२२६ कोटींचा पाणीपुरवठा आराखडा लालफितीत; अमृत योजनेचा निधी संपला

water shortage.jpg
water shortage.jpg

नाशिक : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मान्यता मिळालेल्या २२६ कोटींचा पाणीपुरवठा आराखडा अमृत योजनेचा निधी संपल्याने लालफितीत अडकला आहे. केंद्र किंवा राज्य शासनाची नवीन योजना जाहीर झाल्यानंतरच आराखड्याला चालना मिळणार आहे.

अमृत योजनेचा निधी संपला
 
शहरात नवनगरांची संख्या वाढत असल्याने त्या भागात पाणीपुरवठ्याची सोय करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने नवीन वसाहतींत जलवाहिन्या टाकण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृत योजनेंतर्गत निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याकरिता महापालिकेचा आराखडा सादर करण्याच्या सूचना २०१८ मध्ये देण्यात आल्या होत्या. पाणीपुरवठा विभागाने जुन्या जलवाहिन्या बदलणे, नववसाहतींत वाहिन्या टाकणे, जलकुंभांची निर्मिती, जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्यासाठी एक हजार २०० कोटींची गरज असल्याचे अहवालात नमूद केले होते. मात्र शासनाने ३२४ कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आराखडा सादर केला होता. 

नंतरच आराखडा मंजूर होईल

जीवन प्राधिकरणाच्या बैठकीत पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे वगळता ११८ कोटींचे सिव्हिल वर्कचे काम महापालिकेवर सोपविले होते. त्यानंतर २२६ कोटींचा आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मान्य केला. मंजूर आराखड्यात नवीन जलवाहिन्या टाकण्याबरोबरच जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतावाढीवर भर देण्यात आला आहे. पाणीपुरवठा विषयक कामे शासनाच्या अमृत योजनेतून केली जाणार होती. परंतु अमृत योजनेचा राज्याचा निधी संपुष्टात आल्याने महापालिकेचा पाणीपुरवठा आराखडा आता लटकला आहे. भविष्यात केंद्र किंवा राज्य शासनाची नवीन योजना आल्यानंतरच आराखडा मंजूर होईल. 

नवीन जलवाहिन्यांचे प्रकल्प रखडले 

कोरोनामुळे शासनाच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे योजनांवरचा खर्च कमी केला जाणार आहे. त्याचा फटका पाणीपुरवठा आराखड्याला बसला आहे. आराखड्यात शहरात २६५ किलोमीटरच्या वाहिन्या टाकणे, जलकुंभाचे पाणी वितरण क्षेत्र निश्‍चित करून पाण्याच्या थेंब अन्‌ थेंबाचा हिशोब लावण्यासाठी बल्कमीटर व व्हॉल्व्ह बसविणे, बारा बंगला, पंचवटी जलशुद्धीकरण, शिवाजीनगर, गांधीनगर व नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेत वाढ करणे हे प्रकल्प रखडले आहेत. 

असे होते खर्चाचे नियोजन 

- नवनगरांमध्ये जलवाहिनी टाकण्यासाठी १०० कोटी रुपये 
- जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी ४२.८४ कोटी रुपये 
- जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी ५६.७९ कोटी रुपये- मीटर बसविण्यासाठी २५.४७ कोटी रुपये 

अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी निधी प्राप्त होणार होता. परंतु निधी संपल्याने योजना रखडली असली तरी नवीन योजनेत नाशिकचा प्रस्ताव वरच्या स्थानावर असल्याने तत्काळ मंजुरी मिळेल. - संदीप नलावडे, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com