Study Room|Current Affairs: सकाळ डायरी चालू घडामोडी

MPSC, UPSC - नोव्हेंबर २०२६ मधील भारत आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी जाणून घ्या. पुणे मेट्रो, जीएसटी संकलन, इस्रो, नौदल आणि सरकारी निर्णयांची माहिती
Current affairs 2026

Current affairs 2026

Esakal

Updated on: 

ईव्ही आणि बॅटरी उद्योगासाठी देशांतर्गत खनिज प्रक्रिया प्रकल्पांना प्रोत्साहन

1. केंद्रीय मंत्रिमंडळाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी २,८१४ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली.

2. ही योजना २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीत राबवली जाईल.

3. या योजनेअंतर्गत लिथियम प्रक्रिया करण्याचे दोन आणि निकेल प्रक्रिया करण्याचे दोन प्रकल्प उभारले जातील.

4. या प्रकल्पांसाठी पात्र ठरणाऱ्या गुंतवणुकीवर ३० टक्के भांडवली अनुदान दिले जाईल.

5. इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही), बॅटरी, संरक्षण क्षेत्र आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या खनिजांचा देशांतर्गत पुरवठा वाढवण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे.

इस्रोच्या ‘एनव्हीएस-०३’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जीएसएलव्ही-एफ१८ या प्रक्षेपकाच्या मदतीने एनव्हीएस-०३ उपग्रहाचे प्रक्षेपण केले.

2. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून रात्री ११ वाजून ५१ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले.

3. जीएसएलव्ही-एफ१८ हे जिओसिंक्रोनस लाँच व्हेईकल (जीएसएलव्ही) या प्रक्षेपकाचे विसावे उड्डाण होते.

4. एनव्हीएस-०३ हा नव्या पिढीतील पाच नौवहन उपग्रहांच्या मालिकेतील तिसरा उपग्रह आहे.

5. या उपग्रहाचे प्रक्षेपणावेळचे वजन २,२५० किलोग्रॅम होते.

6. एनव्हीएस-०३ मध्ये एल१, एल५ आणि एस या तीन पट्ट्यांमध्ये कार्य करणारी नौवहन यंत्रणा बसवण्यात आली आहे.

7. या उपग्रहामध्ये स्वदेशी बनावटीचे अणुघड्याळ वापरण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या ‘नॅव्हिक’ (एनएव्हीआयसी) या प्रादेशिक नौवहन प्रणालीची अचूकता वाढण्यास मदत होणार आहे.

भारतीय नौदलासाठी आठ नव्या युद्धनौकांची बांधणी

1. संरक्षण मंत्रालयाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी ५३,८६६.५० कोटी रुपयांचे युद्धनौका बांधणीसंदर्भातील करार केले.

2. या करारानुसार गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई) पाच, तर गोवा शिपयार्ड लिमिटेड तीन अशा एकूण आठ युद्धनौका बांधणार आहे.

3. भारतीय नौदलाने स्वतः संकल्पना तयार केलेला हा पहिलाच प्रकल्प आहे.

4. या प्रकल्पामुळे पुढील दहा वर्षांत ५३२ लाख दिवसांचा रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

ऑक्टोबर २०२६ मध्ये जीएसटी संकलनात मोठी वाढ

1. ऑक्टोबर २०२६ मध्ये देशातील एकूण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन २.३१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

2. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत जीएसटी संकलनात २२.९ टक्के वाढ नोंदवण्यात आली.

3. देशाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची दुसरी सर्वाधिक मासिक जीएसटी वसुली ठरली.

4. आयातीवरील जीएसटी महसुलात ४२.२ टक्के वाढ झाली.

5. कर परतावा वजा केल्यानंतर देशाचे निव्वळ जीएसटी संकलन २.०३ लाख कोटी रुपये झाले.

6. राज्यांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ३५,१५० कोटी रुपयांचे जीएसटी संकलन केले.

सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय

अ) अटकेनंतर २४ तासांत न्यायालयासमोर हजर करणे

1. न्यायमूर्ती भुयान आणि चंदुरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, २४ तासांची मुदत प्रत्यक्ष ताब्यात घेतल्यापासून सुरू होते, औपचारिक अटकेपासून नाही.

2. तपास किंवा झडतीसाठी घेतलेला वेळही या मुदतीत मोजला जाईल. न्यायदंडाधिकाऱ्यांनी ताब्याची तारीख व वेळ नोंदवणे बंधनकारक आहे.

3. २४ तासांत न्यायालयासमोर हजर न केल्यास आरोपीला सुटकेचा अधिकार मिळू शकतो. हा निर्णय ‘सुजित दास विरुद्ध भारत सरकार’ प्रकरणात देण्यात आला.

ब) निवडणूक आयुक्तांच्या कायदेशीर संरक्षणाला आव्हान

1. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या कायदेशीर संरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला नोटीस बजावली.

2. दोघांनाही चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

क) ओबीसी क्रिमी लेअर निश्चिती

1. ओबीसी क्रिमी लेअर ठरवताना पालकांचे उत्पन्न, पदस्तर आणि सेवास्थिती विचारात घ्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

2. या संदर्भात केंद्र सरकारने मागितलेली दोन वर्षांची मुदतवाढ न्यायालयाने नाकारली.

पुणेकरांचा प्रवास होणार अधिक वेगवान, मेट्रोच्या नव्या मार्गांना हिरवा कंदील

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे मेट्रोच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले.

2. या प्रकल्पांचे एकूण मूल्य सुमारे २१,८०० कोटी रुपये आहे.

3. पुणे मेट्रोच्या पिंक लाईनच्या उभारणीसाठी ८,३०० कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे.

4. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची अंदाजित किंमत सुमारे १३,५०० कोटी रुपये आहे.

5. या टप्प्यातील २अ आणि २ब या दोन मार्गिकांची एकूण लांबी १२.७५ किलोमीटर आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह निर्वाह भत्त्यात वाढ

1. राज्य मंत्रिमंडळाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील निर्वाह भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी दिली.

2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

3. विभागीय स्तरावरील वसतिगृहांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दरमहा १,५०० रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे.

4. जिल्हास्तरीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना दरमहा १,३०० रुपये भत्ता दिला जाणार आहे.

5. यापूर्वी विभागीय आणि जिल्हास्तरीय अशा दोन्ही प्रकारच्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना दरमहा ६०० रुपये भत्ता मिळत होता.

Current affairs 2026
StudyRoom|Neocloud companies: AI कंपन्यांचा फुगा फुटणार? मस्क यांच्या विधानापलीकडे जागतिक अहवाल काय सांगतात?

वाहनचालकांना दिलासा, थकीत ई-चलानवर मिळणार २० टक्क्यांपर्यंत सवलत

1. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी वाहतूक चलान अभय योजनेला मंजुरी दिली.

2. प्रलंबित पात्र ई-चलान दंडावर एकदाच २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.

3. २०१९ पासून राज्यात ‘एक राज्य, एक ई-चलान’ अंतर्गत ५,७२४ कोटी रुपयांचा दंड थकीत आहे.

4. २१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२६ मधील पात्र चलानांचा दंड ३० दिवसांत भरल्यास २० टक्के सवलत मिळेल.

5. १ नोव्हेंबर २०२६ नंतरच्या चलानांसाठी ४५ दिवसांची मुदत असेल. न्यायालयीन वसुलीतील पात्र चलानांनाही ३० दिवसांत दंड भरल्यास सवलत मिळेल.

नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र उभारण्यास मंजुरी

1. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नागपूरमधील दाभा येथे आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र उभारण्यास मंजुरी दिली.

2. हे केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूर कृषी महाविद्यालयाच्या जागेवर उभारण्यात येणार आहे.

3. या प्रकल्पासाठी अतिरिक्त निधी म्हणून ६४४.६३ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

4. या अतिरिक्त निधीमुळे प्रकल्पाचा एकूण खर्च ८७९.६३ कोटी रुपये होणार आहे.

5. या केंद्राच्या माध्यमातून कृषी संशोधन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी प्रदर्शने आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना दिली जाणार आहे.

Current affairs 2026
Studyroom|अमेरिकेतील मध्यवर्ती निवडणुकांच्या निकालाने भारतातली गणितं बदलतील?

वर्ध्यात मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कची उभारणी

1. वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथे मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीचे भूमिपूजन करण्यात आले.

2. हा प्रकल्प सुमारे १५० एकर क्षेत्रावर विकसित केला जाणार आहे.

3. रेल्वे, रस्ते आणि मालवाहतुकीच्या विविध साधनांचे एकाच ठिकाणी एकत्रीकरण करणे हा या पार्कचा मुख्य उद्देश आहे.

4. या प्रकल्पामुळे विदर्भातील निर्यातीला चालना मिळेल, मालवाहतुकीचा खर्च कमी होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

जहाजबांधणी ते बंदरांचे आधुनिकीकरण, मुंबईत जागतिक सागरी परिषदेचे आयोजन

1. मुंबईतील गोरेगाव येथे २ ते ४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान चौथी ‘मेरिटाइम इंडिया कॉन्फरन्स अँड एक्स्पो’ पार पडली.

2. बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने केले.

3. बंदरांचे आधुनिकीकरण, जहाजबांधणी, पर्यावरणपूरक जहाजे आणि मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी या विषयांवर चर्चा झाली.

4. कार्यक्रमात १० हजारांहून अधिक व्यावसायिक आणि १० हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

5. महाराष्ट्र सरकारने सागरी गुंतवणुकीसाठी एक खिडकी मंजुरी व्यवस्था आणि नवीन सागरी विकास धोरण जाहीर केले.

------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...