कोरोनाचा काळात सायकल विक्रीत तिपटीने वाढ; ग्राहकांची इंम्पोरटेड सायकलींना पसंती

Bicycle sales increased during the Corona nashik marathi news
Bicycle sales increased during the Corona nashik marathi news

नाशिक/सोयगाव : कोरोना संसर्गामुळे मार्चपासून संपूर्ण जग काही काळ थबकले आहे. या काळात व्यायामाचे सहजसुलभ साधन म्हणून शहरासह जिल्ह्यात सायकलचे महत्त्व वाढल्याने जिल्ह्यात चार महिन्यांत ३३ हजारांहून अधिक सायकलींची विक्री झाली असून, ती नियमितपेक्षा तिप्पट असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. जिल्ह्यात शाळा बंदमुळे लहान सायकल विक्रीत घट झाली. दरम्यान मोठ्या सायकलींची विक्री वाढली. मेनंतर जिल्ह्यात सायकलींची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. जिल्ह्यात सायकलचे २४ ठोक विक्रेते असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सायकल विक्रीचा आलेख उंचावला आहे. 

दोन ते तीन महिन्यांचे वेटिंग

जगातील समृद्ध देशांमध्ये सायकल वापरण्यास प्राधान्य दिले जाते. नेदरलँड, डेन्मार्क, जपान, नार्वे आदी देशांत नागरिक दैनंदिन जीवनात सायकलींचा वापर करतात. त्यामुळे सध्या मालेगाव शहरातील नागरिक भल्या पहाटे सायकलिंग करताना दिसत आहेत. लॉकडाउनपासून अनेक युवक-युवतीसह वृद्धही भल्या पहाटे नामपूर रस्ता, दाभाडी रोडला, मालेगाव आग्रा महामार्गावर, कुसुंबा रस्त्यावर, शिवरस्त्यावर सायकल चालवताना दिसतात. उच्च मध्यमवर्गीय यापूर्वी भल्या पहाटे मॉर्निंग वॉकला प्राधान्य देत होते. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबरोबरच व्यायामासाठी अनेकांनी सायकलची निवड केली. ४० ते ५५ वयोगटातील शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीही गिअरच्या सायकल वापरून शारीरिक फिटनेस ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. सायकलिस्टचे प्रमाण अधिकाधिक वाढू लागल्याने भारतीय बनावटीच्या सायकलींसह इंम्पोरटेड सायकलींची मागणीही वाढली आहे. त्यामुळे लाकडाउननंतर सायकल व्यवसाय तेजीत आला आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी असल्यामुळे दोन ते तीन महिन्यांचे वेटिंग असल्याची माहिती सायकल विक्रेत्यांनी दिली. 

सध्या विक्री झाली तिप्पट

सायकल चालवण्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. मेंदूची शक्ती वाढते, हृदय निरोगी राहते, स्नायूंना मजबुती येते, रोगप्रतिकार शक्तीत वाढ होते, वजन कमी होते, ताणतणाव, चिडचिड दूर होते. हे कोरोनामुळे सर्वांना पटू लागले आहे. मालेगाव शहरात पंधराहून अधिक सायकल दुकाने असून, कोविडमुळे दरमहा विक्री साधारणपणे हजाराच्या आसपास होती. परंतु सद्यःस्थितीत विक्री तिप्पट झाल्याची माहिती सायकल विक्रेत्यांनी दिली. मात्र शाळा, महाविद्यालये बंद असल्याने लहान मुलांच्या सायकल विक्रीत घट झाल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. 
 
मार्चपासून घरात बसून काम करावे लागत होते. त्यामुळे व्यायामाकडे दुर्लक्ष झाले होते. गेल्या महिन्यापासून सायकलिंग सुरू केल्याने दिवसभर प्रसन्न वाटत आहे. मालेगाव-नामपूर रस्त्यावर पहाटे सायकलिंग करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. 
- हितेश पवार 

मालेगाव शहरात एकूण ३४ हून अधिक सायकल विक्रीची दुकाने आहेत. कोरोना संसर्ग काळात सायकल विक्री ५० टक्क्यांनी वाढली आहे. शाळा बंद असल्याने लहान मुलांच्या सायकल विक्रीत घट झाली आहे. मात्र मोठ्या सायकल विक्रीत वाढ झाली आहे. सात ते ३५ हजारांपर्यंतच्या सायकली सध्या उपलब्ध आहेत. स्पोर्ट लुक असलेल्या सायकलींना अधिक मागणी आहे. 
- शैलेश पाटील, श्री समर्थ सायकल एजन्सी 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com