धक्कादायक! शुल्लक भांडणातून पत्नीवर कटरने केले वार...पती फरार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

मालेगाव शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कटरने वार करण्याच्या घटना घडल्या असून, यातील पहिल्या घटनेत कामगाराकडून व्यवस्थापकावर, तर दुसऱ्या घटनेत एकाने पत्नीवर वार केल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. नेमके काय घडले..वाचा सविस्तर...

नाशिक / मालेगाव : मालेगाव शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कटरने वार करण्याच्या घटना घडल्या असून, यातील पहिल्या घटनेत कामगाराकडून व्यवस्थापकावर, तर दुसऱ्या घटनेत एकाने पत्नीवर वार केल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. 

पतीकडून पत्नीवर कटरने वार 

शहरातीलच कॅम्प-शिवाजीनगर भागात पती-पत्नीच्या भांडणावरून झालेल्या वादात आई व भावाचे नाव टाकल्याचा राग आल्याने सागर खरे (30, रा. महाराष्ट्र बेकरीजवळ) याने पत्नी कोमल खरे (22, रा. स्मशान मारुती मळा, कॅम्प) हिला शिवीगाळ करत कटरने छातीवर व पोटावर वार केले. 4 जुलैला हा प्रकार घडला. पत्नीला जखमी करून सागर फरारी झाला. कोमलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. औषधोपचार करून परतल्यानंतर कोमलने सोमवारी (ता. 6) पती सागरविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा > काय सांगता..! कोरोना प्रतिबंधासाठी नारळ व खोबरे तेल ठरतेय रामबाण उपाय...प्राथमिक संशोधनातून समोर 

कामगाराकडून व्यवस्थापकावर कटरने वार
शहरातील सरदारनगर भागातील अब्दुल वदूद यंत्रमाग कारखान्यासमोर कामगाराने पॉवरलूम कारखान्याच्या व्यवस्थापकावर कटरने वार केल्याचा प्रकार घडला. यंत्रमाग कामगार मोहंमद अतिक (रा. गोल्डननगर) हा कामावर येत नसल्याने कारखान्याचे व्यवस्थापक मोहंमद युसूफ मोहंमद हनीफ (वय 58, रा. नयापुरा) अतिकच्या घरी गेले. त्यांनी त्याच्या पत्नीस अतिकला कामावर पाठव नाही तर आगाऊ घेतलेली रक्कम परत कर, असे सांगितले. त्याचा अतिकला राग आल्याने त्याने युसूफच्या तोंडावर कटरने वार करीत जबर दुखापत व शिवीगाळ केली. आझादनगर पोलिस ठाण्यात मोहंमद अतिकविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..

टेहेरे येथे घरफोडी 
टेहेरे (ता. मालेगाव) येथील राजेंद्र अहिरे (42, रोहिदासनगर) बाहेरगावी गेल्याने घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख 46 हजार रुपये, 36 हजारांचे नऊ ग्रॅम सोने, तीन हजारांचे चांदीचे शिक्के असा एक लाख 85 हजारांचा ऐवज नेला. सोमवारी घरफोडीचा प्रकार घडला. श्री. अहिरे यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beaten by cutter crime case in malegaon nashik marathi news