खडसेसमर्थक आमदारांवर नाशिकमध्ये भाजपचा ‘वॉच’! कार्यकर्त्यांकडून छुप्या पद्धतीने नजर 

प्रशांत कोतकर
Friday, 25 September 2020

काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील चर्चेला उधाण आल्याने भाजपमध्ये अद्याप कुठली प्रतिक्रिया उमटली नाही व स्वत: खडसे यांनीदेखील या चर्चेला अर्थ नसल्याचे सांगितले असले, तरी खडसे यांच्याबरोबर १२ ते १५ आमदार जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

नाशिक : काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील चर्चेला उधाण आल्याने भाजपमध्ये अद्याप कुठली प्रतिक्रिया उमटली नाही व स्वत: खडसे यांनीदेखील या चर्चेला अर्थ नसल्याचे सांगितले असले, तरी खडसे यांच्याबरोबर १२ ते १५ आमदार जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील काही आमदारांवर भाजपकडून ‘वॉच’ ठेवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. खडसेंनी पक्ष सोडला तरी त्यांच्यासोबत एकही आमदाराने जाऊ नये, यासाठी फिल्डिंग लावली जात असल्याचे बोलले जात आहे. 

मर्जीतील कार्यकर्त्यांकडून छुप्या पद्धतीने नजर 
राज्यात भाजपची सत्ता असताना खडसे यांच्याकडे मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे महसूलमंत्री पद होते. त्याचबरोबर अन्य खाती त्यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री झाले नसले तरी प्रबळ मंत्री म्हणून ते समोर आले होते. परंतु कालांतराने भोसरी भूखंड व्यवहाराच्या निमित्ताने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. खडसे यांना भाजपमधून धक्का देण्याचे तंत्र एवढ्यावरच थांबले नाही, तर विधान परिषद, विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाचे धक्के बसले. जळगावमधील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील त्यांची पकड ढिली करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाल्याचे खुद्द खडसे यांनी अनेकदा सांगितले. राज्य पातळीवरही संघटनेत त्यांना स्थान दिले नाही. त्यामुळे दर दोन, चार महिन्यांनी खडसे नाराजी व्यक्त करत राहिले. मध्यंतरीच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांनी लक्ष केल्यानंतर खडसे आता पक्ष सोडणार, अशी चर्चा सुरू झाली. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील जळगाव दौऱ्यावर आले असता खडसे यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याची चर्चा होती. परंतु जळगावऐवजी बुधवारी मुंबईतच त्यांनी बैठक घेतली. बैठकीनिमित्त खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्‍चित झाल्याची चर्चा सुरू झाली. परंतु त्यांनी नकार दिला. 

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

फार्महाउस भेटीनंतर आमदार नजरकैदेत 
खडसे भाजपला रामराम करणार व सोबत भाजपचे बारा ते पंधरा आमदारसुद्धा त्यांच्यासोबत जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्या अनुषंगाने खडसे यांच्याबरोबर कोण जाणार, याबाबत तर्कवितर्क लावताना नाशिकमध्ये खडसेसमर्थक आमदार कोण? याचा शोध घेतला जात आहे. ‘त्या’ आमदारांवर कार्यकर्त्यांकडून छुप्या पद्धतीने नजर ठेवली जात असून, त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. कोरोना प्रादुर्भावापूर्वी शहरातील भाजपच्या एका आमदाराने खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाउसवर भेट घेतली होती. त्या संदर्भातून आमदारांच्या नजरकैदेचा मुद्दा समोर आला आहे.  

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's watch on Khadse supporter MLAs in Nashik marathi news