असे काय घडले की बायोडिझेल पंप रातोरात केले गायब? काळा बाजारावर शिक्कामोर्तब

biodisel.jpg
biodisel.jpg

नाशिक / मालेगाव : ‘बायोडिझेलच्या नावाने राज्यात काळा बाजार नवा फंडा’ हे वृत्त शुक्रवारी (ता. १४) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नवापूर, नाशिक विभागातील पाच ते सहा बायोडिझेल पंप रातोरात गायब झाले. पंपमालकांनी दिवसभरातच यंत्रसामग्री, मशिन सर्व खोलून नेल्याने बायोडिझेलच्या नावाने काळा बाजार होत असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

नाशिक जिल्ह्यासह इतर पंप साहित्याची आवराआवर 
दहीवेल, पिंपळनेर, नवापूर, वऱ्हाणे (ता. मालेगाव) यांसह विविध भागातील पंप एका रात्रीतूनच गायब झाले. यातील बहुसंख्य पंपचालकांनी महसूल, पुरवठा, वजनमापे यांसह आवश्‍यक कोणत्याही विभागाची परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. नागपूर येथील अनाह एनर्जी लिमिटेड येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, धान्य वितरण अधिकारी, वजनमापे नियंत्रण, तेल कंपनीचे अधिकारी व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तरीत्या भेट देत बायोडिझेल पंप सील केला. संबंधित पंपावरील नमुने परीक्षणासाठी शासकीय न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, अजनी (नागपूर) येथे पाठविण्यात आले आहे. नागपूरला कारवाई झाली, येथे कारवाई का नाही? असा सवाल नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष भूषण भोसले, सरचिटणीस सुदर्शन पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

पंप व्यावसायिक संकटात सापडले
भोसले म्हणाले, की कोरोना संसर्ग व पाठोपाठ बायोडिझेलचा गोरख धंदा यामुळे पंप व्यावसायिक संकटात सापडले आहेत. ४० टक्के व्यवसाय कमी झाला आहे. निर्धारित प्रमाणात फक्त बायोडिझेल विक्रीस आमची हरकत नाही. मात्र, अधिकारी बायोडिझेलची साधी डेन्सिटी घेत नाही. तपासणी व कारवाई दूरचं. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी नागपूरच्या कारवाईचा हवाला देत पुरवठा अधिकाऱ्यांची, तर श्री. भोसले यांनी अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेत गाऱ्हाणे मांडले. पुरवठा अधिकाऱ्यांनी याबाबत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागितले आहे. सोमवारपर्यंत याबाबत वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करतील. त्यानंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरवू, असे आश्‍वासन पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

संबंधित यंत्रणेने कारवाई न केल्यास नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशन आंदोलन छेडेल. -भूषण भोसले 


मालाची विक्री करण्यास मज्जाव  
नागपूर येथे संयुक्त पथकाने कारवाई केली असता, संबंधित व्यवस्थापनाने कुठलेही प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले नाही. यामुळे पंप सील करण्यात आला. संबंधितांना नोंदणी प्रमाणपत्र, परवानगी व नाहरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली. साठवणूक असलेल्या मालाची विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला. बायोडिझेल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. कारवाईनंतर व्यवसाय होणार नाही, यासाठी बेलतरोडी पोलिस ठाणे यांना देखरेख ठेवण्यासाठी कळविण्यात आले. नागपूर विभागाच्या पुरवठा उपायुक्तांनी विधानसभेचे अध्यक्षांना कारवाईचा अहवाल पाठविला आहे.  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com