भारतात व्हॉट्सअप, फेसबुक अडचणीत; बंदी घालण्याची व्यापाऱ्यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

सीएआयटीच्या म्हणण्यानुसार, नव्या प्रायव्हसी पॉलिसीनंतर सर्व प्रकारचा वैयक्तिक डेटा, पैसे दिल्याचे व्यवहार, कॉन्टॅक्ट नंबर, लोकेशन्स आणि अतिशय महत्त्वाची गोपनीय माहिती, व्हॉट्सअपच्या हाती लागणार आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत व्हॉट्स अप (Whatsapp) आणि फेसबुक (Facebook) यांच्या प्रायव्हसी पॉलिसीवर (Privacy Policy) प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळं, दोन्ही सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मला मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. विशेषतः भारतात दोन्हीच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे.  व्हॉट्स अप आणि फेसबुकवर बंदी घालण्यात यावी, अशी स्वरूपाची मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे, देशातील व्यापाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

आणखी वाचा - प्रजासत्ताकदिनी पाहुणा मिळाला; भारतीय वंशाच्या व्यक्तीला संधी

देशातील व्यापाऱ्यांची अग्रणी संस्था असलेल्या दी कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) या संस्थेने व्हॉट्स अप आणि फेसबुकवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या संदर्भात सीएआयटीने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांना मागणीचे पत्र दिले आहे. व्हॉट्स अपला नव्या प्रायव्हसी पॉलिसी लागू करण्यापासून रोखावे किंवा व्हॉट्स अप आणि त्यांची मूळ कंपनी फेसबुकवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी पत्राद्वारे केली आहे. सीएआयटीच्या म्हणण्यानुसार, नव्या प्रायव्हसी पॉलिसीनंतर सर्व प्रकारचा वैयक्तिक डेटा, पैसे दिल्याचे व्यवहार, कॉन्टॅक्ट नंबर, लोकेशन्स आणि अतिशय महत्त्वाची गोपनीय माहिती, व्हॉट्सअपच्या हाती लागणार आहे. त्या माहितीचा कंपनी भविष्यात कोणत्याही कारणासाठी कधीही वापर करू शकते. त्यामुळे व्हॉट्स अपच्या नव्या पॉलिसीला रोखावे किंवा दोन्ही कंपन्यांवर थेट बंदी घालण्यात यावी, असे सीएआयटीने म्हटले आहे.सीएआयटीच्या म्हणण्यानुसार, भारतात 20 कोटीहून अधिक व्हॉट्स अप यूजर्स आहेत. यातल्या प्रत्येकाचा पर्सनल डेटा अतिशय महत्त्वाचा आहे. जर, त्या डेटाचा गैरवापर झाला तर, केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नाही तर, सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.

आणखी वाचा - सरकारी 'कागज'चा अनुभव घ्या, सिनेमातून

व्हॉट्स अपने केला खुलासा
या संदर्भात व्हॉट्स अपने केला खुलासा केला असून, पीटीआय वृत्तसंस्थेकडे ई-मेलद्वारे आपली बाजू मांडली आहे. त्यात म्हटले आहे की, भविष्यातील पारदर्शकता जपण्यासाठीच आम्ही प्रायवसी पॉलिसीमध्ये सुधारणा करत आहोत. यापुढे तुम्हाला, तुमच्या व्हॉट्स अपद्वारे संवाद साधण्यासाठी आमची मुख्य कंपनी फेसबुककडून सुरक्षित होस्टिंग सर्विस निवडणे शक्य होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cait demands to ban whatsapp and facebook in india