कऱ्हाड तालुक्यात शंभूराज-काकांची आघाडी; राष्ट्रवादीला जबर धक्का

हेमंत पवार
Tuesday, 19 January 2021

तांबवे जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर गटाची आघाडी दिसून येत आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : राजकीयदृष्टा संवेदनशील असलेल्या तांबवे  (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवत जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांनी सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक पी. डी. पाटील, विद्यमान संचालक रामचंद्र पाटील, युवा नेते सतीश पाटील, अशोक पाटील यांच्या सहकाऱ्याने ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी समर्थकांना मतदारांनी निकालाच्या रुपाने मोठा धक्का दिला आहे.  

कऱ्हाड तालुक्यातील राजकीयदृष्टा संवेदनशील असलेल्या तांबवे ग्रामपंचातीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, पी. डी. पाटील, रामचंद्र पाटील, सतीश पाटील व अशोक पाटील यांच्या विरोधात सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक निवासराव पाटील, माजी उपसरपंच धनंजय ताटे, माजी सरपंच विठोबा पाटील यांचे भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल उभे होते. या दोन्ही गटासाठी निवडणूक चुरशीची ठरली होती. त्यामुळे दोन्ही गटांनी विजयासाठी प्रयत्न केले, मात्र मतदारांनी गावातील एक, दोन आणि पाच क्रमांकाच्या वार्डमधून प्रदीप पाटील यांच्या पॅनेलमधील उमेदवारांना आपला कौल देत त्यांच्या पॅनेलला बहुमत दिले. त्यातून गावच्या ग्रामपंचायतीत सत्तांतर घडले आहे. 

Gram Panchayat Results : पवारवाडीत पवारांचा बालेकिल्ला ढासळला; 40 वर्षांनंतर सत्तांतर

श्री. पाटील यांच्या भैरवनाथ ग्रामविकास आघाडीतून उत्तम पांडुरंग साठे (५५०), स्वाती मारुती काटवटे (५३१), शोभाताई बाळासाहेब शिंदे (५२२), विजयसिंह पांडुरंग पाटील (४९२), निता बाबासोा पवार (५१०), देवानंद वसंत राऊत (३८४), रेश्मा शशिकांत वाडते (३८०), जयश्री हणमंतराव कबाडे (४०६) हे उमेदवार विजयी झाले, तर विरोधी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे विठोबा वसंत पाटील (३००), सुवर्णा संतोष कुंभार (३०६), अमरनाथ वसंत गुरव (४२६), धनंजय रघुनाथ ताटे (४५७), नंदा अधिकराव पाटील (३९६) हे उमेदवार विजयी झाले. ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्याने राष्ट्रवादी समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.  

तशी वेळ आली, तर मेडिकल कॉलेजचं पण उद्घाटन करणार; उदयनराजेंचा प्रशासनाला इशारा

केवळ सात मतांसाठी पराभव

तांबवे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक चारमधून अश्विनी पाटील यांना फक्त 14 मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यांना विजयासाठी सात मतांची गरज होती. थोडक्या मतात त्यांची सीट गेल्याने त्याचा मोठा धक्का बसला आहे.

आमदार मकरंद पाटलांच्या चर्चेनंतर महाबळेश्वर पालिकेत रंगले राजकारण

कऱ्हाड तालुक्‍यातील नेत्यांना संमिश्र कौल 

ग्रामपंचायत निवडणुकीत कऱ्हाड तालुक्‍यातील नेत्यांना संमिश्र यश मिळाले आहे. कऱ्हाड उत्तरेतील पाल व बनवडी वगळता उंब्रजसह महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाने सत्ता कायम राखली आहे. कऱ्हाड दक्षिणचा निकाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर गटाला विचार करायला लावणारा ठरला आहे. या दोन्ही गटाला स्थानिक पातळीवर संघटन बांधणीची असलेली आवश्‍यकता या निकालातून स्पष्ट झाली आहे. कृष्णा कारखान्याच्या बेल्टमध्ये अतुल भोसले यांच्या गटाने चांगले यश मिळवले आहे. कोरोनाच्या काळात कृष्णा हॉस्पिटलकडून झालेल्या मदतीचाही थोडाफार फायदा भोसले गटाला निकालातून झाल्याचे दिसत आहे. 

कऱ्हाड तालुक्‍यातील 87 ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुका नेत्यांच्या स्थानिक गटांतर्गत, आघाड्या करून लढवल्या गेल्या. त्यामुळे नेत्यांना स्थानिक आघाड्यात यश मिळाले आहे. त्यामध्ये कऱ्हाड उत्तरेत पालकमंत्री पाटील यांच्या गटाने निगडी, उंब्रज, कोपर्डे हवेली, हजारमाची, मरळी, पेरले, वडगाव उंब्रज, बेलवडे हवेली, घोणशी, सुर्ली, रिसवड, खोडशी, वाघेरी आदींसह अन्य ग्रामपंचायती ताब्यात ठेवल्या. चिखलीमध्ये पृथ्वीराज चव्हाण गटाच्या मदतीने सहकारमंत्र्यांच्या गटाची सत्ता आली. मात्र, त्यांचे समर्थक आणि कऱ्हाड उत्तरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, बनवडीचे शंकरराव खापे, बाजार समितीचे माजी सभापती बेलवडे हवेलीतील दाजी पवार या स्थानिक प्रस्थापितांच्या विरोधात मतदारांनी कौल दिला आहे. रिसवडची ग्रामपंचायत उंडाळकर गटाकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसने ताब्यात घेतली आहे.

महाबळेश्वर तालुक्यात गड आला, पण सिंह गेला; राष्ट्रवादीला धक्का, भाजपची जोरदार मुसंडी  

कऱ्हाड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री चव्हाण व माजी मंत्री उंडाळकर यांच्या गटाला विचार करायला लावणारा निकाल लागला आहे. या दोन्ही गटाला स्थानिक पातळीवर संघटन बांधणीची असलेली आवश्‍यकता या निकालातून स्पष्ट झाली आहे. बाळासाहेब पाटील व पृथ्वीराज चव्हाण गटाने वहागाव येथे पृथ्वीराज चव्हाण गटाने घारेवाडी, जखीणवाडी या ग्रामपंचायतीत, तर उंडाळकर गटाने कोणेगाव, इंदोली, शेळकेवाडी येथे एकहाती सत्ता मिळवली. उंडाळकर आणि चव्हाण गटाने पोतले, मालखेड, साळशिरंबे, वारुंजी येथे, तर भोसले-उंडाळकर यांच्या गटाने चचेगाव, बेलवडे बुद्रुक येथे सत्ता मिळवली. भोसले-चव्हाण गटाने संयुक्तरीत्या विंग, कालवडे, जिंती येथे सत्ता मिळवली. या निकालात चव्हाण-उंडाळकर गटाचा करिष्मा मात्र दिसून आला नाही. कृष्णा कारखान्याच्या बेल्टमध्ये भोसले यांच्या गटाने मुसंडी मारली. भोसले गटाकडे शेरे, शिंदेवाडी-विंग, कार्वे, काले, गोळेश्वर, नांदगाव, वाठार, धोंडेवाडी, उत्तरमधील पाल या ग्रामपंचायती आल्या आहेत. भोसले गटाने अन्य गटांच्या मदतीने सत्ता मिळवली असली तरी ती कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. त्याचबरोबर भोसले गटाला कोरोनाच्या काळात कृष्णा हॉस्पिटलकडून झालेल्या मदतीचाही थोडाफार फायदा झाल्याचे दिसत आहे.

Gram Panchayat Results : राष्ट्रवादी-भाजप आघाडीने सेनेला केले चारीमुंड्या चित!  

तांबवे : जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर गटाची आघाडी दिसून येत आहे. तांबवे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, तेथे दोन्ही गटांच्या नेत्यांची सत्ता आली आहे. त्याचबरोबर बेलदरे, वस्ती साकुर्डीतही दोन्ही गटांची सत्ता आली आहे. साजुर, मौजे साकुर्डी ग्रामपंचायत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलची सत्ता आली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Political News Desai Undalkar Group Wins Tambwe Gram Panchayat Election