esakal | पोस्ट कोविड बालकांवर लक्ष ठेवा; 'मल्टी सिस्‍टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम' बळावण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

corona

शून्य ते १८ वयोगटातील बालकांच्या पालकांनी कोरोनानंतरही मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

मुलांवर लक्ष ठेवा; 'मल्टी सिस्‍टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम' बळावण्याची शक्यता

sakal_logo
By
प्रवीण जाधव - सकाळ वृत्तसेवा

सातारा: कोरोना संसर्गातून बाहेर पडलेल्या काही लहान मुलांना पोस्ट 'कोरोना मल्टी सिस्‍टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम' या आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे समोर येत आहे. वेळेवर निदान न झाल्यास हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे या आजाराच्या जागृतीसाठी जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्‍ज्ञांकडून जागृती केली जात आहे. त्यामुळे शून्य ते १८ वयोगटातील बालकांच्या पालकांनी कोरोनानंतरही मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

हेही वाचा: नवी मुंबई ते सातारा,जावळी प्रवासी भाडे ५०० ते ६०० रुपये; बसचालकांकडून लूट

एमआयएसपीचा धोका

कोरोना संसर्गामध्ये जिल्ह्यात लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा झाली. परंतु, फार कमी मुलांची प्रकृती गंभीर अवस्थेकडे गेली. त्यांनाही वाचविण्यात जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. आत्तापर्यंत कोरोनामुळे केवळ एका बालकाचाच मृत्यू झाला. त्यावरून ते स्पष्ट होत आहे. कोरोनातून बालके बरी होत आहेत. परंतु, काहींना कोरोनानंतर १५ दिवसांनी वेगळ्या आजाराने ग्रासले जात असल्याचे समोर येत आहे. मल्टी सिस्‍टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (एमआयएसपी) असे त्या आजाराला संबोधले जात आहे. या आजारावर वेळीच उपचार न केल्यास मुलांची प्रकृती गंभीर होऊ शकते. असे काही प्रकार जिल्ह्यात समोर आले आहेत. जिल्हा रुग्णालय तसेच कृष्णा हॉस्पिटल तसेच काही खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही या आजारातील बालकांना उपचार करून बरे केले आहे.

हेही वाचा: सातारा जिल्ह्यात 111 कामांसाठी 8.33 कोटी निधी मंजूर

...अशी आहेत लक्षणे

कोरोनानंतर मुलांमध्ये हा आजार आढळतो आहे. अंगावर रॅश उठणे, सूज येणे, तोंडात लाल चट्टे उठणे, डोळे लाल होणे त्याचबरोबर काही मुलांना एकदम रक्तदाब कमी होण्याचे प्रकारही या आजारात आढळतात. लहान मुलांना बीसीजीची लस दिल्यानंतर त्यामध्ये पू होण्याचे लक्षणही या आजारात आढळत आहे. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी तातडीने नजीकच्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका किंवा अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

हेही वाचा: सातारा: जनावरं चारण्‍यास मनाई केल्याने वनमजुरास मारहाण

खर्चिक उपचार

या आजारावरील उपचारामध्ये अन्य औषधांबरोबर एका इंजेक्शनचा वापर अत्यंत महत्त्‍वाचा आहे. या इंजेक्शनच्या पाच ग्रॅम औषधाची किंमत १५ ते १८ हजारांच्या दरम्यान आहे. मुलांना हे इंजेक्शन वजनाच्या प्रमाणात एका किलोसाठी दोन ग्रॅमप्रमाणे द्यावे लागते. त्यामुळे दहा किलो वजनाच्या मुलाला सुमारे ६० हजार रुपयांचा खर्च या इंजेक्शनवर करावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी खासगी रुग्णालयात या आजारावरील उपचार खर्चिक ठरू शकतो.

जिल्हा रुग्णालयात उपचार

आजारावरील उपचार खर्चिक असला तरी, शासनाने याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्हा रुग्णालयात या रुग्णांवर मोफत उपचार होतात. अशा प्रकारे सहा मुलांना जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशस्वी उपचार करून बरे केले आहे. त्यासाठी त्याची लागणारी इंजेक्शन्सही जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्येही यावर उपचार होतात.

हेही वाचा: सातारा : दक्षिण तांबवेत सात वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

लक्षणांबाबत प्रशिक्षण

वेळेत निदान झाल्यास या आजारावर घरच्या घरीही उपचार होतात. त्यामुळे या आजाराची लक्षणे समजावून देणाऱ्या कार्यशाळा जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागातील तज्‍ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे घेण्यात येत आहेत. त्यात आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आशा तसेच अंगणवाडी सेविकांनाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे काही मुलांचे लवकर निदान होण्यासही मदत झाली आहे.

घाबरू नका, पण काळजी घ्या

या आजारामध्ये बालक गंभीर स्थितीत जावू शकते. जिल्हा रुग्णालयात आम्ही अशा बालकांवर यशस्वी उपचार करून बरेही केले आहे. परंतु, लवकर निदान झाल्यामुळे पाच ते सहा बालकांना घरच्या घरी उपचार देऊनही बरे करण्यात आम्हाला यश आले आहे. त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता कोरेानानंतर पालकांनी मुलांवर लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्‍ज्ञ डॉ. अरुंधती कदम यांनी केले आहे.

loading image
go to top