
अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला भारतात परतले आहेत
अंतराळात काही दिवस घालवून ते गेल्या महिन्यात पृथ्वीवर परतले
आता पंतप्रधान मोदींनी शुभांशूची भेट घेऊन संवाद साधला आहे
भारताचे यशस्वी अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीतील सरकारी निवासस्थानी भेट घेतली. साडेआठ मिनिटांच्या या भेटीत त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) यशस्वी मोहिमेची माहिती पंतप्रधानांना दिली. पंतप्रधानांनी हसत विचारले, "तू मी सांगितलेला होमवर्क केलास का?" यावर शुभांशू हसले आणि म्हणाले, "प्रगती खूप चांगली आहे. लोक मला चिडवतात की पंतप्रधानच तुम्हाला गृहपाठ देतात!" या हलक्याफुलक्या संवादाने भेटीला अनौपचारिक रंग आला.
शुभांशू यांनी अंतराळातील प्रयोगांबद्दल सांगितले. त्यांनी टार्डिग्रेड्स, मायोजेनेसिस, मेथी-मूगाच्या बियांचे उगवण, सायनोबॅक्टेरिया आणि सूक्ष्म शैवालांवर अभ्यास केले. या प्रयोगांचे परिणाम गगनयान मोहिमेसाठी उपयुक्त ठरतील असे त्यांनी ठामपणे सांगितले. पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना चालण्यास वेळ लागला असे सांगताना त्यांनी ISS वर पोहोचतानाचा अनुभवही शेअर केला. "लोकांना माझा आधार द्यावा लागला," असे ते हसत म्हणाले.