esakal | आम्हाला राजकारणात कधी संधी मिळणार? दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचे गुडघ्याला बाशिंग I Election
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar Panchayat Election

अमक्या, तमक्याचे खंदे समर्थक, कट्टर कार्यकर्ते अशी बिरुदावली आणखी किती दिवस मिरवायची?

आम्हाला राजकारणात कधी संधी मिळणार?

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (सातारा) : अमक्या, तमक्याचे खंदे समर्थक, कट्टर कार्यकर्ते अशी बिरुदावली आणखी किती दिवस मिरवायची? आम्हाला राजकारणात (Politics) कधी संधी मिळणार? अशी भावना व्यक्त करीत आम्ही आणखी किती दिवस सतरंज्या उचलायच्या, असा सवाल आता शहरातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते करू लागले आहेत. येथील नगरपंचायत निवडणुकीचे (Nagar Panchayat Election) पडघम वाजू लागल्याने दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधत जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस आदी कार्यक्रमांचे औचित्य साधून लोकांशी संपर्क मोहीम वाढविली आहे.

येथील ग्रामपंचायतीचे (Gram Panchayat) रूपांतर नगरपंचायतीत झाल्यानंतर २०१६ मध्ये नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली. नगरपंचायतीवर विविध राजकीय पक्षांचे १५ नगरसेवक व स्वीकृत दोन नगरसेवकांची वर्णी लागली. प्रस्थापित नगरसेवकांनी आपापल्यापरीने आपापल्या प्रभागांत विविध विकासकामेदेखील केली आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रस्थापित नगरसेवकांच्या शहरात दुसऱ्या फळीतील समर्थक कार्यकर्त्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. त्यामुळे गेली पाच दहा वर्षे अमक्या, तमक्याचे खंदे, कट्टर समर्थक अशी बिरुदावली त्यांच्या माथी पडली आहे. ही बिरुदावली आणखी किती वर्षे, आणखी किती निवडणुकांसाठी आम्ही माथी चिटकवायची, असा प्रश्न हे कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत आपणाला संधी हवीच, असा अट्टाहासही या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. तसेच निवडणुकीत पॅनेलमधून संधी मिळाल्यास उत्तमच अन्यथा अपक्ष उमेदवारी करण्याचा पवित्राही त्यांनी हाती घेतला आहे.

हेही वाचा: 'निवडणुकीत तिकीट फिक्स समजू नका; आता पॅरामीटर लावूनच तिकीट'

नगरपंचायतीचा पहिल्या पंचवार्षिक पदाधिकाऱ्यांचा कालावधी पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. त्यानंतर नगरपंचायतीची निवडणूक अधिसूचना, प्रभाग रचना असा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागांत जनसंपर्क वाढविला आहे. विशेषत: जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमांना त्यांची हमखास उपस्थितीदेखील दिसून येत आहे. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत रणसिंग फुंकल्याने प्रस्थापितांची ऐन निवडणुकीत डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे या इच्छुकांना ऐन निवडणुकीच्या काळात स्वीकृत नगरसेवकपदाचे गाजर दाखविले जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. इच्छुक उमेदवार आपली उमेदवारी पुढे रेटणार की स्वीकृतच्या आमिषाला बळी पडणार, हा येणारा कालावधीच ठरवणार आहे.

हेही वाचा: ..त्या उदयनराजेंवर मला काहीच बोलायचं नाही : अजित पवार

loading image
go to top