बेलवडे बुद्रुक, करपेवाडीवर शाेककळा; साेमवार ठरला घात वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

बेलवडे बुद्रुक, करपेवाडीवर शाेककळा; साेमवार ठरला घात वार

सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध भागात विशेषतः क-हाड (karad) तालुक्यात साेमवार हा अपघात (accident) वार ठरला आहे. मालखेडला झाडाला धडकून एक दुचाकीस्वार ठार झाला. वहागावला रेल्वेचे साहित्य घेऊन जाणारा कंटनेर पलटी झाला तसेच काेल्हापूर नाक्यावर एक आंब्याचा ट्रक पलटी झाला. याबराेबरच करपेवाडी (काळगाव, ता. पाटण) येथील माथाडी कामगाराचा वाशीत (मुंबई) माल उतरविताना मृत्यू झाला आहे. (satara-marathi-news-accident-near-karad-vahagaon-malkhed-one-died)

मालखेड येथे महामार्गावरील सेवा रस्त्यावर साेेमवारी झालेल्या दुर्घटनेत हंबीरराव रामचंद्र देसाई (वय ६२, रा. बेलवडे बुद्रुक) हे ठार झालेत. हंबीरराव देसाई कामानिमित्त दुचाकीवरून कऱ्हाडला निघाले होते. सेवा रस्त्याने ते निघाले होते. त्या वेळी रस्त्याच्या कडेला पडलेल्या झाडाला त्यांची दुचाकी धडकली. त्यात ते दुचाकीवरून खाली कोसळले. त्यात त्यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला. उपचारासाठी त्यांना कृष्णा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारावेळी त्यांचे निधन झाले. अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

वहागावमध्ये कंटेनर पलटी

मुंबईवरून रेल्वेचे सुटे पार्ट भरून निघालेला कंटेनर येथे पलटी झाला. संबंधित कंटेनर कर्नाटक धारवाडला निघाला होता. चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला. अपघातात कंटेनरचे नुकसान झाले आहे. अपघातस्थळावरून मिळालेली माहिती अशी, चालक मुलराज (वय ४५, रा. जम्मू काश्मीर) त्याच्याकडील कंटेनर घेऊन रेल्वेचे सुटे पार्ट कर्नाटक धारवाड येथे पोच करण्यासाठी निघाला होता. येथे चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर महामार्गाकडेला नाल्यात कंटेनर पलटी झाला. कंटेनरमधील साहित्य उपमार्गावर पडल्याने उपमार्गावरील वाहतूक काही काळ बंद झाली होती. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, सदाशिव सकट, तानाजी नामदास घटनास्थळी जाऊन मदत केली.

कोल्हापूर नाक्यावर आंब्यांचा ट्रक पलटी

पुणे-बंगळूर महामार्गावरील कोल्हापूर नाक्यावर आंब्याने भरलेला ट्रक साेमवारी पहाटे सहाच्या सुमारास पलटी झाला. अपघातात ट्रकसह आंब्यांचे नुकसान झाले. अपघातात चालकासह दोघे जखमी झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली. पोलिसांनी ती पूर्ववत केली.

याबाबत माहिती अशी, आंब्याने भरलेला ट्रक (केए ०२, एएच ५९६३) कर्नाटकहून मुंबईकडे निघाला होता. पुणे-बंगळूर महामार्गावरून जात असताना कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने तो उड्डाण पुलाच्या पिलरला धडकून पलटी झाला. चालकाच्या झोपेत अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोकांनी तेथे धाव घेतली.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस विभागाच्या सहायक पोलिस निरीक्षक अस्मिता पाटील, अशोक जाधव, शहर पोलिस ठाण्यातील अपघात विभागाचे हवालदार प्रशांत जाधव, महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, अमित पवार, होमगार्ड यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रस्त्यावर पडलेले आंबे, ट्रकमधील आंबे दुसऱ्या वाहनाने भरून ट्रक मार्गावरून बाजूला केल्यावर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. हवालदार प्रशांत जाधव तपास करत आहेत.

करपेवाडीच्या माथाडी कामगाराचा मुंबईत भाजीपाला उतरताना मृत्यू

ट्रकमधून भाजीपाला उतरत असताना पाय घसरून पडल्याने करपेवाडी (काळगाव, ता. पाटण) येथील माथाडी कामगाराचा मृत्यू झाला. वाशी (मुंबई) येथील भाजीपाला मार्केटमध्ये ही घटना घडली. वसंत किसन मानुसकरे (वय ४८) असे मृत कामगाराचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी, करपेवाडी येथील वसंत मानुसकरे मुंबईत माथाडी कामगार म्हणून हातगाडीवर काम करत होते. कोरोनामुळे वाढविलेल्या निर्बंधांमुळे अलीकडे माथाडी कामगारांच्या कामावर परिणाम झाल्याने ते काही दिवस गावीच होते. १५ दिवसांपूर्वी ते पुन्हा गावाहून मुंबईला गेले. रात्रीच्या सुमारास एफएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या गाड्यातील माल उतरण्याचे जादा काम मिळत असल्याने कालरात्री ते पहिल्यांदाच तिकडे गेले होते. रात्री दीडच्या सुमारास ट्रकमधून माल उतरत असताना ही दुर्घटना घडली.

घसरून ट्रकच्या फाळक्यावर पडल्याने मान व मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. वसंत मानुसकरे यांचा गावाकडे सामाजिक व धार्मिक कार्यातून हिरिरीने सहभाग असायचा. मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावामुळे परिसरात त्यांचा मोठा लोकसंपर्क होता. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे.

ब्लाॅग वाचा

टॅग्स :Satara