ग्रामीण भागात ‘महाआवास’ अभियानातून घरकुल निर्मितीला गती द्या; विभागीय आयुक्तांचे अवाहन

radhakrishn game
radhakrishn game

नाशिक : राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून यावर्षी 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालवधीत शंभर दिवसीय ‘महा आवास अभियान- ग्रामीण’  अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण, शबरी आवास योजना अशा विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांनी येत्या शंभर दिवसात शंभर टक्के उद्दीष्ट पूर्ण करावे. ‘महा आवास’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण घरकुल निर्मितीला गती द्यावी आणि विभागाला प्रथम क्रमांकावर आणावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकाऱ्यांना केले. 

अभियानाच्या यशस्वीतेसाठी समन्वय आवश्यक

विभागीय आयुक्त गमे म्हणाले, केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेला पूरक ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ असून या अभियानातंर्गत विविध घरकुल योजनांमधून जास्तीत जास्त ग्रामीण भागात घरकुले बांधण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी महसूल विभाग आणि ग्राम विकास विभागाने समन्वय साधणे आवश्यक आहे. या अभियानातंर्गत गरजू, पात्र पंरतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतुन उपलब्ध करुन द्यावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फतही जागा उपलब्ध करुन घेता येईल.  ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूल करुन किंवा लाभार्थीकडून जागा उपलब्ध करुन घेता येवू शकते. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ बैठकिचे नियोजन करावे, अशी सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी अधिकाऱ्यांना केली.

‘महा आवास अभियाना- ग्रामीण’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर बैठका घेवून नियोजन करावे. घरकुलांच्या उद्दीष्टांप्रमाणे शंभर टक्के मंजूरी देणे, मंजूर घरकुलांना तात्काळ पहिल्या हप्त्याचे वितरण करावे. तसेच उद्दीष्टांनुसार घरकुलांचे काम भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनामंधील सन 2016-17 ते 2020-21 मधील सर्व घरकुलांना भौतिक प्रगतीनुसार सर्व हप्त्यांचे वितरण करुन सर्व घरकुले आर्थिकदृष्ट्या पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.                    

घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांशी समन्वय ठेवावा; त्यांच्याकडून कामे पूर्ण करुन कुशल गवंडी तयार करावे. तसेच लाभार्थ्यांना मार्गदर्शक ठरण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यास दिलेल्या उद्दीष्टाप्रमाणे पंचायत समिती निहाय सर्व ‘डेमो हाऊसेस’ काम पूर्ण करण्याची तसेच घरकुल बांधत असतांना शासकीय योजनांशी कृतीसंगम करुन लाभार्थ्यांना रोजगार हमी योजनेतून व स्वच्छ भारत मिशन –ग्रामीण मधून शौचालय बांधून देणे. जल जीवन मिशन मधून नळाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. प्रधानमंत्री उज्वला योजनेमधून गॅस जोडणी, सौभाग्य योजनेतून विद्युत जोडणी आणि राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानतून लाभार्थ्यास उपजिवेकेचे साधन उपलब्ध करुन द्यावे, असेही गमे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.

‘महा आवास अभियान-ग्रामीण’ अभियानाला गती देण्यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, ग्रामस्तरीय, ग्राम कृती गटाचे व लाभार्थी मेळावे आणि बँक मेळावे आयोजित करावे. तसेच या अभियानाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी उपायायोजना कराव्यात. विभागातील प्रत्येक जिल्ह्याने उत्कृष्ट काम करुन ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ अभियानातंर्गत मिळणाऱ्या पुरस्कारास पात्र ठरावे, असे सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी यावेळी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयात ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ अभियानाच्या विभागस्तरीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी विभागीय आयुक्त गमे बोलत होते. यावेळी यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक येथून जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जळगांव येथून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अहमदनगर येथून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, धुळे येथून जिल्हाधिकारी  संजय यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथ सी., नंदुरबार येथून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, विभागीय आयुक्त कार्यालयातून उपायुक्त अरविंद मोरे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीष सरोदे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, उपायुक्त डि. डी. शिंदे, सहायक आयुक्त प्रतिभा संगमनेरे, तहसिलदार महेश चौधरी आदी उपस्थित होते. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com