पोलिस निरीक्षक, दहिवडी 

आई, तू पंजाबी ड्रेस का घातलास? मुलाची आत्महत्या

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह करंजेतील पाच जणांवर गुन्हा

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा जागेवरच होणार फैसला; थेट महाव्यवस्थापकच येणार भेटीला!

सागाच्या वाहतूकप्रकरणी पाचवडच्या एकावर गुन्हा; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा पालिकेचा 298 कोटींचा अर्थसंकल्प

Edited By : Siddharth Latkar