सातारा : नरभक्षक होण्याआधीच बिबट्याला आवरा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

सातारा : नरभक्षक होण्याआधीच बिबट्याला आवरा!

सातारा (कऱ्हाड) ः ऊसतोडणीसाठी फडाकडे जाताना बिबट्याने अचानक हल्ला चढवून मजुरांच्या टोळीतील चार वर्षांच्या मुलाला ठार केले. महिन्यापूर्वी तांबवेतील मुलगा बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला. माणसांवर हल्ला करायला लागला, की बिबट्या नरभक्षक होतो. त्यामुळे सवय लागून नरभक्षक होण्याअगोदरच वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. त्यासाठी तातडीने पावले उचलून कार्यवाही करण्याची गरज आहे.

कऱ्हाड, पाटण तालुक्यांत बिबट्यांची संख्या वाढली आहे. सध्या येणकेसह परिसरातील आगाशिवनगर, तांबवे, पश्चिम सुपने, पाठरवाडी, ढेबेवाडी परिसरात बिबट्याचा वावर दिसतो. त्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी ते हल्ले करतानाचे प्रकार घडत आहेत. हंगाम सुरू झाल्याने सध्या ऊसतोडी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बिबट्या आता उसाच्या फडाबाहेर पडू लागले आहेत. काल (ता. १५) रयत साखर कारखान्याच्या मजुरांची टोळी येणकेतील शिवारात ऊसतोडीसाठी वास्तवास आली आहे. नेहमीप्रमाणे पहाटे मजूर कुटुंबास ऊसतोडणीसाठी उसाच्या फडाकडे निघाले होते. आईसोबत चार वर्षांचा आकाशही होता. तो आईच्या पाठीमागून जात असताना उसातून अचानक आलेल्या बिबट्याने काही कळायच्या आत आकाशला सुमारे १५० मीटर दूरवर फरफट नेले. तेथे त्याला ठार करून बिबट्याने तेथून धूम ठोकली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आकाशला पाहून येणकेतील ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

हेही वाचा: Corona Update : राज्यात नवे 886 रुग्ण; मृत्युसंख्येत किंचित वाढ

वारंवार तोंडी व लेखी कळवूनही वनविभाग दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. तासभर झालेल्या गोंधळामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थ करत होते.हा बिबट्या नरभक्षक होण्याअगोदरच त्याला जेरबंद करण्याची गरजआहे.

शेतकऱ्यांकडून पिकांना रात्री पाणी देणे बंद

तांबवे परिसरातील एका लहान मुलावर महिन्यापूर्वी बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले होते. बिबट्याच्या हल्ल्यातून तो मुलगा शर्तीने वाचला. त्यानंतर सातत्याने बिबट्याचे शेतकरी, ग्रामस्थ, महिलांना दर्शन होत आहे. त्यामुळे त्याची मोठी दहशत आबालवृद्धांवर आहे. त्याच्या दहशतीने आता शेतकऱ्यांनी पिकास रात्री पाणी देण्यास जाणे बंद केले आहे. त्यामुळे शेतीचेही मोठे नुकसान होऊ लागले आहे.

loading image
go to top