
सामान्यांच्या हितासाठी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. महाविकास आघाडीतर्फे चांगले काम सुरू असले, तरीही भारतीय जनता पक्षाकडून त्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोध केला जात आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला.
नाशिक : सामान्यांच्या हितासाठी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. महाविकास आघाडीतर्फे चांगले काम सुरू असले, तरीही भारतीय जनता पक्षाकडून त्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोध केला जात आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला. विरोधासाठी सोशल मीडियाकरिता कितीही लोक विकत घेतले, तरीही जनतेचे मतपरिवर्तन होणार नाही, असा टोलाही त्यांनी या वेळी विरोधकांना लगावला.
सोशल मीडियासाठी कितीही लोक विकत घेतले तरी मतपरिवर्तन अशक्य
आमदार झाल्यानंतर ते पहिल्यांदा नाशिकमध्ये आले असताना तरुण कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. जीएसटीची अंमलबजावणी घाईने सुरू असताना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन महिन्यांत राज्याला त्याचा हिस्सा मिळेल असे जाहीर केले होते. पण गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यासाठी विरोधकांनी काम करण्याऐवजी विरोधाची भूमिका घेतली जात आहे, असा आरोप करून त्यांनी भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या काळातील आणि आताच्या महाविकास आघाडीच्या काळातील घेतलेल्या निर्णयाबरोबर मदतीची जंत्री उपस्थितांपुढे ठेवली. ते म्हणाले, की महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रश्न, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्याप्रमाणे जिल्ह्यावर लक्ष आहे. आई आजारी असताना कोरोना संसर्गाच्या काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे सामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी धावून गेले आहेत. केंद्र सरकारने स्वस्त धान्य दिले. पण त्यातून ५५ टक्के जनतेला लाभ होत असताना पालकमंत्री छगन भुजबळ आणि राज्य सरकारने इतरांनाही धान्य देण्यासाठी प्रयत्न केला. ही सारी कामे वैचारिक बांधिलकी मानणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोचवावीत.
हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश
८० हजार अकाउंटवरून प्रचार
पत्रकारांशी बोलताना श्री. पवार यांनी सोशल मीडियातून विरोधकांनी केलेल्या प्रचाराचा दाखला दिला. ते म्हणाले, की बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात चित्रपट कलावंताने आत्महत्या केली. त्याचे राजकारण करण्यासाठी सोशल मीडियातून ८० हजार अकाउंटच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिस योग्य काम कसे करत नाहीत हे सांगण्याचे काम केले.
हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप
रोहित पवार म्हणाले...
० कळवण तालुक्यात मुक्कामी जाणार. लोककला अनुभवायची आहे.
० भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे.
० ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे चौकशीला सामोरे जातील. पण राजकीयदृष्ट्या संस्थांचा वापर होत असल्यास तो अयोग्य.
० राज्यपाल कार्यालयाचे कामकाज संविधानाला धरून चालते. ते राजकीय हेतूसाठी होणार असल्यास ते योग्य नाही.
आदी उपस्थित
राष्ट्रवादी भवनात झालेल्या स्वागत कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार दिलीप बनकर, सरोज आहिरे, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, नानासाहेब महाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, नंदन भास्करे आदी उपस्थित होते.