तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

अजित देसाई
Saturday, 26 September 2020

तब्बल ३० तास उलटूनही चौकशीसाठी कुणीही पुढे आले नव्हते. पोलिसांनी परिसरातील आठ-दहा गावांमध्ये चौकशी करून कुणी शोधण्याचादेखील प्रयत्न केला नव्हता. काहीच हाती न लागल्याने पोलिस यंत्रणादेखील संभ्रमात पडली होती. त्यानंतर ३ दिवसांचा शोध अखेर १५० फूट खोल गाळात येऊन थांबला.

नाशिक / सिन्नर : तब्बल ३० तास उलटूनही चौकशीसाठी कुणीही पुढे आले नव्हते. पोलिसांनी परिसरातील आठ-दहा गावांमध्ये चौकशी करून कुणी शोधण्याचादेखील प्रयत्न केला नव्हता. काहीच हाती न लागल्याने पोलिस यंत्रणादेखील संभ्रमात पडली होती. त्यानंतर ३ दिवसांचा शोध अखेर १५० फूट खोल गाळात येऊन थांबला.

देवनदीच्या पुराचा थरार..!

वडांगळी येथे आठवडेबाजार असल्याने खडांगळीच्या बाजूने अनेक जण देवनदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्याची पर्वा न करता ये-जा करत होते. बुधवारी (ता. २३) दुपारी तीनला पंचविशीतील एक तरुणदेखील पाण्यातून रस्ता काढत असताना नदीपात्रात ओढला जाऊन पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. या वेळी प्रत्यक्षदर्शीने आरडाओरड केल्याने बाजारातील अनेक जण नदीपात्राकडे धावले होते. प्रवाह अधिक असल्याने पाण्यात उड्या घेतलेल्या अन्य तरुणांची दमछाक झाली. गुरुवारी (ता. २४) सकाळपासून एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी गौरव सानप यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला. पुलापासून देवना बंधाऱ्यापर्यंतचा परिसरदेखील पिंजून काढला. मात्र, वाहून गेलेल्या तरुणाचा मागमूस मिळाला नाही. घटना घडल्यानंतर परिसरात या प्रकाराची जोरदार चर्चा झाली.

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

पुलापासून १५० फूट गाळात सापडला मृतदेह

राजू जाधव हे कामानिमित्त सिन्नर तालुक्यात आले असता, ते वडांगळी येथील नातेवाइकांकडे पाहुणचार घेतल्यावर वावी येथील बहिणीकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यांना नातेवाइकाने खडांगळीपर्यंत पोचवले होते. मात्र, तेथून वावीकडे न जाता ते पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून पुन्हा वडांगळी गावाकडे परत येत होते. मात्र त्याचवेळी पुराच्या पाण्यातून मार्ग काढत असताना त्यांचा तोल गेल्याने वाहत गेले. या घटनेनंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह मिळून आला नव्हता. शुक्रवारी (ता. २५) तीन दिवसांनंतर सकाळी त्यांचा मृतदेह पुलापासून १५० फूट गाळात मिळून आला आहे.

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

अकस्मात मृत्यूची नोंद

२३ सप्टेंबरला वडांगळी (ता. सिन्नर) येथील देवनदीच्या पुलावरून पुरात वाहून गेलेल्या पुरुषाचा मृतदेह शुक्रवारी (ता. २५) सकाळी साडेआठला मिळून आला. चांदोरी येथील जीवरक्षक पथकाने या पुरुषाचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला. राजू गोपाल जाधव (वय ५०) असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पुरुषाचे नाव असून, ते भुसावळ (जि. जळगाव) येथील रहिवासी होते.  जाधव हे वावी, नांदूरशिंगोटे व पाथरे येथील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून पूर्वी कार्यरत होते. प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: body found in 150 feet deep silt nashik marathi news