विकास दुबेमुळे उज्जैनचं मंदिर चर्चेत, मराठ्यांनी केला होता जिर्णोद्धार

सूरज यादव
Friday, 10 July 2020

दिल्लीच्या गादीचा संस्थापक इल्तुत्मिशने मंदिरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केलं होतं. पण मराठ्यांनी उज्जैन ताब्यात घेताच मंदिराचा जिर्णोद्धार केल्यानंतर ज्योतिर्लिंगाची पुर्नप्रतिष्ठापना केली होती.

नवी दिल्ली - कानपूरचा गँगस्टर आणि एका डीएसपीसह 8 पोलिसांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विकास दुबेला उज्जैनमधून अटक करण्यात आली. अटक करण्याआधी तो महाकाल मंदिरात पूजा करण्यासाठी पोहोचला होता. तिथून पोलिसांनी विकास दुबेला ताब्यात घेतलं. उज्जैनचं महाकाल मंदिर हे देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर प्राचीन असं आहे. हिंदू धर्मात सर्वाधिक मान्यता असेलल्या मंदिरांमध्ये याचा समावेश होतो. 

पुराण, महाभारतातही महाकाल मंदिराचा उल्लेख आढळतो. महाकवी कालिदास यांच्या काव्यरचनांमधूनही या मंदिराचं वर्णन मिळतं. दक्षिण मुखी असलेल्या या मंदिराचे दर्शन केल्याने पुण्य मिळतं अशी भक्तांची भावना आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनवुसार महाकाल मंदिरात शिवलिंगाच्या दर्शानाने मोक्ष मिळतो असंही म्हटलं जातं. 

हे वाचा - गँगस्टर विकास दुबे आणि उज्जैनचे महाकाल मंदिर; काय आहे कनेक्शन?

परकिय आक्रमणांमध्ये या मंदिराची मोठी हानी झाली आहे. 1235 मध्ये इल्तुत्मिशने मंदिर उद्ध्वस्त केलं होतं. इल्तुत्मिश हा दिल्लीच्या गादीचा संस्थापक होता. त्यानंतर उज्जैनमधील राजांनी याचा जिर्णोद्धार केला. त्यानंतर सध्या असलेलं मंदिर उभा राहिलं. दरवर्षी सिंहस्थ मेळ्याच्या आधी मंदिराची सजावट केली जाते. मराठ्यांनी 29 नोव्हेंबर 1728 मध्ये या भागावर ताबा मिळवला होता. यानंतर उज्जैनचा सुद्धा कायापालट झाला. महाकालेश्वर मंदिराचे पुन्हा बांधकाम झालं आणि त्यामध्ये ज्योतिर्लिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली. 

हे वाचा - पॉल बनून महाकाल मंदिरात पोहोचला होता विकास दुबे

मंदिराच्या गर्भगृहात जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. त्याच्या वरच्या बाजुला एक दुसरा गाभारा असून त्यामध्ये ओंकारेश्वर शिवलिंग आहे. मंदिराचे क्षेत्रफळ 10.77 x 10.77 वर्गमीटर रुंद आणि 28.71 मीटर उंच इतकं आहे. इल्तुत्मिशने जेव्हा मंदिर उद्ध्वस्त केलं तेव्हा शिवलिंग इथल्या कोटितीर्थमध्ये टाकलं होतं. त्याची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली होती. 

हे वाचा - अद्भुत! मंदिराच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच ऐकू येतो ध्वनी

मंदिराला एकूण 118 कळस आहेत. या कळसांवर सोन्याचा मुलामा देण्यात आला असून यासाठी 16 किलो सोनं वापरण्यात आलं आहे. सध्याच्या दरानुसार या सोन्याची किंमत जवळपास 8 कोटींच्या घरात जाते. मंदिराची व्यवस्था एक प्रशासकिय समिती करते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ujjain mahakal temple which rebuilt by maratha