
नागरिकांनाे! कुटुंबाच्या सुरक्षेसाठी वेळीच कोरोना चाचणी करा
सातारा : बेड उपलब्ध नाहीत... आवश्यक तेवढे रेमडेसिव्हर मिळत नाही... व्हेंटिलेटरअभावी मृत्यूकडे डोळे लावू बसायला लागत आहेत... खासगी रुग्णालयात लाखो रुपयांची बिले भरावी लागतात... ही परिस्थिती बदलली जाऊ शकते. त्यासाठी केवळ गरज आहे ती नागरिकांच्या सतर्कतेची. आपण व आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने निदान हाच एकमेव उपाय आहे. लवकर निदान झाल्यास घरात राहूनही किरकोळ औषधांवर कोरोनामुक्त होता येते. त्यामुळे कुटुंबात कोणालाही आजाराची कोणतीही थोडी जरी लक्षणे आढळल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घेणे ही प्रत्येक कुटुंबप्रमुखाची जबाबदारी आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांबरोबरच कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. दररोज दीड हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडत आहे. रुग्णांना सोबत घेऊन नातेवाईकांना रुग्णालयांबाहेर प्रतीक्षा करत थांबावे लागत आहे. दाखल असलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर बेडची गरज असतानाही तो मिळत नाही. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मात्र, हे प्रमाण वाढण्याला एकच कारण आहे ते म्हणजे कोरोनाची बाधा झाल्याचे उशिरा लक्षात येणे, वेळेत कोरोनाचे उपचार सुरू न होणे. जिल्ह्यात कोरोनाची बिकट झालेली परिस्थिती बदलणे केवळ आणि केवळ नागरिकांच्याच हातात आहे. पहिल्यांदा कोरोनाबाबतची भीती प्रत्येकाने मनातून काढून टाकणे आवश्यक आहे. कोरोना बरा होणारा आजार आहे, ही वस्तुस्थिती स्वीकारली की पुढचे निर्णय सोपे होतात. लवकर निदान झाल्यास कोरोना बरा होणारा व साधा आजार आहे, हे आजवर घरच्या घरी उपचार घेऊन बऱ्या झालेल्या नागरिकांच्या संख्येतून स्पष्ट झाले आहे; परंतु निदानाला उशीर झाला, की तो तितकाच गंभीर व जीवघेणा आजार ठरू शकतो, हे रुग्णालयातील बेडची कमतरता व जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू होणारे आकडे ओरडून सांगत आहेत; परंतु दररोज येणारे कोरोना बाधितांचे आकडे, त्यांच्या सिटी स्कॅनच्या अहवालानुसार अनेक नागरिकांचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे समोर येत आहे.
या परिस्थितीची जाणीव असल्यानेच जिल्हाधिकारी हे वारंवार तातडीने निदान होण्यासाठी चाचणी करण्याचे आवाहन करत आहे. ग्रामसमिती, ग्रामसेवक, सरपंच, आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून प्रचाराचा प्रयत्न होत आहे; परंतु त्याचाही परिणाम नागरिकांनी स्वत:वर होऊ दिला नसल्याचे सध्याची परिस्थिती सांगत आहे. आता त्यात तातडीने बदल करण्याची परिस्थिती आली आहे. कोरोनाच्या नव्या स्टेनमध्ये फुफ्फुसाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आजाराची कोणतीही लक्षणे असल्यास तातडीने कोरोना चाचणी करणे अत्यावश्यक बनले आहे. मुळात कोरोना चाचणी ही शासकीय ठिकाणी मोफत केली जाते. ती केल्याने कोणताही त्रास होत नाही. टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर तातडीने औषध सुरू करता येते. नेहमीच्या उपचारांवर अवलंबून बरे होता येते. त्यामुळे प्रत्येक कुटुंब प्रमुखाने आपल्या कुटुंबाच्या शारीरिक व आर्थिक सुरक्षिततेसाठी तातडीने टेस्ट करण्याचा आग्रह धरलाच पाहिजे.
वाह, क्या बात है! जावळीत होणार ऑक्सिजन प्लांट, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार
कोरोनाचे निदान लवकर झाल्यास हॉस्पिटलमध्येही न जाता गृह विलगीकरणात किरकोळ औषधांतून बरे होता येते. त्यामुळे लक्षणे दिसताच प्रत्येकाने तातडीने कोरोनाची चाचणी करून घ्यावी.
- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
Web Title: Test Early Detect Covid19 Satara Trending
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..