मागच्या दाराने मंजूर प्रस्तावावरून भाजप दुभंगली; वरिष्ठांकडे करणार तक्रार

nashik-nmc_201909294551.jpg
nashik-nmc_201909294551.jpg

नाशिक : शहरावर दुरगामी परिणाम करणारा एखादा महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घ्यायचा ठरल्यास तो प्रस्ताव प्रथम पक्षाच्या बैठकीत ठेवावा लागतो. त्यावर चर्चा होऊन गटनेते व शहराध्यक्षांकडून मंजुरी मिळाल्यानंतर महासभेत समर्थन किंवा विरोध केला जातो. मात्र, घरपट्टी खासगीकरणाचा प्रस्ताव मागच्या दाराने म्हणजे जादा विषयांमध्ये घुसवून त्याला मंजुरीदेखील दिल्याने महिनाभरानंतर त्यासंदर्भात नगरसेवकांना माहिती मिळाल्याने भाजपमध्ये दोन मतप्रवाह झाले आहे.

म्हणून प्रकरणाला वाचा फुटली...

ठराविक पदाधिकारीच महापालिका चालवत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. भाजपमधील दुभंगलेपणा वरिष्ठांपर्यंत पोचविण्यासाठी एक गट सक्रिय झाला आहे. घरपट्टी व पाणीपट्टीचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव ७ डिसेंबरच्या महासभेत जादा विषयात ठेवण्यात आला होता. वास्तविक हा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी पक्ष बैठकीत यावर चर्चा होणे अपेक्षित होते. नगरसेवकांना माहिती दिल्यानंतर त्यावर मत-मतांतरे जाणून घेऊन महासभेत त्या विषयाला विरोध करायचा की समर्थन करायचे, याचा निर्णय होतो. परंतु महासभेत नियमित विषयपत्रिकेत घरपट्टी, पाणीपट्टी खासगीकरणाचा विषय न ठेवता जादा विषयात तो ठेवण्यात आला. विशेष म्हणजे त्याला मंजुरीदेखील देण्यात आली. आमदारांसह काही नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांपर्यंत तक्रारी केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

पदाधिकारीच धोरणात्मक विषय रेटत असल्याचा सूर

खासगी लोकांकडून वसुली करण्याबरोबरच मालमत्ता जप्त करण्याचे अधिकारदेखील संबंधित मक्तेदाराला दिले जाणार असल्याने नागरिकांकडून मोठा विरोध होऊन पक्षाची मोठी हानी होईल, अशी भीती व्यक्त होत होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा ठराव मागे घेण्याच्या सूचना केल्यानंतर खासगीकरणाचा विषय मागे पडला आहे. परंतु यावरून भाजपमध्ये सरळ दोन गट तयार झाले असून, ठराविक पदाधिकारीच धोरणात्मक विषय रेटत असल्याचा सूर बाहेर पडत आहे. 

नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता 

पुढील वर्षात महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना नागरिकांना झळ बसणार नाही, याची काळजी घेणे अपेक्षित असताना पक्षातील काही पदाधिकारी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष दावणीला बांधत असल्याची तक्रार भाजपच्या नगरसेवकांची आहे. यामुळे पालिकेसंदर्भातील तक्रारींचा पाढा वरिष्ठांकडे वाचण्यासाठी एक मोठा गट कार्यरत असून, यातून पक्षातील नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com