पाचगणी पालिकेत शह कटशाहचे राजकारण सुरुच; विराेध- एकनिष्ठेचा दावा

रविकांत बेलोशे
Wednesday, 30 December 2020

या वेळी मात्र हक्काचा नगरसेवक सलग गैरहजर राहिल्याने सत्ताधारी गट तोंडघशी पडला. 

भिलार (जि. सातारा) : नगराध्यक्षांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून सत्ताधारी गटाचे ज्येष्ठ नगरसेवक दिलावर बागवान विशेष सभेला गैरहजर राहिले. यापुढेही नगराध्यक्षांच्या मनमानीला विरोध करून पाचगणीकरांचा श्वास मोकळा करणार असल्याचा दावा माजी उपनगराध्यक्ष नारायण बिरामणे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
 
तहकूब झालेल्या विशेष सभेतही सत्ताधारी गटाचे जेष्ठ नगरसेवक दिलावर बागवान अनुपस्थित राहिल्याने विरोधी गटाने बहुमताच्या जोरावर सत्ताधारी गटाच्या बाजूचे ठेकेदार बाजूला केले. नगरपालिकेवर नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर गटाची सत्ता असून, दोन्ही गटाकडे नऊ-नऊ नगरसेवक आहेत. नगराध्यक्षा कास्टिंग व्होटच्या जोरावर विरोधकांचा विरोध दरवेळी परतावून लावत होत्या. या वेळी मात्र हक्काचा नगरसेवक सलग गैरहजर राहिल्याने सत्ताधारी गट तोंडघशी पडला. 
कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन झालेल्या तहकूब सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर होत्या. या वेळी उपनगराध्यक्ष विनोद बिरामणे, नारायण बिरामणे, अनिल वन्ने, रेखा कांबळे, पृथ्वीराज कासुर्डे, विठ्ठल बगाडे, प्रवीण बोधे, विजय कांबळे, नीता कासुर्डे, हेमा गोळे, रेखा जानकर, उज्ज्वला महाडिक, सुलभा लोखंडे, अर्पना कासुर्डे, सुमन गोळे, आशा बगाडे यांच्यासह मुख्याधिकारी गिरीश कोकर यांची या वेळी उपस्थिती होती.

Wow It's So Sweet : चक्क शेतावर पर्यटक लुटताहेत स्ट्राॅबेरी खाण्याचा आनंद

इंटरमिजिएट, एलिमेंटरी परीक्षेबाबत संभ्रम
 
या सभेत 60 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. पैकी शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे 53 विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यातील आरोग्य विभागाचे, संगणक विभाग कामगार पुरविणे, छपाई करणे आदी विषय विरोधी गटाने बहुमताने नामंजूर केले. यामुळे नगराध्यक्षा कऱ्हाडकर यांच्या सत्ताकाळात पहिल्यादाच त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना नारळ मिळाला आहे. 

मी कुठेही गेलो नाही - दिलावर बागवान 

तहकूब व विशेष सभेत मी गैरहजर राहिल्याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत. मी कुठेही गेलेलो नाही. एका सभेला मी गैरहजर राहिलो म्हणजे सगळ संपले अस होत नाही. मी आज आणि उद्याही नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्याशी एकनिष्ठ असून, त्यांच्या माध्यमातून शहर विकासाला गती देणार असल्याचे दिलावर बागवान यांनी सांगितले. चांगल्या कामासाठी मी लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्याबरोबर राहणार असल्याचे स्पष्टीकरण बागवान यांनी दिले आहे.

अभिनेते अमिर खान कुटुंबासह सिंधुदुर्गात

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchgani Muncipal Council General Meeting Satara News