वडिलांनी साठवलेले 16 लाख रुपये मुलाने PUB-G वर उडवले, खातं रिकामं झाल्यावरच घरी समजलं

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

एका विद्यार्थ्यांनं पबजीच्या नादात वडिलांच्या खात्यातून 16 लाख रुपये उडवल्याचं समोर आलं आहे. ऑनलाइन गेम पबजी खेळता खेळता 17 वर्षांच्या विद्यार्थ्याने वडिलांचे बँक खातेच रिकामे केले. 

चंदीगड - पबजी गेमचा नाद करणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ गेल्या काही काळात समोर आले होते. या गेमच्या नादापायी अनेकांना वेड लागण्याची वेळ आल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. दरम्यान, एका विद्यार्थ्यांनं पबजीच्या नादात वडिलांच्या खात्यातून 16 लाख रुपये उडवल्याचं समोर आलं आहे. ऑनलाइन गेम पबजी खेळता खेळता 17 वर्षांच्या विद्यार्थ्याने वडिलांचे बँक खातेच रिकामे केले. विद्यार्थ्याकडे तीन बँकांच्या खात्याचे अॅक्सेस होते. या खात्यांचा वापर करून पबजी मोबाईल गेममध्ये विद्यार्थी पैसे खर्च करत होता. 

ट्रिब्यून इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुलाच्या वडिलांनी हे पैसे वैद्यकीय गरजेसाठी घेण्यासाठी ठेवले होते. मुलाने मात्र तेच पैसे पबजी गेमच्या खात्याला अपग्रेड कऱण्यासाठी खर्च केले. रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, मुलाने त्याच्या मित्रांच्या पबजी अकाउंटला अपग्रेड करण्यासाठीदेखील पैसे खर्च केले. बँक स्टेटमेंटमधून या पैसे कुठे खर्च केले याची माहिती मिळाली. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा याबाबत त्यांना माहिती मिळाली तोपर्यंत मुलाने 16 लाख रुपये खर्च केले होते. मुलाने वडिलांना सांगितले की, अभ्यासासाठी मोबाईल उशिरापर्यंत वापरत आहे. मात्र त्याऐवजी तो तासन् तास पबजी खेळण्यामध्ये बिझी असायचा.

हे वाचा - बंदी न घातलेल्या PubG आणि Zoom अ‍ॅपचे आहे चीनशी कनेक्शन

विद्यार्थ्याचे वडील सरकारी कर्मचारी आहे. त्याच्या वडिलांनी सांगितले की, ते नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतात. त्यांचा मुलगा आईसोबत गावी राहतो. मुलाने सगळे ट्रान्झॅक्शन आईच्या फोनवरूनच केले होते. आईचा फोन घेऊन तो पबजी मोबाईल गेम खेळत बसायचा. बँक ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आईच्या फोनवरून ट्रान्झॅक्शनचे मेसेज डिलिट करत असे. वडिलांनी हे पैसे मुलाच्या भविष्यासाठी आणि मेडिकलच्या गरजांसाठी साठवले होते. 

हे वाचा - चिनी ऍपला पर्याय भारतीय अप्लिकेशन्स; रोपोसो, मित्रो आणि चिंगारीला पसंती

पबजी गेमचं व्यसन लागल्याची आणि त्यातून असे प्रकार घडल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी जानेवारीत उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात एका मुलाला पबजी खेळण्यापासून थांबवलं म्हणून त्याने आत्महत्या केली होती. मुलगा पबजी मोबाइल गेम खेळत असे. बराच वेळ त्या मोबाइलवर घालवण्याच्या त्याच्या सवयीला वैतागून आईने मोबाइलच फोडला. त्यानंतर नाराज झालेल्या मुलाने त्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: punjab boy spent 16 lakh rupee on pub g game from father account