esakal | घरखरेदीची हीच खरी संधी; गृहकर्ज दर, मुद्रांक शुल्क कपातीचा लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

घरखरेदीची हीच खरी संधी; गृहकर्ज दर, मुद्रांक शुल्क कपातीचा लाभ

बहुतांशी जण घर खरेदीचे स्वप्न हे कर्ज घेऊनच करत असल्याचे दिसते. रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात सातत्याने कपात केल्यामुळे कर्जावरील व्याजदर खाली आलेत. सध्या स्टेट बॅंक किंवा एचडीएफसीसारख्या नामवंत बॅंकांकडील गृहकर्जाचे व्याजदर 6.90 ते 7 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आलेत. त्यामुळे गृहकर्ज ही नवीन घर खरेदीदारांसाठी पर्वणीच ठरणार आहे. 

घरखरेदीची हीच खरी संधी; गृहकर्ज दर, मुद्रांक शुल्क कपातीचा लाभ

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रे अडचणीत आलेली असताना बांधकाम क्षेत्राला मात्र, चालना मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. घरांच्या कमी झालेल्या किमती, गृहकर्जाचे कमी झालेले व्याजदर, मुद्रांक शुल्कात शासनाने केलेली कपात आणि दसरा-दिवाळीनिमित्त येणाऱ्या विविध ऑफर्समुळे नव्याने घर खरेदी करणाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
 
सध्याच्या वर्क फ्रॉम होमच्या संस्कृतीमुळे चांगल्या घरांची गरज वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन विविध बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या गृहप्रकल्पांमध्ये आधुनिक सुविधा देण्यावर भर दिला आहे. प्रत्यक्ष राहण्यासाठी घर हवे आहे, त्यांच्यासाठी तर सध्याच्या सणाचा काळ ही सुवर्णसंधी ठरणार आहे. गुंतवणूक म्हणून घर घेणाऱ्यांनाही बदललेल्या परिस्थितीत ही संधी खुणावत आहे. घर घेणार असाल आणि बऱ्यापैकी डाऊन पेमेंट भरण्याची तयारी असल्यास बांधकाम व्यावसायिकांकडून आकर्षक सवलत मिळण्याची शक्‍यता आहे. प्रत्यक्ष वाटाघाटींवेळी बांधकाम व्यावसायिक काही प्रमाणात सवलतीचा दर देत आहेत. त्याचाही लाभ घेता येऊ शकेल. 

मुद्रांक शुल्क कपात
 
कोरोनाच्या काळात थंडवलेल्या घर खरेदीला चालना देण्यासाठी शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केली आहे. 31 डिसेंबरपर्यंत घर खरेदी करणाऱ्यांना पाच टक्‍क्‍यांऐवजी दोन टक्के, तर जानेवारी ते मार्च 2021 या काळात खरेदी करणाऱ्यांना तीन टक्के मुद्रांक शुल्क द्यावे लागेल. मोठ्या घराची खरेदीत हा दिलासा मोठा असू शकतो. गृहकर्जाच्या हप्तारूपी परतफेडीवर प्राप्तिकर खात्याकडून सवलत मिळत असल्याने खरेदीदारांना कर बचतीचा लाभही मिळतो. हप्त्याच्या मुदलातील परतफेडीवर दीड लाख रुपयांच्या मर्यादेत वजावट मिळते, तर व्याजाच्या दोन लाखांपर्यंतच्या रकमेवर वजावट मिळते. 

कर्जाच्या व्याजदारात निचांक 

बहुतांशी जण घर खरेदीचे स्वप्न हे कर्ज घेऊनच करत असल्याचे दिसते. रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात सातत्याने कपात केल्यामुळे कर्जावरील व्याजदर खाली आलेत. सध्या स्टेट बॅंक किंवा एचडीएफसीसारख्या नामवंत बॅंकांकडील गृहकर्जाचे व्याजदर 6.90 ते 7 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आलेत. त्यामुळे गृहकर्ज ही नवीन घर खरेदीदारांसाठी पर्वणीच ठरणार आहे. 

सभासदांची दिवाळी होणार गोड; मंत्रिमंडळाचा निर्णय

काय आहे परिस्थिती...
 
अनेक वर्षे रिअल इस्टेट क्षेत्र मंदीच्या छायेत
 
घरांच्या विक्रीला खीळ बसल्याने बांधकाम व्यावसायिक अडचणीत
 
घरांच्या उपलब्धतेच्या तुलनेत मागणी कमी


'हे विश्वची माझे घर' मानून शिक्षिकेचा गोरगरिबांना आधार
 

यातून मिळेल चालना... 

दसरा-दिवाळीनिमित्त ऑफर्स
 
गृहकर्जाचे व्याजदर नीचांकी पातळीवर
 
मुद्रांक शुल्कात सरकारकडून कपात
 
प्राप्तिकर सवलतींचा अतिरिक्त लाभ


साताऱ्यात घर खरेदीची सुवर्णसंधी 

सरकारने टॅक्‍स, स्टॅम्प ड्युटी कमी केली आहे, सणांसाठी डिस्काउंटही मिळेल. वर्क फ्रॉम होम या संकल्पनेत सातारा शहरात दुसरे घर घेतले पाहिजे. निसर्गरम्य वातावरणसोबतच होणारी हद्दवाढ, मेडिकल कॉलेज, औद्योगिक विकास, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, तसेच पाणी, रेल्वे, महामार्गाची सुविधा उपलब्ध आहे. हे सर्व लक्षात घेता कोल्हापूर व पुणे, मुंबईच्या मध्ये सातारा हे शांत निसर्गरम्य ठिकाण लक्षात घेता येथे दुसरे घर असायलाच हवे. त्यासाठी कोविडच्या पार्श्‍वभूमीवर घर खरेदीसाठी निर्माण झालेल्या विविध सवलती लक्षात घेऊन सर्वसामान्यांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यायला हवा. 

- बाळासाहेब ठक्कर (जिल्हाध्यक्ष, क्रिडाई, सातारा) 

जिगरबाज महाराष्ट्र पाेलिसांची हरियाणात धडाकेबाज कामगिरी

ग्राहकांनी संधीचे सोने करावे 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कमी झालेला जीएसटी, स्टॅम्प ड्युटीतील कपात या माध्यमातून सर्वसामान्यांना नवे घर खरेदी करताना मोठी सवलत मिळणार आहे. त्यासोबतच बांधकाम व्यावसायिकांकडून दसरा व दिवाळीच्या सणासाठी आणखी काही सवलती मिळतील. त्यामुळे नवे घर खरेदीसाठी आलेल्या या संधीचे ग्राहकांनी सोने करावे. पुन्हा अशी संधी मिळणार नाही. 

- राजेश देशमुख (उपाध्यक्ष, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटर)