अमर रहे! आहेरगावच्या जवानाला साश्रुनयनांनी निरोप; ग्रामस्थांच्या अश्रूंचा बांध फुटला 

दीपक अहिरे
Saturday, 14 November 2020

अंत्यविधीप्रसंगी भावना व्यक्त करू न दिल्याने स्थानिक ग्रामस्थांनी, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पिंपळगाव बसवंत( जि.नाशिक) : आहेरगाव (ता. निफाड) येथील रहिवासी व सैन्यदलात पठाणकोट येथे कार्यरत असताना मृत्यू झालेले सुदर्शन दत्तात्रय देशमुख (वय ३२) यांना शुक्रवारी (ता. १३) हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. या वेळी ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. जवानाच्या निधनाने दिवाळी सण मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. 

ग्रामस्थांच्या अश्रूंचा बांध फुटला
सोमवारी (ता. ९) मध्यरात्रीच्या सुमारास सुदर्शन यांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांचे पार्थिव आहेरगाव येथे दाखल झाले. पार्थिव गावात येताच नातेवाइकांसह ग्रामस्थांच्या अश्रूंचा बांध फुटला. देशमुख यांच्या निवासस्थानी काही वेळी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर गावातून सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली.

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे

देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे येत होते. खासदार डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बनकर, तहसीलदार शरद घोरपडे, पोलिस निरीक्षक संजय महाजन यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर भाऊ समाधान याने मुखाग्नी दिला. विस्ताराधिकारी के. टी. गादड, मंडल अधिकारी शीतल कुयटे, प्रशासक स्वप्नाली कागदे, ग्रामसेवक भालचंद्र तरवारे, पोलिसपाटील ज्ञानेश्‍वर कोकाटे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. 

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर
 
ग्रामस्थांनी व्यक्त केला रोष 
अंत्यविधीप्रसंगी भावना व्यक्त करू न दिल्याने स्थानिक ग्रामस्थांनी, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. भास्कर महाराज रसाळ, केशव माळोदे, दत्तात्रय कडलग, जयवंत रसाळ, नंदकुमार जहागिरदार, दिनकर कुयटे, संजय गवळी यांनी संताप व्यक्त केला. 

जवान सुदर्शन यांनी भारतमातेची अकरा वर्ष सेवा केली. सुदर्शनचे स्मारक व्हावे, यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. तसेच, कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना शासकीय मदत मिळावी. सुदर्शनचे पार्थिव गावी येण्यास उशीर का झाला, याची चौकशी व्हावी. -भास्कर महाराज रसाळ, आहेरगाव 

तब्बल अकरा वर्ष देशसेवा केली असतानाही सुदर्शनचा अंत्यविधी शासकीय इतमामात का केला नाही? त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. -जयवंत महाराज रसाळ, आहेरगाव  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahergaon jawan funeral nashik marathi news