
SAR Value Code : मोबाईल आरोग्यासाठी घातक आहे हे कसं मोजाल?
शंभरातच एखादा व्यक्ती असतो जो हँडसेटची SAR व्हॅल्यू तपासतो. पण काही जणांना तर SAR व्हॅल्यू म्हणजे काय हे देखील माहीत नसतं. या लेखातून SAR व्हॅल्यूची माहिती जाणून घ्या, आणि दिवसरात्र तुमच्या खिशात असणारा फोन तुमच्यासाठी किती घातक आहे याची माहिती घ्या.
तर बरेच जण स्मार्टफोन खरेदी करताना फोनमध्ये कोणता प्रोसेसर आहे, रॅम किती आहे, कॅमेऱ्याचं स्पेसिफिकेशन काय आहे हे बघतात. ते तर जाऊ द्या पण बॅटरीपासून ते डिस्प्लेपर्यंत आपण नाना तऱ्हेचे ऑप्शन्स तपासतो. पण यात आपल्या आरोग्याशी संबंधित एक गोष्ट असते ती मात्र आपण कधीही बघत नाही.
आपणच काय तर मोबाईल कंपन्या सुद्धा यावर बोलताना दिसत नाहीत. मोबाईलमुळे आरोग्याच्या होणाऱ्या नुकसानाचे विविध रिपोर्ट्स तुम्ही वाचले असतील.काही रिपोर्ट्समध्ये मोबाईल फोनमुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला आमंत्रण मिळतं असंही म्हटलंय.
या रिपोर्ट्सला आधार असणारा एक मुद्दा म्हणजे SAR व्हॅल्यू. या व्हॅल्यू म्हणजे फोनमधून बाहेर पडणारे रेडिएशन. SAR हे रेडिओ फ्रिक्वेंसी मोजण्याचं एकक आहे. या रेडिओ फ्रिक्वेन्सी आपल्या शरीरावर गंभीर परिणाम करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर फोन वापरताना आपले शरीर किती रेडिओ फ्रिक्वेन्सी शोषून घेते हे SAR व्हॅल्यूमध्ये मोजले जाते. ग्राहक म्हणून फोन विकत घेताना स्पेसिफिकेशन्स तपासणे ही चांगली गोष्ट आहे, पण SAR व्हॅल्यूचीही काळजी घेतली पाहिजे.
मोबाइल फोनच्या कंपन्या या मुद्द्यावर क्वचितच चर्चा करतात, कारण त्याचा त्यांच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो. कमी किंमतीत तुम्हाला जर चांगले स्पेसिफिकेशन मिळत असतील तर मोबाईल कंपन्या SAR व्हॅल्यूवर का चर्चा करतील?
आता तुम्ही काय कराल?
तर नवा मोबाइल फोन घेताना SAR व्हॅल्यू चेक कराल. प्रत्येक मोबाईल फोनसाठी एक विशिष्ट SAR व्हॅल्यू निश्चित केलेली असते. भारतात दूरसंचार विभागाने मोबाइल फोनसाठी 1.6W/Kg (1 ग्रॅम टिश्यूवर) एवढी SAR व्हॅल्यू निश्चित केलेली आहे.
SAR व्हॅल्यू चेक कशी कराल?
तर फोनची SAR व्हॅल्यू तपासण्याचे अनेक मार्ग आहेत. पहिल्यांदा फोनचे युजर मॅन्युअल चेक करा. काही कंपन्या फोनचे फीचर्स त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर टाकतात. तिथंच SAR व्हॅल्यूचाही उल्लेख करतात. पण तुम्ही हे मॅन्युअल म्हणजे तुमचं तुम्ही ही चेक करू शकता. त्यासाठी तुमच्या फोनच्या डायर पॅडवर जायचं आणि तिथे *#07# टाइप करायचं.
हा कोड टाकल्यानंतर, SAR व्हॅल्यूचा तपशील तुमच्या स्क्रीनवर दिसेल. इथं तुम्हाला दोन प्रकारच्या व्हॅल्यू दिसतील. एक शरीरासाठी आणि दुसरा डोक्यासाठी. तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या डोक्याची SAR व्हॅल्यू जास्त असेल. म्हणूनच बरेच लोक कॉलसाठी एअरफोन्स वापरतात.