esakal | एसटी कर्मचाऱ्यांचा जुलैचा पगार जमा; शासनाकडून 500 कोटींचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी कर्मचाऱ्यांचा जुलैचा पगार जमा; शासनाकडून 500 कोटींचा निधी

येत्या महिन्यातील गौरी-गणपतीचा सण असल्याने ऑगस्ट महिन्याचे वेतनही मिळावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा जुलैचा पगार जमा; शासनाकडून 500 कोटींचा निधी

sakal_logo
By
साहेबराव होळ

गोडोली (सातारा): कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून एसटीचा व्यवहार तोट्याचा आहे. गेले दोन महिने कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने शासनाने वेतन व इतर बाबींसाठी ५०० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. त्यातील नऊ कोटी रुपये सातारा विभागाला जुलैच्या पगारासाठी मिळाले आहेत. मात्र, येत्या महिन्यातील गौरी-गणपतीचा सण असल्याने ऑगस्ट महिन्याचे वेतनही मिळावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

हेही वाचा: कडक सॅल्यूट! गोडोली तलावात बुडणाऱ्या महिलेचे साताऱ्यातल्या जांबाज पोलिसांनी वाचवले प्राण

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे पूर्ण टाळेबंदी, अंशतः टाळेबंदीत फक्त लांब पल्ल्याच्या गाड्या चालवणे, कोरोनासाठी व अन्य आपत्तीच्या कामासाठी एसटी बस चालू ठेवल्या. तरीही महामंडळाला नियमित मिळणारे उत्पन्न कमालीचे घटले. परिणामी, सर्वच कर्मचाऱ्यांचे वेतन थकत गेले. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षासाठी १,४५० कोटी रुपयांची तरतूद केली. यापूर्वी दिलेले ८३८ कोटी रुपये वगळता उर्वरित ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला द्यावेत, असा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला. त्यानंतर प्रत्येक आगाराला जुलै महिन्याचा पगार व इतर बाबींसाठी हा निधी वितरित करण्यात आला.

हेही वाचा: सातारा : गोडोली, जिहे, चंदननगर कोडोलीसह 'या' तालुक्यांत काेराेनाचे रुग्ण आढळले

सातारा विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या वाई, कोरेगाव, दहिवडी, वडूज, फलटण, कऱ्हाड, खंडाळा, पाटण, महाबळेश्वर व मेढा अशा आगारांतील १,४९९ चालक, १,२८८ वाहक, २०८ तांत्रिक कर्मचारी, १९७ कार्यालयीन कर्मचारी, पाच भरारी पथके या सर्वांच्‍या पगारासाठी नऊ कोटी रुपये मिळाल्याने थकीत एका महिन्याचा पगार अदा करण्यात आला. मात्र, ऑगस्ट महिन्याचा पगार मिळालेला नाही. याच महिन्यात गौरी-गणपतीसारख्या अधिक खर्चाचा महिना असल्याने शासनाने ऑगस्टच्या पगारासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सर्वच कर्मचाऱ्यांची मागणी आहे. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध उपाययोजना केल्याशिवाय आर्थिक घडी बसणे अडचणीचे होणार असल्याने त्या बाबींवरही संबंधितांनी विचार करावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

हेही वाचा: सातारा : शेतमालावर चोरट्यांचा डल्ला !

- चालू आर्थिक वर्षात १,४५० कोटींची आर्थिक तरतूद

- जुलैच्या पगारासाठी व इतर बाबींसाठी शासनाकडून महामंडळाला ५०० कोटी

- सातारा आगाराला नऊ कोटी, त्यातून ३,१८८ कर्मचाऱ्यांना वेतन अदा

- ऑगस्टचा पगार गौरी-गणपती सणापूर्वी मिळावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी

- उत्पन्नवाढीसाठी टोलमाफी व प्रवासी कर कमी करणे महत्त्‍वाचे

loading image
go to top